भारत आणि रशिया या दोन्ही देशांनी हातमिळवणी केल्याने दोन्ही देशांचा विकास होतो आहे. विकासाचे नवे आयाम जोडण्याचे काम दोन्ही देशांच्या हातमिळवणीमुळे झाले आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घेतली. राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी रशियात आपल्याला बोलवल्याबद्दल मोदींनी त्यांचे आभारही मानले. पुढच्या वर्षी होणाऱ्या शिखर परिषदेसाठी पुतिन यांनाही मोदींनी निमंत्रित केले आहे. सुरक्षा क्षेत्र, कृषी क्षेत्राबाबतचे महत्त्वाचे करार आणि चर्चा पुतिन आणि मोदी यांच्यात झाले.

दोन्ही देशांच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये भारत आणि रशिया हे दोन्ही देश इतरांचा हस्तक्षेप पसंत नाही हेदेखील मोदींनी स्पष्ट केले. भारताने जम्मू काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्याबद्दल भारताचे रशियाने अभिनंदन केले होते. तसेच भारताने उचलेले हे पाऊल योग्य असल्याचेही म्हटले होते. हाच धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये इतर कोणत्या देशाची ढवळाढवळ पसंत केली जाणार नाही हे देखील स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोख अमेरिकेकडे होता हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

भारताने काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यापासून पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. इम्रान खान आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री यांच्याकडून विविध वक्तव्य केली जात आहेत. अशात भारताने उचललेलं हे पाऊल योग्य आहे असं रशियानं म्हटलं होतं. त्याचीच आठवण करुन देत मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावलं आहे. भारत आणि रशिया हे दोन्ही देश त्यांच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये कोणताही बाहेरचा हस्तक्षेप पसंत करणार नाहीत हे मोदींनी म्हटलं आहे. ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आपण भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीस इच्छुक आहोत असं म्हटलं होतं. त्यांनाच हा टोला मोदी यांनी लगावला आहे.

 

Story img Loader