सवलती-अनुदानांपल्याड दृष्टी राखण्याचे उद्योगक्षेत्राला आवाहन
अमेरिकी मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हच्या व्याजदरात वाढ लांबणीवर नेण्याचा भारताच्या दृष्टीने अनुकूल आलेला निर्णय, तर भारतात व्याजदरात कपातीसाठी सुरू असलेले हाकारे यांचा प्रचंड दबाव सोसत असलेल्या रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी चलनवाढीचा दर अल्पतम राखणे हेच त्यांच्यापुढील आणि देशाच्या अर्थव्यवस्थेतील शाश्वत वाढीसाठी महत्त्वाचा घटक राहील, असे पुन्हा एकवार प्रतिपादन केले.
अर्थगतीला चालना देण्यासाठी रिझव्र्ह बँकेची भूमिका या विषयावर शुक्रवारी सकाळी आयोजित चौथ्या सी. के. प्रल्हाद स्मृती व्याख्यानाचे वक्ते या नात्याने राजन बोलत होते. भारतीय उद्योग महासंघ (सीआयआय) आणि अनंत आस्पेन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने योजलेल्या या कार्यक्रमाला बँकप्रमुख आणि उद्योगक्षेत्रातील धुरिणांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती. बजाज ऑटो लि.चे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज या समयी राजन यांच्यासोबत व्यासपीठावर होते.
फेडरल रिझव्र्हचे अमेरिकेत व्याजाचे दर शून्यवत पातळीवर कायम ठेवण्याचे आलेले धोरण पाहता, येत्या २९ सप्टेंबरला रिझव्र्ह बँकेच्या नियोजित पतधोरण बैठकीत चालू वर्षांतील चौथ्या रेपो दर कपातीच्या शक्यता उंचावल्या असून, उपस्थित श्रोतेवर्गात हाच चर्चेचा विषय होता. हे नेमके ओळखून राजन यांनी ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर ३.६६ टक्के अशा निम्नपातळीवर ऑगस्टमध्ये स्थिरावलेला दिसणे हा प्रामुख्याने तुलनेसाठी गृहीत धरलेला आधार दर मुळातच कमी असल्याचा परिणाम आहे. तो बाजूला केल्यास प्रत्यक्षात महागाई दर हा ५.५ टक्के दिसून आला असता, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपण आजवर जे करीत आलो आहोत, तेच यापुढे अविरत सुरू राहायला हवे. त्यामुळे आपल्या या निग्रहावर फेडच्या निर्णयाचाही परिणामाचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्दात राजन यांनी रिझव्र्ह बँकेच्या पतविषयक निर्णयाबाबत तर्क-कुर्तकांना विराम देण्याची अपेक्षा व्यक्त केली. तथापि अर्थव्यवस्थेत वाढीला चालना देण्यासाठी व्याजाचे दर नजीकच्या काळात खालावत आणावेत, यावर आपला भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे उद्योगक्षेत्राने करांतून सूट-सवलती, अनुदाने, थेट कर्जसाहाय्य वगैरे विशेष मर्जीच्या अपेक्षापासून फारकत घ्यावी, असे राजन यांनी आवाहन केले. या अशा मर्जीपायी उद्योगातील स्पर्धाशीलतेला हानी पोहोचविली असून, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही जागतिक स्तरावर आपल्या सक्षमतेनुरूप समर्पक स्थान आजवर मिळविता आलेले नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.
फेडचा निर्णय डळमळलेल्या अर्थकारणाची अपरिहार्यता!
अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हला व्याजाचे दर शून्यवत स्तरावर कायम ठेवण्यास भाग पडले त्यामागे जागतिक अर्थव्यवस्थेतून अकस्मात संभवणारे धोके आणि खुद्द अमेरिकेचा आर्थिक डळमळीतपणा कारणीभूत ठरला आहे, असे रघुराम राजन यांनी विवेचन केले. आज आपण जगाकडे पाहिले तर एकूण चित्र निश्चित रमणीय नाही, काही अपवाद वगळल्यास प्रगत औद्योगिक राष्ट्रे आजही धडपडताना दिसत आहेत. किंबहुना अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवरील अस्थिरतेचे सावट अद्याप पुरते सरलेले नाही. फेडने आपले व्याजदर वाढीचा निर्णय गुरुवारी लांबणीवर टाकण्याची हीच प्रमुख कारणे आहेत, असे राजन यांनी सांगितले.