जुलै २०१३ मध्ये होणार्‍या १६ व्या बीएमएम अधिवेशनाला येणार्‍या मराठी रसिकांना अनोखी मेजवानी मिळणार आहे. संगीतकार अजय-अतुल या अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्यांदाच अमेरिकेतल्या रसिकांसमोर एक आगळा-वेगळा कार्यक्रम सादर करतील. या कार्यक्रमाद्वारे अजय-अतुल गोगावले बंधूंचा झपाटून टाकणारा जीवन आणि संगीतप्रवास उलगडणार आहे.
‘वार्‍यावरती गंध पसरला, मन उधाण वार्‍याचे, कोंबडी पळाली’ अशा एकाहून एक लोकप्रिय गाण्यांवर, अजय-अतुलच्या ‘जोगवा आणि नटरंग’मधील गाण्यांनी कळस चढवला. साथसंगत, पार्श्वसंगीत, जाहिराती, नाटक आणि टीव्ही मालिका याबरोबर मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांच्या स्टाईलचा वेगळा ठसा उमटलेला आहे. केवळ मनात खोल रुजलेल्या संगीतप्रेमाच्या आणि उपजत गुणांच्या बळावर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली आणि लखलखीत यश मिळवलं.
आता हा सगळा जीवनपट आणि त्यांचं धुंद करणारं संगीत खुद्द अजय-अतुल बीएमएमच्या रंगमंचावरुन सादर करणार आहेत. यामध्ये अजय-अतुलला बोलतं करण्याची जबाबदारी प्रसिध्द अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी घेतली आहे. नाटक, टी.व्ही.मालिका आणि चित्रपटांतल्या या श्रेष्ठ अभिनेत्रीने नुकतंच चित्रपट-दिग्दर्शनही केलं. आता बीएमएमच्या अधिवेशनात एक मुलाखतकार म्हणून त्या रसिकांसमोर येतील. तर आघाडीचे गायक हृषिकेश रानडे आणि सावनी रविंद्र याच कार्यक्रमात, अजय-अतुलची गाणी सादर करण्यासाठी त्यांच्या साथीला असतील. देश-विदेशातल्या रसिकांची पसंती मिळवलेल्या हृषिकेशने, आशा भोसले यांच्याबरोबर अनेक कार्यक्रम सादर केले आहेत शिवाय अनेक चित्रपटगीतांसाठी तसेच अल्बम्ससाठी आवाज दिला आहे. सावनी रविंद्र यांनीही आजपर्यंत पं. हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते, सुरेश वाडकर, श्रीधर फडके या आणि इतर मान्यवरांबरोबर गाणं सादर केलं आहे.
आता बीएमएमच्या अधिवेशनाद्वारे उत्तर अमेरिकेतल्या आणि जगभरातल्या रसिकांसाठी संजीवनी न्यूट्रास्यूटीकल अँड हेल्थ प्रॉडक्टस लिमिटेड आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड यांनी हा वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम प्रायोजित केला आहे. या कार्यक्रमाबद्दल बोलताना कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजय कालेले म्हणाले, “सुप्रसिध्द संगीतकार अजय-अतुल यांच्याप्रमाणेच कोलते-पाटील समूहासाठीही महाराष्ट्रीयन संस्कृती हा जिव्हाळ्याचा विषय आहे. बी.एम.एम. २०१३ च्या सहयोगाने एक संगीत समारोह आयोजित करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी एक अभिमानास्पद बाब आहे. यामुळे उत्तर अमेरिकेत राहणार्‍या मराठी बांधवांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बंधांना नवा उजाळा मिळेल, असा मला विश्वास वाटतो.”
येत्या जुलैमध्ये होणार्‍या बी.एम.एम. अधिवेशनाच्या निमित्ताने अनेक उत्तम सांस्कृतिक कार्यक्रम, शैक्षणिक आणि आर्थिक उपक्रम होत आहेत. याविषयी www.bmm2013.org  इथे अधिक माहिती मिळू शकेल आणि www.facebook.com/bmm2013 या फेसबुक पेजवर सतत नवनव्या घडामोडी कळू शकतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा