राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी ते परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. दरम्यान, या दौऱ्यावरून भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. “सत्तेत असताना त्यांच्याकडे राज्याची जबाबदारी होती, तेव्हा ते घरात बसून होते. त्यावेळी त्यांना राज्यातील जनतेचे हाल दिसत नव्हते, आज त्यांना शेतकरी आठवतो आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – सत्तार म्हणाले ठाकरेंचा दौरा फक्त २४ मिनिटांचा, आता चंद्रकांत खैरेंचे जशास तसे उत्तर, म्हणाले “त्यांची सगळी लफडी…”

नेमकं काय म्हणाले विखे पाटील?

“उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत, याचं आश्चर्य वाटते आहे. कारण दोन वर्ष सत्तेत असताना जेव्हा त्यांच्याकडे जबाबदारी होती, तेव्हा ते घरात बसून होते. त्यावेळी त्यांना राज्यातील जनतेचे हाल दिसले नव्हते. मुख्यमंत्री व्हायच्या आधी त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अनेक आश्वासने दिली होती. मात्र, सत्तेत आल्यानंतर तुम्हाला त्याचा विसर पडला होता. सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याऐवजी त्यांच्या शेतातली वीज कापण्यात आली”, अशी टीका भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा – “उद्धव ठाकरे २४ मिनिटे शेतकऱ्यांची विचारपूस करणार, आता यावेळेत ते…”; अब्दुल सत्तारांनी साधला निशाणा!

“करोना काळात मोफत लसीकरणापासून धान्य देण्यापर्यंत हे सर्व कामे पंतप्रधान मोदी यांना करावी लागला. त्यावेळी राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा नव्हता, त्यातही केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला. त्याकाळात कृषी उत्पन्न बाजार समिती, आडते बंद ठेवण्यात आली होती. शेतकऱ्यांना अखेर कवडीमोल भावात माल विकावा लागला होता. शेतकऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडले होते. त्यामुळे तुम्ही आता कितीही दौरे केले, तरी काहीही फरक पडणार नाही, कारण शेतकऱ्यांनी तुमचे खरे रुप ओळखले आहे”, असेही ते म्हणाले.

Story img Loader