पंकजा मुंडे यांचा आरोप

बीड : राष्ट्रवादी काँग्रेसला वाळवी लागली असून राज्याचा नेता होण्याचे स्वप्न बघणाऱ्याने विरोधी पक्षनेता करण्यासाठी पुढाकार घेतलेल्या मित्राचीच उमेदवारी कापून शेतकरी पुत्र म्हणवणाऱ्याला बळीचा बकरा बनवले आहे. हिंमत असेल तर इतरांचा बळी देण्याऐवजी स्वत लोकसभेच्या निवडणुकीला उभे राहायचे होते, अशा शब्दात मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची तोफ डागली. नाक पुसता येत नव्हते तेव्हा दिवंगत मुंडेंनी धनंजयला भाजयुमोचा अध्यक्ष केले. तेव्हा कुठे मेरिट गेले होते. स्वतच्या वडिलांचे होऊ शकले नाहीत, ते जनतेचे काय होणार, अशा प्रखर शब्दात टोला लगावला.

बीड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सोमवारी रात्री प्रचाराची पहिली सभा झाली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री महादेव जानकर, राम शिंदे, अर्जुन खोतकर, आमदार सुरेश धस, रमेश आडसकर यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी  धनंजय मुंडे यांच्या आरोपांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. राष्ट्रवादीच्या विरोधी पक्षनेत्याने  अमरसिंह पंडितांची उमेदवारी ऐनवेळी कापून साखर कारखानदार असलेल्या शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांना दिली. अमरसिंह पंडितांनी पुढाकार घेऊन विरोधी पक्षनेते पदावर बसवले होते. त्याच मित्राच्या पाठीत खंजीर खुपसला. पंडित आपले विरोधक असले तरी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशावर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेत्याने वडील पंडित अण्णा मुंडेंना राष्ट्रवादीत पाठवून स्वत: अलिप्त राहिले. जे स्वतच्या वडिलांचे होऊ शकले नाहीत ते इतरांचे कसे होणार, असे सांगत इतरांचा बळी देण्यापेक्षा लोकसभा निवडणुकीच्या मदानात धनंजय मुंडे यांनीच उतरावे, असे आवाहन त्यांनी केले.

वाघिणीची शिकार गुलेरने करायची नसते. मी वडिलांसाठी गड बांधला, तुम्ही साधा चौथरा तरी बांधला का, असा थेट सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसला तुमच्या पायगुणाने वाळवी लागली. जिल्ह्यातील एकमेव आमदार जयदत्त क्षीरसागर यांना तुम्ही पक्ष सोडण्याच्या सीमेवर आणून ठेवले आहे. आम्ही काय विकास केला, हे विचारता, तुम्ही सत्ताधारी पक्षात असताना काय केले, याचा हिशेब द्या. खासदार प्रीतम मुंडेंचे मेरिट विचारता. नाक पुसता येत नव्हते तेव्हा दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी तुम्हाला युवा मोर्चाचे अध्यक्ष केले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केले, आमदार केले. तेव्हा कुठे गेले होते मेरिट, अशा शब्दात तोफ डागली. परळी-बीड-नगर रेल्वे वेशीवर आली असून लवकरच पूर्णत्वाकडे जाईल आणि याच रेल्वेत उरली सुरली राष्ट्रवादी काँग्रेस डब्ब्यात बंद करून पाठवून देऊ, असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रवादीचे माजलगाव मतदारसंघातील छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहन जगताप यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला.

धनंजय मुंडे पक्षविरोधी नेते – सुरेश धस

राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पक्षातील लोकांनाच बाजूला काढण्याचे यशस्वी प्रयत्न चालवले आहेत. मी बाहेर पडल्यानंतर माजी आमदार अमरसिंह पंडित यांनाही हात दाखवला. त्यामुळे ते विरोधी पक्षनेते नसून, पक्षविरोधी नेते झाले आहेत. त्यांना पट्टीवडगाव जिल्हा परिषद गटातून एकदाच गुलाल लागला. त्यानंतर त्यांची आणि गुलालाची भेटच नाही. यावेळीही लोकसभा निवडणुकीत गुलाल लागणार नाही हे माहीत असताना त्यांनी बजरंग सोनवणे या गरीब मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा बळी दिला आहे असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला.

Story img Loader