मुंगी अगदी छोटासा कीटक; अतिशय शिस्तबद्ध, सांघिक वृत्ती यासाठी प्रसिद्ध. या मुंग्यांच्या अंगी असलेले अनेक गुण आता संशोधनातून सामोरे आले आहेत. याच मुंग्यांवर गेली वीस वर्षे काम करणारे डॉ. हिमेंदर भारती यांचे नाव मुंग्यांच्या एका प्रजातीला देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
जम्मू काश्मीरमधील पिरपांजाल हिमालयातील पर्वतराजीत शोधण्यात आलेली मुंग्यांची एक प्रजात संशोधन निबंध प्रसिद्ध करण्यापूर्वीच्या प्रक्रियेत त्यांच्याकडे पाठवण्यात आली होती; पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मुंगीला त्यांचेच नाव देण्यात आले आहे. असा बहुमान एखाद्या वैज्ञानिकासाठी देवदुर्लभच. या मुंगीचे नाव आहे लेप्टोजेनीस भारती. डॉ. भारती हे पतियाळातील पंजाब विद्यापीठात प्राणिशास्त्र व पर्यावरण विज्ञान विभागाच्या ‘अँट सिस्टीमॅटिक्स अँड मॉलिक्युलर बायोलॉजी’ या संस्थेत वैज्ञानिक म्हणून काम करतात. पिरपांजालमध्ये शोधण्यात आलेली मुंगी ११-१२ मि.मी. लांबीची आहे. ती शोधली आहे ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ टेंपरेट हॉर्टिकल्चर’ या श्रीनगरमधील संस्थेचे डॉ. शाहीद अली अकबर यांनी. त्यांचा या मुंगीबाबतचा शोधनिबंध ‘बायोडायव्हर्सिटी डाटा जर्नल’मध्ये प्रसिद्ध झाला. या मुंगीला नाव कुठले द्यायचे, असा प्रश्न पडला तेव्हा त्यांनी डॉ. भारती यांचे नाव देण्याचे सुचवले व नंतर तो शोधनिबंधही तपासणीसाठी डॉ.भारती यांच्याकडे आला तेव्हा त्यांना या मुंगीच्या प्रजातीस आपलेच नाव देण्यात आल्याचे समजले. नव्या मुंगीचा शोध मॉर्फालॉजी तंत्राने लावण्यात आला. डॉ. हिमेंदर भारती व त्यांच्या विद्यार्थ्यांनी भारतातील मुंग्यांच्या एकूण ७७ नव्या प्रजाती शोधल्या असून त्यातील २२ पश्चिम घाटातील आहेत. त्यांनी आग्नेय आशियातील व्हिएतनाम, मलेशिया व चीन या देशांतील आणखी चार नव्या प्रजाती शोधल्या आहेत. पंजाब विद्यापीठात त्यांनी मुंग्यांची संदर्भसूचीच तयार केली असून त्यांच्याकडे भारत व इतर देशांतील मुंग्यांच्या एक हजार प्रजातींचे नमुने आहेत. मूळ संशोधकांनी त्यांना ते दिलेले आहेत, यावरून त्यांच्याविषयी जगभरातील संशोधकांना असलेला आदरही दिसून येतो. डॉ. हिमेंदर भारती यांचे संशोधन मुंग्यांची जीवनशैली, परिसंस्था, त्यांचे उत्क्रांतीतील स्थान, जंगलांच्या संवर्धनात मुंग्यांची भूमिका असे खूप व्यापक आहे. मुंग्यांच्या अभ्यासाची मिरमेकॉलॉजी नावाची एक शाखा आहे, त्यातील ते अग्रणी संशोधक आहेत.