बरीच आदळआपट केल्यावरही मायक्रोसॉफ्टच्या हाती फारसं काही लागलं नाही. खरं तर आपल्या विरोधकाला संपूर्णपणे नेस्तनाबूत करण्याच्या कौशल्यात मायक्रोसॉफ्टचा हात कोणी धरू शकला नसता, पण ओपन सोर्स व्यवस्थेबद्दलचे तिचे आडाखे व या व्यवस्थेविरोधातले तिचे डावपेच जवळपास फसले..
लिनक्स आणि ओपन सोर्स व्यवस्था जशी मुख्य प्रवाहात आपले स्थान बळकट करत होती, तशा प्रामुख्याने दोन गोष्टी समांतरपणे घडत होत्या ज्यामुळे तिला मुख्य धारेत स्थिरावयाला अजून मदत होत होती. एक म्हणजे इंटरनेट युगासाठी उपयुक्त ठरतील असे सॉफ्टवेअर प्रणालींचे प्रकल्प लिनक्सप्रमाणेच ओपन सोर्स पद्धतीने सुरू होत होते व त्यांना लक्षणीय यशही प्राप्त होत होते. अपॅची वेब सव्र्हर, नेटस्केप ब्राऊझर, मायएसक्यूएल डेटाबेस ही त्यातील काही ठळक उदाहरणं!
दुसरं म्हणजे संगणक क्षेत्रातील दिग्गज कंपन्या ओपन सोर्स सॉफ्टवेअरला उघड पाठिंबा देत होत्या. संगणकीय हार्डवेअरचं उत्पादन करणाऱ्या आयबीएम, डीईसी, एचपी, डेलसारख्या कंपन्यांनी लिनक्सला आपल्या सव्र्हरवर प्रमाणित करून घेतले होते. त्याचबरोबर कंपन्यांच्या कार्यक्षमतेत मोलाची भर टाकू शकतील अशा अॅप्लिकेशन सॉफ्टवेअरची निर्मिती करणाऱ्या एसएपी, ओरॅकलसारख्या कंपन्यांच्या सॉफ्टवेअर प्रणाली लिनक्सवर विनासायास चढवता येऊ लागल्या होत्या.
अशा वेळेला, जेव्हा ओपन सोर्स व्यवस्थेची विश्वासार्हता व्यावसायिक जगात कैक पटीने वाढत होती व संगणक क्षेत्रातील बरेचसे घटक तिला समर्थन देत होते. एक कंपनी मात्र लिनक्स व ओपन सोर्स व्यवस्थेला आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू मानून तिला कडवा विरोध करीत होती. ही कंपनी म्हणजे सॉफ्टवेअर जगतातील अनभिषिक्त सम्राट -मायक्रोसॉफ्ट!
आपल्या स्थापनेपासूनच मायक्रोसॉफ्ट प्रोप्रायटरी विचारांची कट्टर समर्थक होती. सॉफ्टवेअरच्या खुल्या देवाणघेवाणीला तिचा पहिल्यापासूनच कडवा विरोध होता. १९७६ सालात, जेव्हा लिनक्सच्या जन्माला अजून बराच अवकाश होता व ‘ओपन सोर्स’ हा शब्दही कोणाला माहिती नव्हता. एवढंच काय, जेव्हा हार्डवेअर व सॉफ्टवेअर असा भेदही फारसा स्पष्ट नव्हता, अशा वेळेला बिल गेट्सने हौशी संगणक तंत्रज्ञांना लिहिलेल्या खुल्या पत्राने (‘ओपन लेटर टू हॉबीस्ट’) एकच खळबळ उडवून दिली होती.
तो काळ संगणकीय हार्डवेअरच्या ऐन बहराचा होता. १९७५ साली मिट्स कंपनीने आणलेल्या अल्टेअर नामक संगणकीय संचाने क्रांतीच घडवली होती. मेनफ्रेम व लघुसंगणकांपेक्षा पुष्कळ स्वस्त असल्यामुळे व हार्डवेअर आरेखन खुले असल्यामुळे, अनेक हौशी संगणक तंत्रज्ञांनी वैयक्तिक वापरासाठी त्यास खरेदी केले होते . अल्टेअर हा केवळ हार्डवेअर संच असल्याने, तो चालविण्यासाठी सॉफ्टवेअरची गरज होती. मायक्रोसॉफ्टचा नुकताच जन्म झाला होता व तिच्या ‘बेसिक’ नावाच्या सॉफ्टवेअर प्रणालीने सर्वाचे लक्ष वेधून घेतले होते. अल्पावधीतच बेसिक ही अल्टेअर संच चालविण्यासाठीची सर्वात लोकप्रिय प्रणाली बनली.
हे हौशी संगणक तंत्रज्ञ त्यांनी स्थापलेल्या क्लब्सच्या माध्यमातून नित्यनियमाने भेटत असत व विचारांच्या आदानप्रदानाबरोबरच बेसिक प्रणालीचीही मुक्तपणाने देवाणघेवाण होत असे. त्या काळात सॉफ्टवेअर हे हार्डवेअरसोबतच वितरित होत असल्याने सॉफ्टवेअरला काही वेगळे मूल्य असू शकते हे कोणाच्या गावीही नव्हतं.
पण संगणकीय हार्डवेअर संचांच्या उतरणाऱ्या किमती व होणाऱ्या प्रमाणीकरणामुळे येणारा काळ हा सॉफ्टवेअरचा असणार हे बिल गेट्सच्या चाणाक्ष बुद्धीने ताडलं होतं. आपल्या कंपनीच्या मालकीच्या सॉफ्टवेअरची देवाणघेवाण, मायक्रोसॉफ्टला ते सॉफ्टवेअर वापरण्याच्या रॉयल्टीसाठी एक छदामही न मिळता अशी मुक्तहस्ते चालली आहे हे जेव्हा बिल गेट्सला समजलं तेव्हा ते त्यास जराही रुचलं नाही व त्याने या समुदायास एक खुलं पत्रच लिहिलं.
या पत्रात त्याने हौशी तंत्रज्ञांवर बेसिक सॉफ्टवेअरच्या चौर्याचा सरळसरळ आरोप केला व त्यांचे हे कृत्य बौद्धिक संपदा नियमांची कशी उघडउघड पायमल्ली करीत आहे हेसुद्धा सांगितलं. सॉफ्टवेअरचा कॉपीराइट हक्क मायक्रोसॉफ्टकडे असल्याने त्याच्या प्रत्येक वितरणासाठी कंपनीला रॉयल्टी शुल्क मिळालेच पाहिजे, असेही ठासून प्रतिपादन केले. पुढे आयबीएम पीसीच्या आगमनानंतर अल्टेअर संच मागे पडले व हा वादही जास्त ताणला गेला नाही; पण सॉफ्टवेअर क्षेत्र बाल्यावस्थेत असताना झालेल्या या वादातून मायक्रोसॉफ्टच्या ओपन सोर्स विरोधी भूमिकेची बीजं सापडतात.
खरं सांगायचं तर, मायक्रोसॉफ्टचा लिनक्स व एकंदरीतच ओपन सोर्स व्यवस्थेबद्दल विरोध पुष्कळ उशिरा सुरू झाला. लिनक्सच्या जन्मानंतर अनेक वर्षांपर्यंत मायक्रोसॉफ्टने तिला आपला प्रतिस्पर्धी मानलाच नाही. ९०च्या दशकात मायक्रोसॉफ्टची वाढ एवढी झपाटय़ाने होत होती की, तिच्या लेखी लिनक्स व ओपन सोर्स व्यवस्थेला ‘समविचारी तंत्रज्ञांचा फावल्या वेळात चाललेला प्रयोग’ एवढेच महत्त्व होते. विण्डोज ऑपरेटिंग प्रणाली व्यावसायिक तसेच वैयक्तिक स्तरावरची प्रमाण ऑपरेटिंग प्रणाली बनली होती. त्यामुळे लिनक्सची झेप फार तर शैक्षणिक विद्यापीठं व संशोधन संस्था एवढय़ापुरतीच मर्यादित राहील अशी मायक्रोसॉफ्टची अटकळ होती.
१९९८-९९ नंतर मायक्रोसॉफ्टची ही अटकळ सपशेल चुकीची ठरली. लिनक्सचं विण्डोजपुढे तांत्रिक श्रेष्ठत्व सिद्ध व्हायला लागलं होतं. तिला आघाडीच्या सव्र्हर हार्डवेअर कंपन्यांचं पाठबळ मिळत होतं. तिच्याभोवती विविध बिझनेस मॉडेल्स तयार व्हायला लागली होती व मुख्य म्हणजे सोर्स कोड खुला असल्याने रॉयल्टी शुल्क देण्याचीदेखील (मायक्रोसॉफ्टच्या सॉफ्टवेअरसारखी) काहीच गरज नव्हती.
बघता बघता सव्र्हर हार्डवेअरवर चालणाऱ्या ऑपरेटिंग प्रणालीसाठी लिनक्सला प्राधान्य देण्यात यायला लागलं. डेस्कटॉप पीसीवरची मायक्रोसॉफ्टची पकड अजूनही मजबूत असली तरीही सव्र्हर ऑपरेटिंग प्रणाली क्षेत्रात तिच्या वर्चस्वाला लिनक्समुळे आचके बसायला सुरुवात झाली होती. २००० सालापर्यंत मायक्रोसॉफ्ट हे उमजून चुकली होती की, लिनक्स व ओपन सोर्स व्यवस्थेला हलकं लेखण्याची चूक तिला महागात पडली आहे. इथून पुढे मायक्रोसॉफ्टने ओपन सोर्स सॉफ्टवेअरविरोधात कडवा संघर्ष सुरू केला व मिळेल त्या व्यासपीठावर लिनक्सविरोधात विखारी टीका करण्यास सुरुवात केली.
मायक्रोसॉफ्टने पहिला हल्ला हा ओपन सोर्स व्यवस्थेच्या तत्त्वांवर केला. ‘‘ओपन सोर्स हा बौद्धिक संपदा हक्कांचा विनाशक आहे व त्यामुळे संपूर्ण सॉफ्टवेअर व्यवसाय लयाला जाऊ शकतो,’’ असे विधान मायक्रोसॉफ्टच्या विण्डोज प्रकल्पाचा संचालक असलेल्या जिम ऑलचिनने २००१ साली एका परिषदेत केले. याहूनही खळबळजनक विधान २००१ सालच्या उत्तरार्धात मायक्रोसॉफ्टचा मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या व अतिशयोक्त आणि बेजबाबदार विधानं करण्यासाठी (कु)प्रसिद्ध असलेल्या स्टीव्ह बामरने केले. त्याने लिनक्स व जीपीएल लायसन्सिंग पद्धतीला थेट ‘कॅन्सर’ असे संबोधले व हेही म्हटले की, ज्या ज्या सॉफ्टवेअरला लिनक्स स्पर्श करते तिलाही ती कॅन्सरने ग्रासते. बामरचा रोख हा मुख्यत: जीपीएल पद्धतीमधल्या ‘व्हायरल क्लॉज’कडे होता.
मायक्रोसॉफ्ट एवढय़ावरच गप्प बसली नाही. लिनक्सविरोधात कॉपीराइट उल्लंघनाची एखादी फिर्याद न्यायालयात दाखल करता येईल का याचीदेखील चाचपणी तिने सुरू केली. तसेच जगभरातल्या सॉफ्टवेअर तंत्रज्ञ व प्रोग्रामर्समध्ये तसेच आपल्या ग्राहकांमध्ये व अमेरिकन शासन स्तरावर मायक्रोसॉफ्टने लिनक्सबद्दल भय व अनिश्चितता वाढवून एक संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. विकसनशील देशांत ओपन सोर्सने हातपाय पसरू नयेत म्हणून आपल्या सॉफ्टवेअर प्रणाली जवळपास मोफत देण्याचीदेखील तयारी दर्शवली.
एवढी सगळी आदळआपट केल्यावरही मायक्रोसॉफ्टच्या हाती फारसं काही लागलं नाही. खरं तर आपल्या विरोधकाला संपूर्णपणे नेस्तनाबूत करण्याच्या कौशल्यात मायक्रोसॉफ्टचा हात कोणी धरू शकला नसता (व आजही धरू शकणार नाही.), पण ओपन सोर्स व्यवस्थेबद्दलचे तिचे आडाखे व या व्यवस्थेविरोधातले तिचे डावपेच जवळपास फसले. महात्मा गांधींचं सत्याग्रहाच्या माध्यमातून इंग्रजांवर मिळवलेल्या विजयासंदर्भातलं एक वाक्य प्रसिद्ध आहे – “First they ignore you, then they laugh at you, then they fight you and then you win” (सर्वप्रथम ते तुम्हाला दुर्लक्षतील, मग ते तुमच्यावर हसतील, मग तुमच्या विरोधात लढतील, पण अंतिम विजय तुमचाच आहे.) मायक्रोसॉफ्टच्या ओपन सोर्सविरुद्धच्या लढय़ाचा याहून समर्पक सारांश करता येणार नाही. मायक्रोसॉफ्टच्या फसलेल्या डावपेचांमागच्या कारणांचा व गेल्या दशकभरात ओपन सोर्सप्रति बदललेल्या मायक्रोसॉफ्टच्या दृष्टिकोनाचा आढावा आपण पुढील लेखात घेऊ.