शिवसेना-भाजपबरोबर युती केल्याच्या बदल्यात रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली. केंद्रात सत्ता आली तर त्यांना मंत्रिपदही हवे आहे. त्यासाठी आतापासूनच त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अन्य काही नेत्यांनाही सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. सत्तेच्या स्वप्नात नेते गुंग असताना, आंदोलनांत लाठय़ा-काठय़ा खाणारे, प्रसंगी नेत्यांना वाचवण्यासाठी आपल्या अंगावर खटले ओढवून घेणारे, कार्यकर्ते गेले दोन महिने एक दिवस आड पोलीस ठाण्यांमध्ये हजेरी लावत आहेत.
दोन वर्षांपूर्वी रिपब्लिकन पक्षाने शिवसेना-भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी इंदू मिलची जमीन मिळण्यासाठी आंदोलन केले. त्यांच्याविरोधात पोलिसांनी खटले भरले. त्यानंतर आंबेडकर स्मारकाचे श्रेय घेण्यास आपण मागे राहू नये, यासाठी आठवले यांच्या नेतृत्वाखाली रिपाइंने १५ डिसेंबरला चैत्यभूमी ते इंदू मिल असा मोर्चा काढला. त्या वेळी मिलच्या इमारतीवर झेंडे लावणे, मिलचा दरवाजा तोडून आत घुसणे, असे प्रकार घडले. त्यासंदर्भात मुंबई रिपाइंचे अध्यक्ष गौतम सोनावणे, कीर्ती ढोले, चंद्रशेखर कांबळे, सचिन मोहिते, ममता अडांगळे या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे १२०० कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप असलेले गुन्हे शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले.
नंतर पोलिसांनी रिपाइं कार्यकर्त्यांवर अटकेची कारवाई सुरू केली. सोनावणे व इतर पदाधिकाऱ्यांना अटक करून जामिनावर सोडून देण्यात आले. परंतु त्यांना एक दिवस आड पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगण्यात आले. या कार्यकर्त्यांना उद्या गुरुवारी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जामिनासाठी त्यांची वणवण सुरू आहे. दलित पँथरच्या चळवळीपासून अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला, अटका झाल्या, परंतु कधीच असा अवमानकारक प्रकार झाला नाही, अशी खंत हे कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा