अपेक्षेप्रमाणे रिझव्‍‌र्ह बँक मंगळवारच्या पतधोरणातही व्याजदरात बदल करण्याची शक्यता मावळली आहे. दर कमी करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेला आवश्यक वाटणाऱ्या महागाईची पातळी अद्यापही कमी झाली नसल्याने व्याजदरात यंदा बदल होण्याची अटकळ कमी आहे.
ऑगस्टमध्ये ग्राहकपयोगी वस्तू निर्देशांक ७.८ टक्के तर घाऊक किंमत निर्देशांक ३.७ टक्के नोंदविला गेला आहे. हा दर मध्यवर्ती बँकेच्या सहनशक्तीच्या टप्प्यात अद्याप नाही. रिझव्‍‌र्ह बँकेला मोठी काळजी आहे ती अन्नधान्यावरील वाढत्या दरांची. किंमत निर्देशांकात निम्मा हिस्सा राखणाऱ्या हा दर मान्सूननंतर कमी होण्याची रिझव्‍‌र्ह बँकेला आशा आहे.
डॉ. रघुराम राजन यांच्या रिझव्‍‌र्ह बँक गव्हर्नरपदाची वर्षांची कारकिर्द चालू महिन्यातच पूर्ण झाली आहे. तर २०१४ च्या सुरुवातीपासून व्याजदरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. वाढती महागाई असली तरी विकासाला धक्का नको म्हणून गेल्या काही महिन्यांपासून व्याजदर स्थिर ठेवण्यात आलेले आहेत.
रिझव्‍‌र्ह बँकेने नियुक्त केलेल्या डॉ. ऊर्जित पटेल समितीने जानेवारी २०१५ पर्यंत महागाई दर ८ तर त्यापुढील वर्षभरात हा दर ६ टक्के राखण्याचे ध्येय आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे. तर डॉ. राजन यांनी आपल्या कार्यकाळात आतापर्यंत तीन वेळा रेपो दर वाढविले आहेत. ते आता ८ टक्के आहेत. तर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत देशाचा विकास दर ५.७ टक्के नोंदला गेला आहे.
स्टेट बँकेसह अनेक आघाडीच्या बँकप्रमुखांनी यंदा व्याजदर स्थिर राहतील, अशी अपेक्षा वृत्तसंस्थांकडे व्यक्त केली आहे. व्याजदर कमी होण्यास अद्याप कालावधी लागेल, असेही मत त्यांनी नोंदविले आहे.
यंदाच्या दसरा-दिवाळीच्या सणांच्या पाश्र्वभूमिवर बँकांनी अद्याप ठोस प्रमाणात व्याजदर सवलती दिलेल्या नाहीत. बँका तूर्त वार्षिक १० टक्क्य़ांवरील गृह कर्ज व्याजदरच देऊ करत आहेत.
रुपया सात महिन्यांच्या नीचांकावर
डॉलरच्या तुलनेत रुपया सप्ताहारंभीच गेल्या सात महिन्याच्या तळात विसावला. एकाच व्यवहारात स्थानिक चलन ३८ पैशांनी रोडावत ६१.५३ पर्यंत घसरले. यापूर्वी ५ मार्च रोजी ६१.७५ असा चलनाचा किमान स्तर होता.

Story img Loader