‘वॉट्सअॅपवर आहेस का?’ हा प्रश्न दोन-तीन वर्षांपूर्वी विचारला जायचा, तसा हल्ली ‘टिंडर, ट्रली मॅडली किंवा कुठल्या डेटिंग अॅपवर आहेस का?’ हा प्रश्न तरुण मंडळी विचारू लागली आहेत; पण यात एक मोठा फरक आहे. डेटिंग अॅप्सची परदेशातील प्रसिद्धी बघता अनेक जण आपण डेटिंग अॅपवर आहोत, हे उघडपणे मान्य करत नाही. काही डेटिंग अॅप्स फेसबुकच्या अकाऊंट डिटेल्सवरून ऑपरेट होत असल्याने ही बाब ‘कॉन्ट्रोव्हíशअल’ ठरू शकते, असं अनेकांना वाटतं, म्हणून मनात असूनही अनेक जण या अॅप्सच्या वाटय़ाला जात नाहीत. काही जण मात्र ‘हो हो.. मीच तो / ती’ असं बिनधास्त सांगतात. अशाचपैकी एक अक्षय कदमने ‘व्हिवा’शी बोलताना त्याचा पहिला ‘डेटिंग एक्सपिरिअन्स’ शेअर केला.

‘‘येस आय अॅम ऑन अॅन डेटिंग अॅप.. आणि त्यात मला काहीच वावगं वाटत नाही. ‘डेटिंग’चा अर्थ एकमेकांना भेटणं, गप्पा मारणं असाही असू शकतो. यातून दर वेळी गर्लफ्रेंड मिळवण्याचा उद्देशच असतो असं नाही. अर्थात अॅप वापरण्याची सुरुवात मात्र डेटिंगच्या गरजेवरूनच होत असते. मीसुद्धा ट्रली मॅडली नावाचं अॅप वापरतो. माझ्याशी मॅच होणाऱ्या मुलींची प्रोफाइल्स मी पाहिली आणि त्यातल्या काही जणींशी माझे छान सूर जुळले. हे नातं मत्रीपर्यंतच ठेवत याचं निखळ सौंदर्य तसंच ठेवायचं हा आमचा निर्णय ठरला. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून मला चांगल्या व्यक्तींना भेटायला मिळालं..

माझी पहिली डेट खूप छान होती. आम्ही एका कॉफी शॉपमध्ये भेटलो होतो. अॅपवर चॅटिंग करताना तिच्या बोलण्यातून जे काही माझ्या मनात आलं होतं, ती तशीच होती. अर्थात त्यात अर्धाएक प्लस-मायनस होतंच, पण असूनही नसल्यासारखंच! आमच्या पहिल्या भेटीत कोणत्याही प्रकारचा संकोचलेपणा नव्हता. (अर्थात हे असं माझं मत आहे, तीसुद्धा कम्फर्टेबलच असावी, असं तिच्या बोलण्यावरून वाटलं.) कॉफी शॉपमधलं वातावरण रोमँटिक वगैरे नव्हतं. तिथे कँडल लाइट नव्हता, लाल काय कुठल्याच रंगाचा गुलाबही नव्हता, हृदयात घंटी वाजली नाही की कुणी व्हायोलिन वाजवलं नाही पण काही तरी भन्नाट सुरू आहे याचा उत्साह चेहऱ्यावर होताच. अतिउत्साहच म्हणा ना! साचेबद्ध डेट नव्हतीच ती. एका क्षणाला तर असं वाटलं की, आम्ही फारच जुने मित्र आहोत.

‘एक्सपेक्टेशन व्हस्रेस रिअॅलिटी’ असं काही लकिली माझ्यासोबत झालं नाही. अगदी धम्माल गप्पा मारल्या आम्ही. ‘कॉफी आणि बरंच काही’ बोलत एकमेकांची खिल्लीही उडवली. कपडे, मेकअप, डोळे, आवाज, पर्सनालिटी हे असं तेच तेच बोलणं, वेळ पडल्यास खोटं बोलणं, फेमिनिझमचा मुद्दा उभा करणं हा झांगडगुत्ता नव्हता डेटवर. याउलट निखळ मैत्रीत येतात तशा कमेंट्स, गप्पा, गॉसिप, एकमेकांच्या आवडीनिवडींचे चॅटवर वाचलेले पण तरीही पुन्हा सांगावेसे- ऐकावेसे वाटणारे किस्से ही अशी ‘फुल्ल पॅक’ डेट होती. डेटमध्ये या गप्पांव्यतिरिक्त काहीही नव्हतं. तसं काही गरजेचंही नव्हतं, म्हणूनच माझी ही ‘सोशल डेट’, ‘स्पेशल डेट’ बनून गेली. त्यामुळे डेटनंतर ‘#हेट फेक पीपल’ असं काही स्टेटस पोस्ट करण्याची वेळ माझ्यावर आलीच नाही.. हुश्श्श!
या अनुभवामुळे पुढेही डेटिंग अॅपवर अॅक्टिव्ह राहिलो. या अॅपमुळे वेगवेगळ्या ठिकाणांच्या, प्रांतांतल्या मत्रिणीही भेटल्या. त्यांची संस्कृती, भाषा, सणवार यांबाबतही बरीच माहिती मिळाली. डेटिंग अॅप ही संकल्पना सॉल्लिड आहे. एका अर्थी माझं फ्रेंड सर्कल वाढलंय. हे माध्यम वापरताना कुणावर, किती, कधी विश्वास ठेवायचा; किती विसंबून राहायचं याकडे लक्ष असणं गरजेचं आहे. तुमचा दृष्टिकोनही महत्त्वाचा, कारण.. कुछ तो लोग कहेंगे.. लोगो का काम है कहना.. त्यामुळे अद्यापही सिंगल असणाऱ्या आणि िमगल होऊ इच्छिणाऱ्या दोस्तांनी एकदा तरी या ‘डेटिंग अॅप’चा अनुभव घ्यावाच.. कोण जाणे, नशीब कुठेही दडलेलं असू शकतं.’’

– अक्षय कदम
(शब्दांकन : सायली पाटील)

Story img Loader