महाविद्यालयात कलागुणांना मिळणारा वाव आणि त्यांचा विकास यांच्यातूनच विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्याचा पाया रोवला जातो. महाविद्यालयांमध्ये दर वर्षी भरवल्या जाणाऱ्या महोत्सवातून या प्रक्रियेला सुरुवात होते आणि विद्यार्थ्यांच्या अंगीभूत  गुणांच्या विकासाला सुरुवात होते. महाविद्यालयाचा महोत्सव एकत्रितरीत्या साजरा केला जात असला तरी त्याचे नियोजन प्रत्येक विभाग स्वतंत्र पातळीवर करीत असतात. महोत्सव एक असला तरी त्याचे उद्देश स्वतंत्र असतात.

अनेक महाविद्यालयांच्या प्रांगणात सध्या मंडप, फलक, फुलांच्या माळा आणि रोषणाईच्या तोरणांचा चमचमाट दिसत आहे. महोत्सवांना मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तारकांची उपस्थिती ही लक्षणीय बाब म्हणावी लागेल. त्यामुळे महाविद्यालयाच्या वातावरणात उत्साह भरला आहे. साधारण डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात प्रत्येक महाविद्यालयात महोत्सवांना सुरुवात होते. हे महोत्सव यशस्वी करण्यासाठी अनेक हातांना काम मिळते. याचशिवाय अनेकांच्या मेंदूतून भन्नाट कल्पना जन्माला येतात. महाविद्यालयाचा महोत्सव म्हणून व्यापक जाणीव आणि विभागाचा महोत्सव म्हणून स्वतंत्र जबाबदारी घेऊन अनेक विद्यार्थी दिवसातले १२ ते १६ तास झटत असतात. अर्थातच महाविद्यालयाच्या व्याप्तीवर महोत्सवाचा जल्लोश अवलंबून असतो.

यात विद्यार्थी महोत्सव म्हणून एकत्रित आणि विभागाचे योगदान म्हणून स्वतंत्र काम करण्यासाठी कार्यक्रम आखतात. समग्र महोत्सव यशस्वी कसा करायचा, यावर अधिक भर असला तरी आर्थिक गणिते पक्की करताना वैयक्तिक पातळीवर ‘मार्केटिंग स्किल’ला अधिक महत्त्व दिले जाते. म्हणजेच जाहिराती मिळवणे, प्रायोजक नक्की करणे यासाठी विद्यार्थ्यांमध्ये एक सुप्त स्पर्धा लागलेली असते. यात महोत्सवातील रंजकता वाढविण्यासाठी शकली लढवल्या जातात. बाहेरील विद्यार्थ्यांची गर्दी कशी खेचता येईल, हा त्यामागील उद्देश असतो. या गर्दीचे अर्थशास्त्र असते. ते प्रायोजकांना फार महत्त्वाचे असते. त्यानुसार याची सगळी गणिते आखली जातात. यात विद्यार्थ्यांचा इतर विभागांपेक्षा वरचढ राहण्याचा प्रयत्न अधिक असतो.

खरे तर विभागाविभागांतील स्पर्धा ही आता तशी उघडच आहे. म्हणजे याआधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपुरतीच महोत्सवाची संकल्पना सीमित होती. आता ती सामान्य नागरिकांनाही सामावून घेण्याइतपत वाढली आहे. यासाठी विद्यार्थ्यांमधील आयोजक निवडले जातात. संयोजन पातळीवर वैद्यकीय शिबीर, विविध क्षेत्रांतील नावाजलेल्या व्यक्तींची चर्चासत्रे ठेवली जातात. महाविद्यालयाबाहेरील वर्ग महोत्सवांना हजर राहून त्यात रमला जावा, हा त्यामागील उद्देश असतो.

प्रायोजक मिळविण्यात विद्यार्थ्यांचे कसब पणाला लागते. यात महत्त्वाचे म्हणजे गतवर्षी लाभलेला प्रायोजक पुढेही कायम राहावा यावर अधिक भर असतो. इतका की तो आपल्याच महाविद्यालयाच्या दुसऱ्या विभागाकडे जाऊ  नये यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. याशिवाय अन्य प्रायोजकालाही कोणत्या पद्धतीने बाटलीत उतरवता येईल, यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जातात.

महोत्सवासाठी प्रत्येक विभागाला कामाची वाटणी करून दिलेली असते. या त्यांच्या वाटय़ाला आलेल्या कार्यक्रमाला मुख्य महोत्सवापेक्षा कशी अधिक प्रसिद्धी मिळेल, यासाठी विद्यार्थ्यांची खटपट सुरू असते. यात समाजमाध्यमे, वर्तमानपत्रे यांचा आधार घेतला जातो. समाजमाध्यमांवरील प्रसिद्धी ही एकवेळ सोपा पर्याय ठरला आहे. परंतु महोत्सवाला वृत्तपत्रात प्रसिद्धी देणे मुख्य प्रायोजकांना आपल्याकडे वळवून घेण्यावर विद्यार्थी ‘वर्क आऊट’ करीत असतात.

साहित्य कला, ‘फाइन आर्ट’ आणि ललित कला यांच्यातील स्पर्धासाठीही प्रायोजक शोधण्यात येतात. स्पर्धासाठी आर्थिक पाठबळ ही एक महत्त्वाची बाब असते. मुंबईतील महाविद्यालयांत विभागाचा वैयक्तिक महोत्सव साजरा करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे.

जागेची अडचण

अशी सारी तयारी आणि कामाचे आराखडे आखले गेले असेल तरी महाविद्यालयातील जागा ही सतावणारी गोष्ट आहे. तीन वा दोन दिवस महोत्सव चालतात; परंतु महाविद्यालयातील मर्यादित जागेचा वापर करूनच ते साजरे करावे लागतात. यात दोन वा तीन विभागांच्या तारखा एकच असल्यास विद्यार्थ्यांमधील लढाईला सुरुवात होते. मग अशा परिस्थितीत वेळ आणि जागेचे उपयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये सामंजस्य कसे राहील, यावर विभागप्रमुख भर देतात आणि ‘भांडणे’ मिटवतात.

रुईया महाविद्यालयाच्या आरोहण उत्सव महोत्सवाच्या साहित्य कला गटात मी काम करते. यातील कार्यक्रमांसाठी आम्ही गेली दोन महिने झटत आहोत. आमच्या गटातील स्पर्धाचे नियम ठरवणे ते राबविण्यासाठी वर्गाची नोंद करणे, मुख्य कार्यक्रमांशिवाय गटाच्या कार्यक्रमांची प्रसिद्धी करणे, अशी कामे साहित्य कलांसाठीचा गट करीत असतो. याशिवाय प्रत्येक विभाग जमेल तशी प्रसिद्धी देण्यात गुंतलेला असतो आणि स्वतंत्ररीत्या काम करण्यात काहीच चूक नाही.

– शिवानी जठार,  आरोहण उत्सव, रुईया महाविद्यालय.

महाविद्यालयाचा उद्देश हा जरी मुख्य महोत्सवाची प्रसिद्धी करणे हा असला तरी बऱ्याचदा मुख्य महोत्सवांतर्गत येणाऱ्या स्पर्धाचीही प्रसिद्धी आम्ही करतो. स्वतंत्ररीत्या राबवल्या जाणाऱ्या स्पर्धासुद्धा तितक्याच ताकदीने लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असते.

– सायली, बृहाहा सिडनॅम महाविद्यालय.

बीएमएस विभागाचा ‘सिनर्जी’ या महोत्सवाच्या तारखा आणि महाविद्यालयातील विज्ञान विभागाच्या ग्रॅव्हिटी’ महोत्सवाच्या तारखा समान झाल्या असल्या तरी त्यामुळे जागेचा मोठा प्रश्न निर्माण झाला जरी आम्ही सभागृहाची आणि मैदानाची नोंद महाविद्यालय व्यवस्थापनाकडे प्रथम केली जाते. तरीही कुठे अडचण आल्यास सामंजस्याने प्रश्न सोडविला जातो.

– शशांक पै,  बीएमएस विभागप्रमुख , साठय़े महाविद्यालय

Story img Loader