एखाद्या शहरातून फेरफटका मारताना अचानक आपण थबकतो नि भिंतीवर रंगवलेली सुंदर चित्रे बघण्यात गढून जातो. कधी या चित्रांतून समाजप्रबोधन केलेले असते तर कधी छोटय़ा बच्चेकंपनीसाठी खास संदेश दिलेला असतो. या चित्रांचा उद्देश काही असो, पण ती क्षणभर आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जातात. भिंतीवर काढलेल्या या चित्रांना ‘म्युरल्स’ असे म्हणतात.
सर्वसाधारणपणे भिंत किंवा सीलिंगवर ही चित्रे काढली जातात. गेल्या काही वर्षांत तर ही म्युरल्स घराच्या अथवा इमारतीच्या बाह्य आणि अंतर्गत सजावटीचा एक महत्त्वाचा भाग बनली आहेत.  
भिंतीवर चित्रे काढण्याची परंपरा पार पुरातन काळापासून प्रचलित आहे. फार पूर्वी म्हणजे प्राचीन इतिहासाच्या काळात, जेव्हा मनुष्य गुहेत राहत असे, त्या वेळी गुहेच्या भिंतीवर चित्रे काढली जात असत. जसजसा काळ पुढे सरकत चालला किंबहुना, प्राचीन युगापासुन आधुनिक युगाकडे आपण येऊ लागलो, तसतसे या कलेला विशेष महत्त्व प्राप्त होऊ लागले. इतके की, त्या काळी काढलेल्या काही चित्रांकडे आजही ‘मास्टरपीस’ म्हणून बघितले जाते. रेनेसाँ काळातील युरोपमधील काही चित्रे, प्रसिद्ध चित्रकार लिओनार्दो दा विन्चीचे अजरामर ठरलेले ‘लास्ट सपर’चे चित्र आणि आपल्याकडील अंजिठा-वेरुळमधील चित्रे ही या मास्टरपीस शैलीतील काही उदाहरणे जगभरात आजही तितकीच प्रसिद्ध आहेत.  
एक काळ असा होता की, वैभवशाली कलाशैलीचे प्रतीक म्हणून या भित्तिचित्रांकडे पाहिले जात असे. पण आजच्या काळात व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याकडे पाहिले जाते. अनेक क्षेत्रांत ग्राहकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी या भित्तिचित्रांचा वापर करून घेतला जातो. त्यामुळेच ती इतक्या आकर्षक रूपात सादर केली जातात, की ग्राहक ती पाहण्यासाठी हमखासपणे थांबतोच. या व्यतिरिक्त सामाजिक, राजकीय आणि मानवतावादी संदेश देण्यासाठीही अलीकडच्या काळात या म्युरल्सचा मोठय़ा प्रमाणावर वापर होताना दिसतो.
या कलानिर्मितीसाठी जो भिंतीचा पृष्ठभाग वापरला जातो तो व्यापक असतो. त्यामुळे एखाद्या कलाकाराच्या मनात आले आणि भिंत रंगवली, इतकी सोपी ही प्रक्रिया नसते. सार्वजनिक ठिकाणामधील भिंतींचा वापर करताना संबंधित अधिकाऱ्यांकडून विशेष परवानगी घ्यावी लागते.  
इतर आर्टिस्टप्रमाणे म्युरल आर्टिस्टदेखील कलानिर्मिती करणारा कलाकारच असतो. फक्त इतर कलाकार आणि म्युरल आर्टिस्टमध्ये फरक इतकाच असतो की, यांच्या कलेची निर्मिती ही नेहमी छोटय़ा नाही तर व्यापक पृष्ठभागावर होत असते. मोठय़ा आकारातील भिंतीवर किंवा इमारतीच्या मोठय़ा पृष्ठभागावर मोठी चित्रे निर्माण करणे, हे म्युरलिस्टचे काम असते.
म्युरलिस्ट हादेखील एक चित्रकार असल्यामुळे चित्रकार चित्रे काढण्यासाठी जी साधने वापरतो तीच साधने म्युरलिस्टदेखील वापरतो. जसे :-
* रंग
* रंगाचे विविध आकारांतील ब्रश
* रंगाचे स्प्रे
* सीलर्स
* ड्रॉप क्लॉथ
* पेन्सिल किंवा चारकोल  
ही भित्तिचित्रे नेमकी कोणत्या भिंतीवर काढायची आहे, त्यानुसार म्युरलिस्ट कोणत्या रंगांचा वापर करायचा, हे निश्चित करत असतो. म्हणजेच जर एखाद्या इमारतीबाहेरील भिंतीचा भाग रंगवायचा असेल तर ती भिंत कशा स्वरूपाची आहे, त्यावर कोणते रंग खुलून दिसतील आणि चालू शकतील ते पाहूनच रंगांचा वापर करावा लागतो.  
प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यापूर्वी म्युरलिस्टला आपल्या कामाचा कच्चा आराखडा तयार ठेवावा लागतो. त्यात काय संकल्पना वापरावयाची आहे, कशा पद्धतीने ती सादर करावयाची आहे, प्रत्यक्ष भिंतीवर ही कल्पना कशा पद्धतीने आणता येईल या सर्व गोष्टींचा त्याला विचार करावा लागतो. तर कधी कधी ग्राहकाच्या (क्लायंटस्) इच्छेनुसार काम करावे लागते. यात प्रामुख्याने जाहिरात क्षेत्रासाठीच्या किंवा शहरातील अधिकाऱ्यांसाठी कराव्या लागणाऱ्या कामाचा समावेश होतो. परंतु, जे स्वतंत्ररीत्या काम करतात, त्यांना मात्र आपले काम स्वत:च्या मर्जीप्रमाणे करण्याचे स्वातंत्र्य उपभोगता येते.
तयार होणारे काम नेमके कसे दिसणार आहे, याचा अंदाज म्युरलिस्टला आला की, तो कागदावर त्या कामाचा पूर्ण आराखडा काढून घेतो. मग त्यात कोणकोणते रंग भरायचे आहेत, कोणत्या तंत्राने व कशा पद्धतीने भरायचे आहे, या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचा त्यात विचार केला जातो. जसे भिंतीवरील चित्रे रंगवताना ती एकाच नाही तर विविध तंत्रांनी अथवा वेगवेगळ्या स्वरूपांची कॉम्बिनेशन्स वापरून रंगवता येतात. उदा. काही चित्रे ही स्प्रे पेटिंग्ज तंत्राने तर काही थेट ब्रशेसच्या साहाय्याने रंगवली जातात. तर काही वेळेला कठीण स्वरूपाचे आकार काढण्यासाठी स्टेन्सिल्सचा वापर केला जातो.
बहुतेक वेळेला चित्र पूर्ण झाल्यानंतर म्युरलिस्ट मंडळींचा सीलरचा अंतिम कोट देऊन चित्र पूर्ण करण्याकडे कल असतो. यामुळे ते चित्र वर्षांनुवष्रे चांगल्या स्थितीत व सुरक्षित राहते.  
साधारणपणे म्युरल आर्टिस्टचा स्वतंत्रपणे म्हणजेच फ्रीलािन्सग स्वरूपाचे काम करण्याकडे अधिक कल असतो. तर काही जण थेट म्युरल्स तयार करणाऱ्या कंपनीसाठी काम करणे पसंत करतात .  
अनेकदा म्युरल्स स्वरूपाच्या कामासाठी कंपन्या किंवा व्यावसायिक संस्था स्वतंत्रपणे काम करणाऱ्या म्युरल आर्टिस्टकडे आपली कामे देतात. त्यासाठी त्यांना कमिशन तत्त्वावर कामाचा मोबदला दिला जातो. यामध्ये बहुतांश वेळा शहररचना अधिकारी, जाहिरात एजन्सी किंवा काही खासगी स्वरूपाच्या संस्थांचा समावेश असतो. तर कधी कधी काही हौशी मंडळी स्वत:च्या घरासाठी विशेष स्वरूपाची आणि जी कलात्मकदृष्टय़ा आकर्षक असतील अशा स्वरूपाची िभतीवरील चित्रे तयार करवून घेतात. कामाच्या धबडग्यातून जेव्हा जेव्हा म्युरल आर्टिस्टना वेळ मिळतो, त्या त्या वेळी ते छोटय़ा-मोठय़ा स्वरूपाची भित्तिचित्रे तयार करतात आणि ती विविध कंपन्यांना किंवा आर्ट गॅलरींना विकतात अथवा स्वत:च खासगीरीत्या त्यांची विक्री करतात.  
तसे पाहिले तर म्युरल आर्टिस्ट म्हणून करिअरला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्याजवळ अमुक स्वरूपाची शैक्षणिक पदवी असावी, याची आवश्यकता नसते. अनेकदा या क्षेत्रात येणारी मंडळी ही अनुभवी आणि यशस्वी म्युरल आर्टिस्टच्या हाताखाली साहाय्यक म्हणून उमेदवारी करतात आणि तिथे अनुभव घेऊन शिकतात. तर काही जण कलाशाळेत प्रवेश घेऊन फाइन आर्टमार्फत या कलेचे प्रशिक्षण घेतात. किंवा चित्रकलेचे प्रशिक्षण घेत या म्युरल आर्टबाबत जाणून घेतात.
याशिवाय, ज्यांच्या हातात कला आहे आणि ज्यांना या क्षेत्राचे आकर्षण किंवा आवड आहे, त्यांनी चित्रकलेसंदर्भातील विविध अभ्यासक्रम पूर्ण करून त्या विषयीचे योग्य प्रशिक्षण घ्यावे. या अभ्यासक्रमांमार्फत त्या व्यक्तीला चित्रकलेतील पायाभूत आणि प्रगत तंत्राविषयी जाणून घेता येते. तर काही कला शाळांतून किंवा कला महाविद्यालयांतून म्युरल मेकिंगचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम चालविण्यात येतात. ज्या म्युरलिस्टना फ्री-लान्सर म्हणून स्वतंत्ररीत्या काम करावयाचे आहे किंवा स्वत:चा म्युरल्स पेटिंग्जचा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशांनीदेखील चित्रकलेसंदर्भातील विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेतल्यास त्याचा निश्चितच लाभ होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा