वाढती महागाई व बँकांकडून कर्जावरील व्याजदरात कपातीबाबत हयगयीबद्दल सरकार आणि वाणिज्य बँका या दोन्ही यंत्रणांना दोष देत रिझव्र्ह बँकेने आपले प्रमुख धोरण दरात कोणतेही बदल न करणारे पतधोरण मंगळवारी जाहीर केले. अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हची सप्टेंबरमधील बैठकीत ठरणारी चाल तसेच कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीचा कलच आगामी रेपो दर कपात ठरवेल, असे म्हणत गव्हर्नर रघुराम राजन यांनी तूर्त व्याजदर कपातीची कोणतीही घाई नसल्याचे स्पष्ट केले.
चालू आर्थिक वर्षांच्या तिसऱ्या द्वैमासिक आढाव्यात रिझव्र्ह बँकेने स्थिर व्याजदराचे पतधोरण मंगळवारी मांडले. असे करताना गव्हर्नरांनी रेपो, रिव्हर्स रेपो, सीआरआर तसेच एसएलआर या प्रमुख दरांमध्ये कोणताही बदल केला नाही. महागाईचा अंदाज काहीसा दिलासादायक वर्तवित देशाच्या विकास दराबाबतची आपली आशा मध्यवर्ती बँकेने अधिक उंचावली आहे.
रिझव्र्ह बँकेचे आगामी, चौथे द्वैमासिक पतधोरण येत्या २९ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. तत्पूर्वी दोन दिवस आधीच गणेशोत्सवाची सांगता होईल. याचवेळी अमेरिकी फेडरल रिझव्र्हमार्फतही दरनिश्चिती संदर्भात बैठक होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात यावेळी येते दरकपात झाली तरी ती गणपती उत्सवानंतरच होईल. मध्यंतरात दरकपात शक्य असल्याचे डॉ. राजन यांनी म्हटले असले तरी मान्सून व महागाई यावर ते अधिक निर्भर असेल. यानंतर महिन्याभराने दसरा-दिवाळी आहे.
व्याज दरकपातीसाठी विराम घेणाऱ्या रिझव्र्ह बँकेच्या दृष्टीने आगामी कालावधीतील अर्थविकासाची आकडेवारी पाहणे अधिक उत्साहजनक ठरणार आहे. जुलैमधील किरकोळ तसेच घाऊक महागाईचे चित्र चालू महिन्यात स्पष्ट होणार आहे. तसेच जूनमधील औद्योगिक उत्पादन दरही ऑगस्टमध्येच जारी होईल. त्याचबरोबर तमाम अर्थव्यवस्थेला प्रतीक्षा असेल तरी चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीतील विकास दराच्या आकडेवारीची.
मध्यवर्ती बँकेने चालू आर्थिक वर्षांसाठी ७.६ टक्के विकास दर अंदाजित केला आहे. तर जानेवारी ते मार्च २०१६ दरम्यान महागाईचे रिझव्र्ह बँकेचे उद्दिष्ट ०.२० टक्क्य़ांनी खाली आणले गेले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा