प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉलिवूड अभिनेता हिमांश कोहलीशी ब्रेकअप झाल्यानंतर या ब्रेकअपची सर्वत्र चर्चा सुरु झाली. या चर्चेनंतर नेहाने सोशल मीडियावर एक पोस्ट करत मला जगू द्या, माझ्याविषयी मत बनवू नका असं म्हटलं होतं. त्यानंतर काही काळ गेल्यानंतर नेहा या दु:खातून सावरली असून तिने सोशल मीडियावर डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

काही दिवसापूर्वी नेहाने प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक मेल्विन लुईससोबत ‘लूडो खेलूंगी’ या गाण्यावर ठेका धरला होता. त्यानंतर ‘आंख मारे’ या गाण्यावरही तिने डान्स केला. तिचे हे दोन्ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या दोन्ही व्हिडिओनंतर नेहाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे तरुणाईमध्ये क्रेझ असलेल्या टिकटॉक या अॅपवर नेहाने तिचा व्हिडिओ केला आहे.

नेहाने पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिम्बा’ चित्रपटातील ‘आंख मारे’ गाण्यावर डान्स केला असून या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत एक लहान मुलगादेखील आहे. हे गाणं नेहानेच गायलं आहे. विशेष म्हणजे नेहा यात अॅक्टींगदेखील करताना दिसत आहे. त्यामुळे तिचा हा नवा व्हिडिओही चाहत्यांच्या पसंतीत उतरत आहे.

दरम्यान, नेहाने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे गाणे गायले आहे. यात ‘काला चश्मा’, ‘कर गई चुल’, ‘लंडन ठुमकदा’ ही तिची गाणी तुफान गाजली. विशेष म्हणजे संगीत क्षेत्रात वावरणारी नेहा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.

Story img Loader