विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरुन महायुती मोडीत निघाल्यानंतर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवसेनेऐवजी भाजपसोबत जाण्याचे पसंत केले. केंद्रात मंत्रीपद व सत्तेत वाटा मिळणार आहे, हे भाजपसोबत जाण्याचे एकमेव कारण नाही तर आठवले यांना सेनेपेक्षा भाजपचे सर्वसमावेशक हिंदुत्वही जवळचे वाटते आहे. इतकेच नव्हे तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुद्धाचेच विचार मांडत असल्याचाही साक्षात्कार झाला आहे.
महायुती तुटल्यानंतर आठवले यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्याची कारणेही त्यांनी जाहीरपणे सांगितली. त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळणार आहे आणि राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांच्या पक्षाला सत्तेत भरीव वाटा मिळणार आहे. भाजपला पाठिंबा देताना आठवले यांनी आणखी बराच सखोल विचार केला आहे. युती तुटल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच  प्रचारसभेत भाजपने हिंदूुत्वाला धुडकावले असा आरोप केला आणि शिवसेनाच हिंदुत्वाचा अजेंडा व झेंडा पुढे कशी घेऊन चालली आहे, याचा जाहीर उच्चार केला. साहजिकच आठवले यांच्यासमोर पाठिंबा देताना भाजपचे हिंदुत्व व सेनेचे हिंदुत्व होते. ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी त्यावरील त्यांची भूमिका मांडली.
पंतप्रदान नरेंद्र मोदी हे संविधानाप्रमाणे देशाचा कारभार करतात. इतकेच नव्हे तर ते बुद्धाचाच शांततेचा विचार मांडत आहेत. त्यांची भूमिका व्यापक व सर्वसमावेशक आहे, म्हणून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
– रामदास आठवले

Story img Loader