जवळपास ३० वर्षांपूर्वी म्हणजे १९८७ मध्ये गुजरातमधील कलोळ येथे शैली इंजिनीअरिंग प्लास्टिक्सची स्थापना झाली. सुरुवातीला केवळ दोन इंजेक्शन मोल्डिंग मशीन्स असलेल्या शैली इंजिनीअरिंगकडे आजच्या घडीला १०० हून जास्त ३५ ते १०० टन क्षमतेची इंजेक्शन मोल्डिंग मशीन्स असून कंपनीचे पाच कारखाने आहेत. भारतात प्लास्टिक मोल्डिंग उत्पादन करणारी शैली इंजिनीअरिंग ही पहिली कंपनी आहे.
गेल्या तीस वर्षांत कंपनीने मोल्डिंग सेवेखेरीज तसेच मोल्डिंगपश्चात लागणाऱ्या सर्वच सेवा म्हणजे पॅड प्रिंटिंग, व्हॅक्यूम मेटलायझिंग, हॉट स्टॅम्पिंग, हॉट फिलिंग, अल्ट्रा सोनिक वेल्डिंग, वायब्रेशन वेल्डिंग आणि असेंब्लिंग अशा विविध सेवा पुरवायला सुरुवात केली आहे. मागणीनुसार सेवा पुरवणाऱ्या या कंपनीने आता फार्मा कंपन्यांसाठी इंजेक्शन ब्लो मोल्डिंग तसेच औषधी पॅकेजिंगसाठी हस्की इंजेक्शन मोल्डिंग मशीन्स बसवून कंपनी आता औषधी कंपन्यांची गरज पूर्ण करत आहे.
आपल्या गुणवत्तेच्या जोरावर विस्तारीकरण करत असलेल्या या कंपनीची आर्थिक कामगिरीदेखील उत्तम आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने २२५.५ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १३.९ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला होता. गेल्या पाच वर्षांत आपली नफ्यात प्रति वर्षी सरासरी सुमारे २८.४९ टक्के वाढ दाखवणाऱ्या शैली इंजिनीअरिंगकडून येत्या दोन वर्षांत भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. सध्या ६२५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर थोडा महाग वाटत असला तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तो योग्य वाटतो. सप्टेंबर २०१६ साठी संपणाऱ्या तिमाहीचे निकाल अजून जाहीर व्हायचे आहेत. निकाल पाहून खरेदी केल्यास योग्य ठरेल.
अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com