व्याजदर कपातीचा उद्योगजगताकडून आर्जव आणि सार्वत्रिक अपेक्षा केली जात असताना, रिझव्र्ह बँकेने मंगळवारी आपल्या तिमाही पतधोरण आढाव्यात ‘जैसे थे’ची कास धरत, अद्याप महागाई दर ताळ्यावर आणण्याबाबत ‘अनिश्चितता’ कायम असल्याची चिंता व्यक्त केली. अर्थव्यवस्थेला आवश्यक गती देऊ शकणाऱ्या संधीला गव्हर्नर रघुराम राजन यांनी धुडकावले, अशी उद्योगजगताची या पतधोरणावर नाराजीची प्रतिक्रिया आहे. सणासुदीच्या तोंडावर बँकांकडून घेतलेल्या कर्जावरील हप्त्यांचा भार हलका होईल, या सर्वसामान्यांच्या अपेक्षांवर त्यामुळे पाणी फेरले गेले आहे.
रिझव्र्ह बँकेकडून वाणिज्य बँकांना अल्पमुदतीसाठी दिले जाणारे कर्ज अर्थात रेपो दर ८ टक्के पातळीवर कायम ठेवतानाच, बँकांना त्यांच्या ठेवींच्या प्रमाणात रिझव्र्ह बँकेकडे ठेवावी लागणारी रोख म्हणजे रोख राखीवता प्रमाणाच्या (सीआरआर) ४ टक्के पातळीत कोणताही बदल आपल्या पतधोरणात केलेला नाही. दर कपात रोखून धरण्याचे समर्थन करताना गव्हर्नर राजन यांनी, महागाई दर व विशेषत: अन्नधान्याच्या किमतीबाबत अनिश्चिततेवर बोट ठेवले. घाऊक किमतीवर आधारित महागाई दर जरी जानेवारी २०१५ पर्यंत निर्धारित केलेल्या लक्ष्याप्रमाणे ८ टक्क्यांच्या खाली येत असल्याचे निरंतर स्वरूपात दिसून येत असले, तरी अन्नधान्याच्या किमतीबाबत आश्वस्त होता येईल अशी परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले. यंदाच्या मान्सूनचा अन्नधान्याच्या किमतीसंबंधाने परिणाम अजून पूर्णपणे स्पष्ट झालेला नाही, अशातच (रशिया, इराकसारख्या) भू-राजकीय तणावाच्या स्थितीत किंमतवाढीचे धक्केसोसावे लागण्याच्या शक्यतेबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली.
तरीही जानेवारी २०१६ पर्यंत किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर ६ टक्क्यांखाली येणे शक्य असल्याचा राजन यांनी निर्वाळा दिला. महागाई दराबाबतचे भाकिते ही एप्रिलमधील स्थितीपेक्षा आज अधिक विश्वासाने करता येण्यासारखा बदल जरूर घडला आहे, असे त्यांनी सांगितले. आगामी पतधोरणाची दिशा ही या महागाई दराच्या लक्ष्यानुसारच असेल, असे राजन यांनी सुस्पष्टपणे सांगितले.
चालू आर्थिक वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास हा ५.५ टक्के दराने वाढ करताना दिसेल, असे राजन यांनी भाकीत केले. या आर्थिक वर्षांच्या आगामी तिसऱ्या तिमाहीचा वृद्धी दर हा पहिल्या तिमाहीपेक्षा किंचित कमी झालेला दिसेल, परंतु अखेरच्या म्हणजे चौथ्या तिमाहीत वृद्धीदर उंचावण्याची दाट शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा