बहुप्रतिक्षित राफेल विमाने अखेर बुधवारी म्हणजेच २९ जुलै रोजी भारतामध्ये दाखल झाली आहे. आज दुपारी अंबाला एअरबेसवर राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीने लॅण्डींग केले. फ्रान्समधून २७ जुलै रोजी उड्डाण केलेली राफेल विमाने सात हजार किलोमीटरचा प्रवास करुन दुबईमार्गे भारतामध्ये पोहचली. ही विमाने भारतामध्ये दाखल झाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. सोशल नेटवर्किंगवरही राफेलसंदर्भातीलच चर्चा सुरु असल्याचे दिसून आले. अनेकांनी भारतीय हवाई दलामध्ये हे विमान येणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. काहींनी केंद्र सरकारला शुभेच्छा दिल्या तर काहींना माजी संरक्षण मंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांची आठवण झाली. राफेल विमानाच्या लॅण्डींगचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाल्याचे पहायला मिळालं. मात्र या सर्वांमध्ये एक मजेदार जाहिरातीचीही सोशल नेटवर्किंगवर चर्चा असल्याचे चित्र दिसलं. ही जाहिरात म्हणजे राफेल पान मसाल्याची.
नक्की वाचा >> पर्रिकर आज तुम्ही हवे होतात… राफेल टच डाउन करताच देशवासियांना झाली त्यांची आठवण
तंबाखू खाणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तंबाखू, पान मसाला आणि तंबाखूजन्य पदार्थ खाऊ नका असं आवाहन सरकारी विभागांकडून अनेकदा केलं जातं. मात्र याकडे अनेकजण दूर्लक्ष करुन तंबाखूचे सेवन करताना दिसतात. तंबाखूजन्य पदार्थ आणि पान मसल्याला अनेक राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. असं असलं तरी गुटखा आणि पान मसल्याचा काळाबाजार केला जात असल्याची अनेक प्रकरणे वेळोवेळी समोर येत असतात. पान मसाला बनवणाऱ्या कंपन्यांकडूनही वेगवेगळ्या कल्पाना वापरुन जाहीराती केल्या जातात. आपल्या पान मसल्याचे नाव लोकांच्या लक्षात रहावे म्हणून विचित्र पद्धतीच्या जाहिराती, वेगळी नावं अशा अनेक गोष्टी कंपन्या करतात. असेच एक कालपासून चर्चेत आहे ते म्हणजे राफेल पानमसाला.
नक्की पाहा >> एरियल री-फ्युएलिंग : ३० हजार फुटांवर राफेलमध्ये भरलं इंधन; पाहा थक्क करणारे फोटो
निवृत्त लष्करी अधिकारी असणाऱ्ये मजर पवन कुमार यांनी राफेल पान मसाल्याची जाहिरात ट्विटरवर पोस्ट केली आहे. “आपण भारतीय खूप पुढचा विचार करतो,” अशा कॅप्शनसहीत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. या ११ सेकंदाच्या व्हिडिओमध्ये दोन राफेल विमाने उडताना दाखवण्यात आली असून नंतर ती राफेल पान मसाल्याच्या पाकिटाला गिरक्या घेताना दिसतात. जान जुबान की या टॅगलाइनसहीत राफेल पान मसाल्याची जाहिरात करण्यात आली आहे. या पान मसाल्यामध्ये निकोटीन आणि तंबाखू नसल्याचा दावा जाहिरातीमध्ये करण्यात आला आहे.
We Indians are much ahead pic.twitter.com/3tcRwlJSiG
— Major Pawan Kumar, Shaurya Chakra (Retd) (@pavvanchaudhary) July 30, 2020
मात्र अशाप्रकारे लोकप्रिय गोष्टींच्या नावावरुन पान मसाला बाजारात आणण्याची ही काही पहिलीच वेळ नाही यापूर्वीही मिराज पान मसाला, तेजस माचीस अशा नावाच्या वेगवेगळ्या गोष्टींचे फोटो सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळालं आहे.