महाराष्ट्राच्या मित्रपक्षाने मराठी मातीत जन्मास घातलेलं आणि आता शेजारच्या मध्य प्रदेशात जाऊन थडकलेलं हे ‘करून दाखवले’ प्रकरण आता थेट केंद्रातही भाजपचा पिच्छा पुरवणार यात शंका नाही. तेव्हा काहीही करून हे प्रकरण कायमचे गाडून टाकले पाहिजे यासाठी भाजपने काही ठोस उपाययोजना आखल्या असून त्यापैकी महत्त्वाची जबाबदारी रामदास आठवलेनामक केंद्रीय राज्यमंत्री यांच्याकडे ‘स्वतंत्र कार्यभार’ म्हणून सोपविली असल्याची गुप्त माहिती आम्हांस काही स्रोतांकडून मिळालेली आहे. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीचा किंवा राजकीय घोषणेचा जनमानसावरील प्रभाव पुसून टाकावयाचा असेल तर त्याहून महत्त्वाची गोष्ट करून दाखवावी लागते किंवा त्याहून मोठी घोषणा करावी लागते. म्हणून तर आठवले सध्या जोरात कामाला लागले आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेस सत्तेवर येताच पहिल्या तासाभरातच मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करून टाकल्यावर भाजपचे कमल अधिकच कोमेजणार व तसे होणे आगामी निवडणुकीत हिताचे नसणार हे आठवलेंनी ओळखले आणि नरेंद्र मोदींनी साडेचार वर्षांपूर्वी जन्मास घातलेल्या व अन्य नेत्यांनी गाडून टाकलेल्या त्या ‘चुनावी जुमल्या’ला पुनर्जन्मास घातले पाहिजे हेदेखील आठवलेंना बरोबर आठवले. त्यांनी ते लगेचच करूनही दाखविले आहे. शेतकरी कर्जमाफीचा जनमानसावरील प्रभाव कमी करायचा असेल तर साडेचार वर्षांपूर्वीच्या त्या, ‘१५ लाख’वाल्या चुनावी जुमल्यास पुनर्जन्म घेण्यावाचून पर्याय नाही, हे सर्वात आधी आठवले यांच्या लक्षात आले. परदेशातील काळा पैसा परत आणला तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील, असे आश्वासन २०१४ मधील लोकसभा निवडणुकीआधी देऊन नरेंद्र मोदींनी जनतेची दिशाभूल केली, असा आरोप विरोधकांकडून होऊ लागल्यावर आणि आता तर नव्या निवडणुका तोंडावर येऊनही त्यापैकी काहीच पदरात – पक्षी : खात्यात- पडलेले नसल्याने बऱ्याचशा मतदारांनाही तसेच वाटू शकते हे लक्षात आल्याने, निवडणुकीच्या तोंडावर आठवले यांनी दाखविलेल्या या तत्परतेची भाजपमध्ये जोरदार चर्चा असल्याचेही या स्रोतांचे म्हणणे आहे. मोदींनी जाहीर केलेले ते १५ लाख रुपये टप्प्याटप्प्याने खात्यात जमा होणार असून त्यासाठी रिझव्र्ह बँकेशी सरकारची चर्चा सुरू आहे, असे आठवले यांनी गंभीरपणे इस्लामपूर येथे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले. ही बातमी अंधूकपणे माध्यमांवर उमटू लागली असली, तरी भाजपमधील त्याच्या प्रतिक्रिया मात्र गडद असणार आहेत. साडेचार वर्षांपूर्वीची ती वक्तव्ये म्हणजे गळ्यात अडकलेले हाडूक असून ते त्रासदायक ठरणार हे ओळखूनच, ‘तो तर केवळ चुनावी जुमला होता’ असे सांगून ते प्रकरण गाडून टाकण्याचा प्रयत्न जेटली, गडकरी व खुद्द भाजपाध्यक्ष शहांनी केला होता. आता निवडणुका पुन्हा तोंडावर आल्याने पुन्हा एकदा एक गाजर मतदारास दाखवावे लागेल हे ओळखून आठवलेंनी जुना जुमला पुन्हा जिवंत केला आहे. पुनर्जन्म घेतलेला हा जुना जुमला पुन्हा एकदा मानगुटीवर बसणार, की गळ्यात अडकणार या गणिताची आठवलेकृत उत्तरे जाणून घेण्यासाठी भाजप आता उत्सुक असेल.
जुन्या ‘जुमल्या’चा पुनर्जन्म!
१५ लाख’वाल्या चुनावी जुमल्यास पुनर्जन्म घेण्यावाचून पर्याय नाही, हे सर्वात आधी आठवले यांच्या लक्षात आले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 19-12-2018 at 01:31 IST
Web Title: Old jumla reborn