परीक्षा पद्धतीत सुधार करण्यासंबंधी कुलपतींच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या दृष्टीने नागपूर विद्यापीठाने पावले उचलली आहेत. राज्यातील विविध विद्यापीठांतील पेपर फूट प्रकरण आणि परीक्षेतील गैरप्रकारावराला आळा घालण्याच्या दृष्टीने कुलपतींच्या निर्देशानुसार माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्च स्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने एकूण ४३ शिफारशी केल्या असून नागपूर विद्यापीठाच्या मंगळवारच्या बैठकीत या शिफारशींवर चर्चा करून त्याच्या अंमलबजावणीचे टप्पे करण्यात आले. परीक्षा पद्धतीत सुधार घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त उपयोग करणे हा अग्रवाल यांच्या समितीने केलेल्या शिफारशींचा मुख्य गाभा आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ. महेशकुमार येंकी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती अभियांत्रिकी, एमबीए आणि एमसीए महाविद्यालयातील पायाभूत सुविधांचा ऑनलाईन परीक्षा पद्धती हाताळण्यासंबंधी तपासणी करून येत्या १५ दिवसांत परीक्षा मंडळाला अहवाल सादर करणार आहे. प्रकुलगुरू डॉ. महेशकुमार येंकी यांच्यासह डॉ. के.सी. देशमुख, डॉ. क्षीरसागर आणि डॉ. सिद्धार्थ काणे यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे.
उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी २०१३-१४च्या पहिल्या सत्रापासून लागू करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न राहील. दुसऱ्या टप्प्यात ज्या शिफारशी विद्यापीठाला लागू करणे शक्य नाहीत किंवा काही अडचणी येतील त्या शासनाला कळवण्यात येणार आहेत. तसेच काही शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी कायद्यातच तरतूद करावी लागणार आहे. पहिला टप्पा म्हणून विचार केल्यास काही शिफारशी तर येत्या शैक्षणिक सत्रात सहज लागू करणे विद्यापीठाला शक्य आहे. त्यासाठीच मंगळवारच्या परीङा मंडळाच्या बैठकीत चर्चाही झाली आणि डॉ. येंकी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने स्थापन करण्यात आली. त्यातही विद्यापीठाने ऑनलाईन अर्ज भरणे किंवा हॉल तिकिट ऑनलाईन देण्यासारखी कामे आधीच सुरू केली आहेत.
खास करून अभियांत्रिकी, एमबीए आणि एमसीए असलेल्या महाविद्यालयांमध्ये ऑनलाईन परीक्षाविषयक कामे लवकर होण्याच्यादृष्टीने पायाभूत सुविधा जास्त असल्याने याच महाविद्यालयांतील पायाभूत सुविधांचा कितपत उपयोग करून घेता येईल, याची माहिती गोळा करून तो अहवाल कुलगुरूंना सादर करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा