राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या निमीत्ताने नागपूरकरांना दोन दिग्गज खेळाडूंचा अंतिम सामना पाहण्याची संधी मिळणार आहे. महिला एकेरी प्रकारात भारताच्या आघाडीच्या खेळाडू पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे पुरुष एकेरी प्रकारात किदम्बी श्रीकांतसमोर एच. एस. प्रणॉयचं आव्हान असणार आहे.

अव्वल मानांकित सिंधूची उपांत्य फेरीत, दक्षिण आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद पटकावणाऱ्या रुथविका गड्डेशी गाठ पडली होती. २०१६ साली झालेल्या स्पर्धेत रुथविकाने सिंधूवर मात केली होती, त्यामुळे हा सामना रंगतदार होणार असा अंदाज सर्वांनी व्यक्त केला होता. अपेक्षेप्रमाणे रुथविकाने सामन्यात धडाकेबाज सुरुवात करत सिंधूला बॅकफूटला ढकललं. पहिला सेट २१-१७ या फरकाने जिंकत रुथविकाने सामन्यात सिंधूला धक्का दिला. मात्र यानंतर सिंधूने आपल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमधला सर्व अनुभव पणाला लावत २१-१५, २१-११ अशा फरकाने दुसरा आणि तिसरा सेट जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.

दुसरीकडे सायना नेहवालला दुसऱ्या उपांत्य फेरीत सामन्यात फारसा प्रतिकार झाला नाही. सायनाने पाचव्या मानांकित अनुरा प्रभुदेसाईचा २१-११, २१-१० अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. २००६ आणि २००७ साली सायनाने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळे अंतिम फेरीत आता सायना आणि सिंधूच्या लढतीत कोण बाजी मारेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.