अभिनेता व दिग्दर्शक अंकुश चौधरी याचा ‘नो एन्ट्री पुढे- धोका आहे’ हा खास चमचमीत चित्रपट शुक्रवारी ७ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘झकास’च्या तडाखेबंद यशानंतर अंकुशचा हा महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याने तो स्वत: याबाबतीत खूपच आशादायी आहे. निव्वळ तीन तास धमाल आणि धमाल हाच आमचा उद्देश असल्याचे सांगून अंकुश यानिमित्ताने बोलताना म्हणाला की, प्रेक्षकांना सर्व टेन्शन विसरून केवळ खदखदून हसविण्याचे आम्ही ठरविले आहे. त्यामुळेच ‘नो एन्ट्री- पुढे धोका आहे’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. हिंदीतील ‘नो एन्ट्री’वर हा चित्रपट बेतलेला आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना अंकुश म्हणाला की, मुळातच नावसाधम्र्य असल्याने अनेकांना असेच वाटत असले तरी आमच्या चित्रपटाचा बाज व त्याची मांडणी वेगळ्या स्वरूपाची आहे. त्यामुळे हिंदीतील ‘नो एन्ट्री’ची ही कॉपी आहे असे म्हणणे चुकीचे आहे. या चित्रपटात अंकुशसह, भरत जाधव, अनिकेत विश्वासराव, सई ताम्हणकर, क्रांती रेडकर, मनवा नाईक यांच्या मुख्य भूमिका आहेत. विशेष म्हणजे सईने पहिल्यांदाच ‘बिकिनी’ स्वरूपात दृश्ये दिल्याने अनेकांच्या तोंडी तो चर्चेचा विषय बनला आहे.
सईचे म्हणणे असेही..
‘नोएन्ट्री – पुढे धोका आहे’तील सई ताम्हणकरच्या बिकिनीवर ‘कटाक्ष’ टाकताच काही तरी बरेवाईट बरेच जण बोलले, पण खुद्द सईचे म्हणणे काय?..
‘‘एकूण प्रतिक्रियांपैकी फक्त दोन टक्के मते प्रतिकूल आहेत, तशी ती असायचीच. तीदेखील स्वीकारायला हवीत. मला चित्रपटाबाबत विचारले गेले तेव्हा पहिल्या भेटीतच सांगितले गेले, मूळ चित्रपटातील बिपाशा बासूची भूमिका तुला करायची आहे, बिकिनीत दृश्य द्यायची तयारी असेल तर पुढे बोलू. अशा दृश्यासाठी भरपूर मानसिक तयारी लागते, ताकद लागते.
प्रत्यक्ष सेटवर कॅमेरा व बघे यांच्यामुळे नव्र्हस वाटता कामा नये. पण सर्व सहकलाकारांनी मला सांभाळले, प्रोत्साहन दिले. चित्रपटाची पूर्वप्रसिद्धी सुरू झाल्यावर हळूहळू सकारात्मक प्रतिक्रिया वाढल्या.
आता तर माझा चाहता वर्ग खूप वाढलाय. सांगलीला जाताना एक्स्प्रेसवेवर फूड मॉलला गाडी थांबताच आता पूर्वीपेक्षा जास्तजण वळून पाहतात. आठ वर्षांच्या कारकीर्दीनंतर एका महत्त्वाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचले..’’
भरत अजूनही पूर्वीसारखाच – क्रांती रेडकर
भरतबरोबर मी अनेक चित्रपट केले असले तरी सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘जत्रा’ चित्रपटातील ‘कोंबडी पळाली..’ या आम्हा दोघांवर चित्रित झालेल्या गाण्याने नवा इतिहास निर्माण केला त्यामुळेच याच चालीवर आधारित हिंदीत ‘चिकनी चमेली..’ हे गाणेही हिट झाले. ‘नो एन्ट्री..’च्या निमित्ताने आम्ही दोघे पुन्हा एकत्र आलो आहोत.
भरत हा पूर्वीसारखाच साधा, पण तेवढाच उत्साही असल्याचे क्रांती रेडकर हिने सांगितले. भरतबरोबर काम करताना मला नेहमीच आनंद होतो. कारण त्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात. कधीही यशाने तो हुरळून जात नाही, असेही क्रांती म्हणाली.