देशाचे राजकारण ज्याच्याभोवती फिरते, त्या उत्तर प्रदेशचे राजकारण गरागरा फिरते मुस्लिमांभोवती! तब्बल वीस टक्के मते आणि सुमारे सव्वाशे विधानसभा मतदारसंघांचा निकाल एकहाती फिरविण्याची ताकत असलेली ही राजकीय ‘मतपेढी’.. देवबंद, कैराना, मुझफ्फरनगर या मुस्लीम बहुसंख्याक टापूत फिरून मुस्लीम मनांचा अराजकीय कानोसा घेण्याचा एक प्रयत्न.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवबंद म्हटले की आपल्याला दारुल उलूम आठवते आणि दारुल उलूम म्हटले की विक्षिप्त फतवे. कधी मुस्लीम स्त्रियांनी पुरुषांसोबत काम करू नये, तर कधी छायाचित्रांवर बंदी.. उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिलमधील देवबंद या नगरपालिकेच्या गावात शिरताना फतव्यांचे हे जग डोक्यात घोळत होते. देवबंदपासून दारुल उलूमला बाजूला काढता येणार नाही इतके दोघांमध्ये घट्ट नाते. दारुल उलूमचा अर्थ म्हणजे विद्याघर. ब्रिटिश वरवंटय़ाने इस्लामिक संस्कृती धोक्यात आल्याचे पाहून मुहंमद कासीम ननौतींच्या पुढाकाराने ३१ मे १८६६ मध्ये या इस्लामिक विद्यापीठाची पायाभरणी झाली. गेल्या दीडशे वर्षांमध्ये या विद्यापीठाने इस्लामिक जगतात विश्वास जागविला, तर बिगरमुस्लिमांमध्ये किंचितसा अविश्वास जन्माला घातला.

दारुल उलूमला एक छोटेखानी जगच म्हणा. सहा हजार विद्यार्थी तिथे इस्लामचे शिक्षण घेतात. शिक्षण, राहणे, भोजन सर्व काही मोफत. देशविदेशांतील विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय. दारुल उलूमच्या ‘कॅम्पस’मधून फिरताना उत्तर प्रदेशातीलच सीतापूर जिल्ह्य़ातील विद्यार्थी आदिल हा सोबत होता. टिपिकल मुस्लीम वेशभूषेचा आदिल अदबशीर वाटत होता. वर्गखोल्या, कुराणासोबतच गीता- चार वेद- बायबल यांसारखे धर्मग्रंथ असणारे भव्य ग्रंथालय, वसतिगृहे, मशीद.. यांसारख्या नानाविध गोष्टी त्याने फिरून दाखविल्या. कुलगुरू मुफ्ती अब्दुल कासीम नोमानी बाहेरगावी गेले होते आणि अन्य धर्मगुरू बोलण्यास तयार नव्हते. ‘राजकारण.. निवडणूक.. छे छे. आमचा संबंध नाही. त्यावर बोलण्यास परवानगी नाही,’ असे एका धर्मगुरूने स्पष्टपणे सांगितले. मुस्लिमांच्या सामाजिक प्रश्नांबद्दलही माध्यमांशी चर्चा करण्यास परवानगी नसल्याचे ते सांगत होते. नाइलाज झाला. पण तोपर्यंत आदिलशी चांगली गट्टी जमली होती. तो मुस्लिमांमधील धार्मिक कट्टरपणाबद्दल, त्यांच्या राजकीय-सामाजिक कुचंबणेबद्दल मोकळेपणाने बोलू लागला होता. फतव्याबद्दल तो म्हणाला, ‘धर्मगुरू इस्लामचा अभ्यास करूनच फतवा जारी करतात. पण तो फार कमी मुस्लीम पाळतात.’ तिहेरी तलाकबद्दल त्याचे विचार एकदम कट्टरतावादी होते. पुरुषांप्रमाणेच महिलांनाही घटस्फोटाचा अधिकार का नको, या प्रश्नावर तो म्हणाला, ‘पुरुषांपेक्षा महिलांना कमी समज असते. त्या तितक्या परिपक्व व समजूतदार नसतात. तिहेरी तलाकचा अधिकार त्यांनाही दिला तर एकही विवाह शिल्लक राहणार नाही,’ असे समर्थन तो करीत होता. मुस्लिमांमध्ये अगोदरच शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. मग असल्या धार्मिक शिक्षणाने जगाशी कशी स्पर्धा करणार? या थेट प्रश्नाने तो विचारात पडला. आधुनिक शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे त्याला मनापासून मान्य होते. दारिद्रय़, शिक्षण आणि कट्टरतावादाचा जवळचा संबंध असल्याचे त्याला कबूल होते. काही मूठभर लोकांच्या उपद्व्यापाने ‘पुरी कौम’ बदनाम होत असल्याची पीडा त्याला होती. निघता निघता त्याला मी पहिला आणि शेवटचा राजकीय प्रश्न विचारला. ‘नरेंद्र मोदींच्या भारतात मुस्लिमांना असुरक्षित वाटतेय का?’ त्याचे उत्तर होते, ‘बिलकुल नहीं.. मोदी जैसे लोग आयेंगे और जायेंगे. ये देश तो चलता रहेगा. सियासत का खेल है सारा..’ आदिल मला मुस्लिमांमध्ये चालू असलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय घुसळणीचा प्रतीक वाटत होता. एका पातळीवर भूतकाळ विरुद्ध भविष्यकाळ आणि दुसऱ्या पातळीवर धार्मिकता विरुद्ध आधुनिक विचारांच्या संघर्षांचे आंदोलन त्याच्या सूक्ष्म मानसिक पातळीवर चालू असावे. पूर्णत: धार्मिक प्रभावाखाली असतानाही त्याला आधुनिकतेची असणारी ओढ अधिक महत्त्वाची होती.

देशाचे राजकारण ज्याच्याभोवती फिरते, त्या उत्तर प्रदेशचे राजकारण मुस्लिमांभोवती फिरते! तब्बल वीस टक्के मते आणि सुमारे सव्वाशे विधानसभा मतदारसंघांचा निकाल एकहाती फिरविण्याची ताकत असलेली ही ‘मतपेढी’. बाबरी मशिदीच्या पतनानंतर ती इतकी एकगठ्ठा झाली की भाजपवगळता अन्य सर्व पक्ष तिला लुभावण्यासाठी कोणत्याही थराला जातात. पण खरोखरच या मतपेढीचा महिमा वस्तुस्थिती की भ्रम? मुस्लिमांच्या राजकीय ताकदीचा एवढा गवगवा असताना २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातून एकही मुस्लीम खासदार का होऊ  शकला नाही? सत्ता मिळविण्याची स्वप्ने पाहणारा भाजप एकपंचमांश मते असलेल्या समाजाचा एकही उमेदवार उभा न करण्याचे धाडस कसे काय करू शकतो? या प्रश्नांचा धांडोळा घेण्यासाठी आणि मुस्लीम मतांचा कानोसा टिपण्यासाठी पश्चिम उत्तर प्रदेश व रोहिलखंडसारखा ‘आदर्श’ टापू अन्यत्र मिळणे नाही. दोन्हीही मुस्लीमबहुल. २०११ च्या जनगणनेनुसार, देशामध्ये मुस्लीम १४.२ टक्के आहेत. पण हे प्रमाण उत्तर प्रदेशात १९.२६ टक्क्यांवर जाते आणि हीच संख्या पश्चिम उत्तर प्रदेश व रोहिलखंडमध्ये थेट दुप्पट म्हणजे ४० टक्क्यांपर्यंत पोहोचते. रामपूर तर आताच मुस्लीमबहुल (५१ टक्के) झाला आहे आणि सहारनपूर, मोरादाबाद, बिजनौर, मुझफ्फरनगर आदी जिल्हे त्याच मार्गावर आहेत. एका अभ्यासानुसार, २०६१ पर्यंत हा सारा इलाका मुस्लीम बहुसंख्याक (मुस्लीम मेजॉरिटी) झालेला असेल. ही झाली पश्चिमेकडील स्थिती. पूर्वेकडील बहाराईच, श्रावस्ती, सिद्धार्थनगर, संत कबीरनगर, बलरामनगर आदी नेपाळला लागलेले जिल्हेही असेच मुस्लीमबहुल आहेत. पण तेथील लोकसंख्यावाढीचा वेग स्थिर झालाय.

या टापूला हिंदू-मुस्लीम दुही आणि दंगलींचा शाप असल्याचे सांगणे न लगे. मुस्लिमांचे संख्यात्मक वर्चस्व हिंदूंना डाचते. त्यातून निपजणाऱ्या भीतीला भाजप गोंजारतो. ती अधिक घट्ट करण्यासाठी गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांच्या जंगी सभा बोलाविल्या जातात. तर दुसरीकडे मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतपेढीसाठी समाजवादी, बसप आणि काँग्रेस कट्टरतावाद्यांचे लांगूलचालन करण्यास मागेपुढे पाहत नाही. म्हणून तर मोदींचे मुंडके छाटण्याची भाषा करणारा सहारनपूरचा इम्रान मसूद काँग्रेसचा ‘स्टार कॅम्पेनर’ असतो. टीव्ही कॅमेऱ्यांसमोर धडधडीतपणे पंतप्रधानांच्या हत्येची भाषा करताना एका सामान्य मुस्लीम युवकाला कोणतीही जरब वाटत नसते. इतके वातावरण कमालीचे दूषित आहे. इथली शक्तिशाली जाट मंडळी आणि मुस्लिमांमधील राजकीय-सामाजिक सौहार्दाची जागा कधीच द्वेषाने घेतलीय.

बागपतजवळच्या भूनी गावातील खत व्यापारी मुकेशकुमार प्रजापतींचा व्यक्तिगत अनुभव विचारात पाडतो. सादीब म्हणून त्यांचा एक मित्र होता. तो त्यांना गुरुस्थानी मानायचा. कौटुंबिक संबंध होते. दररोज एक तरी फोन असायचा. पण २०१३ मधील मुझफ्फरनगर दंगलीनंतर त्याचे फोन येणे हळूहळू बंद होत गेले. ‘त्यानेही संपर्क साधला नाही आणि मीही..’, प्रजापती सांगत होते, ‘आमच्यात काहीच झाले नव्हते. पण आजूबाजूचे वातावरण एवढे गढूळलेले होते, की आम्हाला दोघांनाही एकमेकांशी बोलावे असे वाटत नाही.’ आता तर परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे त्यांना वाटते. पुन्हा बंध जुळण्याबाबत त्यांना रास्त शंका आहे.. आणि म्हणून तर रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मुद्दय़ांऐवजी ‘लव्ह जिहाद’, गोहत्या, यांत्रिक कत्तलखाने, ‘इस्लाम खतरे में’ यांसारखे भावनाशील मुद्दे कळीचे ठरतात. सगळीकडे धगधग जाणवते. वरकरणी कृत्रिम शांतता वाटली तरी त्याखाली असलेल्या दारूगोळ्याच्या ढिगाऱ्याचा भडका नेमका कधी होईल, याचा नेम नाही.

श्यामली जिल्’ाात कैराना हे असेच एक गाव. मुस्लिमांच्या दहशतीमुळे येथील हिंदूंनी पलायन केल्याचा सनसनाटी आरोप भाजपचे खासदार हुकूमसिंह यांनी केल्यानंतर कैराना एकदम (कु)प्रसिद्धीच्या झोतात आले. आदित्यनाथांसारखी मंडळी तर कैरानाचे काश्मीर झाल्याचे सांगत फिरत आहेत. पण हा हिंदू-मुस्लीम नव्हे, तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे अगदी हिंदूही मान्य करतात. मुस्लीम गुंडांचा त्रास हिंदू व मुस्लिमांनाही आहे. पण त्याला राजकारण्यांनी धार्मिक रंग दिला आणि असलेली दुही अधिकच खोलवर गेली. खरे तर कैराना ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे. महाभारतानुसार ही कर्णाची भूमी. पानिपत युद्धादरम्यान मराठय़ांचा मोठा डेरा याच गावात होता. पेशव्यांनी जीर्णोद्धार केलेली भव्य मंदिरे आहेत इथे. कदाचित खूपच कमी जणांना माहीत असेल की शास्त्रीय संगीतामध्ये ध्रुवपदी असलेल्या किराणा घराण्याची जन्मभूमीसुद्धा हीच कैराना. किराणा घराण्याचे मूळ पुरुष मानले जाणारे अब्दुल करीम खाँ हे इथले असल्याने नाव किराणा घराणा पडले. याच मातीत किराणा घराण्यातील मातब्बरांनी सुरांचे धडे गिरविले. महंमद रफीसुद्धा इथलेच. दुर्दैवाने एवढय़ा मौल्यवान वारशाची जाणीवदेखील इथल्या मंडळींना नाही. याउपर हिंदूंच्या कथित पलायनाचा शिक्का बसला. कैरानाचे हे अध:पतन अनेकांना बघवत नाही. पण अशी दुर्दशा झालेले अनेक कैराना उत्तर प्रदेशात ठायीठायी सापडतील.

कैरानाकडून मुझफ्फरनगरकडे जाताना कैरानाचा इतिहास कवितेमधून रेखाटणारे शायर रियासत अली तबिश कैरनवी यांची एक नज्म मनातून जात नव्हती..

यहाँ शेख व ब्राह्मण हर तरह आजाद रहते हैं

इधर रहता है गर रामू उधर शमशाद रहते हैं

नहीं है जिक्र कलियों का यहाँ गुलशाद रहते हैं

नगर है ये मुहब्बत का यहाँ फरहाद रहते हैं..

पण ‘मुहब्बत का ये नगर’ आता फक्त इतिहासाच्या पानातील बंदिस्त भूतकाळ होऊन राहिलेय..

 

संतोष कुलकर्णी

santosh.kulkarni@expressindia.com