मुंबई : गेल्या काही दिवसांपासून फटाक्यांमुळे मुंबई शहर आणि उपनगरातील हवा प्रदूषित झाली आहे. हवेची गुणवत्ता अद्यापही खालावलेलीच असून गुरुवारीही मालाडमधील हवा अत्यंत वाईट असल्याची नोंद झाली. मालाडसह नवी मुंबईमधील हवेची गुणवत्ता ‘अत्यंत वाईट’ तर, अंधेरी, बोरिवली, माझगाव, चेंबूर, कुलाबा येथील हवेची गुणवत्ता ‘वाईट’ असल्याचे ‘सफर’ या संकेतस्थळाच्या अहवालात स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>> मुंबई : सीटबेल्ट नियम टॅक्सी संघटनांना अमान्य

करोनानंतर दोन वर्षांनी धुमधडाक्यात दिवाळी साजरी झाली. यंदा फटाक्यांची आतषबाजीही मोठया प्रमाणात झाली. आवाजाच्या फटाक्यांचे प्रमाण काहिसे कमी झाले असले तरी शोभेच्या फटाक्यांचे प्रमाण वाढले होते. नियमांचे उल्लंघन करून रात्रीही फटाके उडवण्यात आले. फटाक्यांच्या धुरामुळे आणि हवेत तरंगणाऱ्या विषारी सूक्ष्म कणांमुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. अतिसूक्ष्म धूलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर) हवेतील प्रमाण वाढल्याने सलग मंगळवारपासून मुंबईतील हवेचा दर्जा हा आरोग्यास हानीकारक झाला आहे. गुरुवारी सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी ॲण्ड वेदर फोरकास्टींग ॲण्ड रिसर्च (सफर) या संकेतस्थळावरील अहवालानुसार, मुंबईतील हवेची गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सरासरी २०८ नोंदवला गेला असून राष्ट्रीय वातावरणीय वायु गुणवत्ता मानकानुसार (एनएएक्यूएस) हवेची गुणवत्ता ‘वाईट’ असल्याचे सुचक आहे. मालाड, माझगाव, नवी मुंबई येथे हवेचा गुणवत्ता निर्देशांक ३०० पेक्षा अधिक होता. अशी हवा ‘अत्यंत वाईट’ म्हणून नोंदली जाते.

आरोग्यावर परिणाम

प्रदुषित हवेमुळे खोकला, सर्दी, श्वसनविकार, डोळे चुरचुरणे अशा तक्रारी असलेले रुग्ण वाढल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. त्याचबरोबर त्वचाविकार, ॲलर्जीचेही प्रमाण वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अस्थमा, श्वसनविकार असेलेले रुग्ण, वृद्ध, लहान मुले यांनी अशा हवेत बाहेर फिरणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मालाड ३०१ एक्यूआय

माझगाव ३०० एक्यूआय

चेंबूर २४५ एक्यूआय

कुलाबा २३९ एक्यूआय

बोरिवली २२८ एक्यूआय

अंधेरी २२१ एक्यूआय

भांडूप ९२ एक्यूआय

वांद्रे-कुर्ला संकुल ७० एक्यूआय

वरळी ६८ एक्यूआय

नवी मुंबई ३१६

Story img Loader