गतिमंद अर्थव्यवस्थेचे मुख्य कारण हे मंदावलेली उद्योगनिर्मिती असून, अर्थव्यवस्थेच्या वेगात अडथळे ठरणाऱ्या प्रकल्प-कोंडीला येत्या काही दिवसात मोकळे केले जाईल, अशा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी मंगळवारी व्यक्त केला. मुख्य पायाभूत प्रकल्पांसमोर असलेले अडथळे निश्चित करून त्यावर लवकरच मार्ग काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मागणी कमी असल्याने निर्मिती क्षेत्र वाढत नसल्याचे चित्र एकीकडे असून, दुसऱ्या बाजूला पोलाद, खनिज, कोळसा, ऊर्जा, जल आदी क्षेत्रांतील वाढ मंदावली असल्याचे अर्थमंत्र्यांनी नमूद केले. वाहन, भांडवली वस्तू यांची मागणी रोडावली असून, एकूणच निर्मिती क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. थेट विदेशी गुंतवणूक वाढविण्याचा निर्णय महिन्यातील तिसऱ्या आठवडय़ात होईल, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. निर्गुतवणुकीवरून वाद असलेल्या कोल इंडियातील भागविक्रीनंतर मिळणारा निधी सार्वजनिक कंपन्या/राष्ट्रीयीकृत बँकांमध्येच गुंतविला जाईल, याचीही ग्वाही त्यांनी दिली.
बँक परवाने वितरणासाठी निश्चित आकडा नाही
नव्या खासगी बँक परवाने वितरणासाठी सरकारने कोणताही निश्चित आकडा गृहित धरलेला नाही, असे स्पष्ट करतानाच अटींना जे पात्र ठरतील, तितक्या कंपन्यांना परवाने देण्यात येतील, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले. देशाला अधिक वित्तपुरवठा करणाऱ्यांची आवश्यकता आहे, असे निरीक्षणही त्यांनी नोंदविले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा