करोनाचा प्रादुर्भाव आत्ता कुठे कमी होत असल्याची चिन्हे दिसत असतानाच आता करोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. दक्षिण आफ्रिकेसह बोट्स्वाना, हाँगकाँग या भागात आढळून आलेल्या करोनाच्या ओमिक्रोन या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरातल्या सर्वच देशांची चिंता वाढली आहे. भारतातील महत्त्वाची वैद्यकीय संस्था असलेल्या एम्सने गंभीर इशारा दिला आहे. राज्यात देखील हा नवीन व्हेरिएंट रोखण्यासाठी तयारी सुरु झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. तसेच मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत याबाबत बैठक घेतील, असे देखील त्यांनी सांगितले.
परदेशातील येणाऱ्या विमानांबाबतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे अजित पवार म्हणाले. ते पुण्यात करोना आढावा बैठकीत बोलत होते. अजित पवार म्हणाले, “आपल्याकडे परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे. द्या पंतप्रधान देशाती मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. राज्यात नवीन व्हेरिएंट आला तर काही बंधन आणावी लागतील अशी स्थिती आहे. सध्या पुणे जिल्ह्यात समारंभांसाठी ५० टक्के उपस्थितीचे बंधन हटवण्यात आले आहे. आता शाळा देखील पूर्ण क्षमतेने सुरू करत आहोत. तसेच १ डिसेंबर पासून सिनेमागृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत.”
जम्बो कोविड सेंटर ३१ डिसेंबर पर्यंत सुरू ठेवणार
“पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील जम्बो कोविड सेंटर ३१ डिसेंबर पर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यावेळी आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तसेच सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवला नियमांचे पालन करून परवानगी असणार आहे. विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत केंद्र सरकार जी नियमावली तयार करेल तिचे पालन केले जाईल.”, अशी माहिती देखील अजित पवार यांनी दिली.
एसटी संपाबाबत अजित पवार म्हणाले…
एसटी संपाबाबत अजित पवार म्हणाले, “कुठलीच गोष्ट तुटेपर्यंत तानायची नसते. एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करत असताना प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचा विचार करावा लागेल. बाकीच्या राज्यात मिळणाऱ्या पगाराच्या जवळपास एसटी कर्मचाऱ्यांना आणलं आहे. ते नोकरीला लागले तेव्हा सरकारी नोकरीत लागले नव्हते. आता हा विषय संपवला पाहिजे. सरकार एक दोन पावले पुढे आले असून त्यांनी देखील पुढे आल पाहिजे.”