२०१९ च्या निवडणुकांचं घोडामैदान जवळ आलं आहे. पुन्हा भाजपाच सत्तेवर येणार का? काँग्रेसची सत्ता येणार का? महाआघाडीचं काय होणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा होते आहे. अशात अमरावती येथील ज्योतिष परिषदेने नितीन गडकरी देशाचे पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी वर्तवली आहे. ज्योतिषी भूपेश गाडगे यांनी ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे ही भविष्यवाणी वर्तवली आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळणार नाही असेही भविष्य या परिषदेत वर्तवण्यात आले. भाजपाला मित्रपक्षांच्या मदतीने सहकार्याने सत्ता स्थापन करावी लागेल, असे झाल्यास नितीन गडकरींना पंतप्रधान म्हणून मिळेल अशी भविष्यवाणी या भविष्य परिषदेत वर्तवण्यात आली. गडकरी यांच्या ग्रह आणि पत्रिकेच्या आधारे २०१९ मध्ये त्यांना सर्वात मोठी संधी आहे असंही यामध्ये म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. यावेळीही मुख्य लढाई काँग्रेस विरूद्ध भाजपा अशीच असणार आहे. नरेंद्र मोदी VS राहुल गांधी अशीच ही लढाई असणार आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे. अशात आता नितीन गडकरी पंतप्रधान होतील अशी भविष्यवाणी ज्योतिष परिषदेने वर्तवली आहे. न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

याआधीही नितीन गडकरी हे पंतप्रधानपदाचे दावेदार असतील का? अशा चर्चा झाल्या आहेत. तसंच राजकीय वर्तुळात अजूनही अशी चर्चा आहे. मात्र आपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही हे गडकरींनी अनेकदा सांगितलं आहे. इतकंच नाही तर गडकरींच्या वक्तव्यांमुळे वादही निर्माण झाले आहेत. आता अमरावतीतल्या भविष्य परिषदेने मात्र गडकरींना पंतप्रधान होण्याची संधी आहे असे भविष्य वर्तवले आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये काय होणार? निकाल काय लागणार हे सगळे स्पष्ट व्हायचे आहे. मात्र भविष्य परिषदेने गडकरींबाबत महत्त्वाची भविष्यवाणी वर्तवली आहे.

Story img Loader