साध्या घटनांपासून अभिजात कलाकृतींपर्यंतच्या विस्तीर्ण क्षेत्रात सिनेमाची पाळेमुळे शोधणाऱ्या आणि सहज भाषेत त्याची वैश्विक व्याप्ती जाणवून देणाऱ्या अरुण खोपकर लिखित आणि राजहंस प्रकाशित ‘प्राक्-सिनेमा’ या पुस्तकातील एका प्रकरणामधील संपादित अंश..
प्राक्-सिनेमाच्या आविष्कारक्षम आकारांची मुळाक्षरे शोधायची झाली तर ती खेळांतूनही शोधायला हवीत. खेळांतले आकार सुलभ असतात, ठळक असतात व त्यांची ओळख पटकन् होते. प्राथमिक भौमितिक आकारांना हे सारे निकष लागू पडतात. पण विशेषकरून वर्तुळाला. हा आकार शरीराच्या हालचालीने रेखला जातो व सहजपणे आत्मसात होतो.
बायका-मुलींच्या कित्येक खेळांत गोल गोल फिरणे असायचे. गोल फुगडीत फेरे घालता घालता आयुष्यातल्या अनेक दडपणांनी दबलेल्या स्त्रियांना व पोरीबाळींना एक धुंद करणारा अनुभव मिळतो. ज्या क्षणी घेरी येईलसे वाटून हात सुटत, तेव्हाचा भान हरपण्याचा अनुभव हा नित्याच्या कचाटय़ातून बाहेर पडण्याचा क्षण असतो. बेभानपणाचा व स्त्रीमुक्तीचा शारीर अनुभव असतो. लोळणफुगडी तशीच. सतत चेपल्या गेलेल्या स्त्रियांच्या मनाला व शरीराला हे सुखद अनुभव म्हणजे कोंडून ठेवलेल्या वाफेला मिळालेली वाट असते.
हेही वाचा >>> संयुक्त महाराष्ट्र लढय़ाचा धगधगता इतिहास
मंगळागौरीचा हलकल्लोळ, आनंदी हास्याचे खळखळाट, फवारे व धबधबे, फुगडय़ांसारख्या खेळातला वेग वाढल्यावरच्या कृतक्-भीतीच्या उन्मादावस्थेत असल्यासारख्या किंकाळ्या, गाण्यांच्या नाना चाली, त्यांबरोबरचे सोपे आणि जोमदार नाच, विविध कौशल्यांच्या स्पर्धा व निर्णयांतून येणारी लटकी भांडणे- हे सारे बाहेरून ऐकूनही त्यातला विमुक्त आनंद जाणवतो. म्हणूनच तुकारामबोवा म्हणतात, ‘फुगडी फू फुगडी घालितां उघडी राहे। लाज सांडोनि एक एकी पाहे।।’
माझ्या लहानपणी जत्रेतल्या आकर्षणाचे केंद्र म्हणजे मेरी-गो-राउंड. त्यात बसल्यावर आपण ‘उडन खटोला’ सिनेमातल्या घोडय़ांवर बसून उडणारे साहसी जादूगार आहोत असे वाटत असे. त्यातल्या गोल गोल फिरण्याचे जबरदस्त आकर्षण व तितकीच भीतीही वाटत असायची. लहानपणी माझ्या शरीराच्या आकाराच्या मानाने हे घोडे फारच मोठे वाटायचे. तेव्हा अजस्र आकाराच्या राक्षसासारखे फेरिस व्हील जत्रेपर्यंत येऊन पोचले होते व मेरी-गो-राउंडची उमेदवारीची वर्षे संपवून या नव्या आनंदाचा अनुभव घ्यायचा होता.
फेरिस व्हीलमध्ये बसलेला माणूस गोलाकार तर फिरतोच, पण तो वेगाने फिरतो. वर जाताना गुरुत्वाकर्षणाविरुद्ध व खाली येताना गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने येतो. त्यामुळे त्या अनुभवात एक गुणात्मक बदल होतो. अत्युच्च बिंदूवर पोचताच होणाऱ्या दिशाबदलात क्षणभर चलन थांबल्याचा व तरंगल्याचा भास होतो. फेरिस व्हीलच्या वर्तुळाचा मोठ्ठा व्यास, जास्तीचा वेग व बऱ्याच उंचीवरून कोसळल्याचा व क्षणभर गुरुत्वाकर्षण नसल्याचा अनुभव या साऱ्याने विशिष्ट क्षणी पोटात गोळा येतो. गगनचुंबी इमारतींच्या अतिवेगवान लिफ्टचा वेग अचानक कमी होताना हा क्षण अनुभवायला मिळतो. विमानप्रवासातही ‘हवेच्या खिशा’त- air pocket मध्ये पडल्यावर असाच पोटात गोळा येतो.
फेरिस व्हीलसारखाच, पण अधिक तीव्र अनुभव हा रोलर कोस्टर राइडचा असतो. गोलाकाराबरोबर अचानक येणारी वळणे, उंचीतले झपाटय़ाने होणारे बदल, संपूर्ण दिशाबदल यामुळे रोलर कोस्टर राइडमध्ये प्राथमिक स्वरूपाच्या विमानात साहसी पायलटबरोबर प्रवास केल्याचा अनुभव येतो. अचानक होणाऱ्या प्रत्येक दिशाबदलात कमी त्रिज्येच्या गोलाकार गतीचा अनुभव हजर असतो.
हेही वाचा >>> भारत-बांगलादेश राजकीय-सांस्कृतिक बंधांचा आलेख
जत्रेत मृत्यूच्या विहिरीत फटफटी चालवणारा किंवा सर्कसमध्ये मृत्युगोलात फटफटी चालवणारा स्वार आपला जीव धोक्यात टाकतो. प्रेक्षकांना खिळवून धरतो. यात प्रेक्षकाला जरी प्रत्यक्ष शारीर अनुभव मिळत नसला तरी ‘बघ्या’ची भूमिका इतकी तीव्र होते की स्वाराच्या अनुभवातला काही थरारक अंश तरी त्याच्यापर्यंत पोचतो.
मराठी वाचकांच्या सुदैवाने अरुण कोलटकरांच्या ‘चिरीमिरी’ या संग्रहात ‘मौत का कुँआ’ या कवितेत अनुभवाच्या ऐहिक व आध्यात्मिक अशा दोन्ही अंगांचा आविष्कार केला आहे. तिच्यात ‘बघ्यां’ची जागा साक्षात देव घेतात व माणसाच्या जीवन-मृत्यूचा खेळ ‘मौत का कुँआ’मध्ये वाकून बघतात. हे उदाहरण प्राक्-सिनेमाचे नसून ‘पश्चात् सिनेमा’चे आहे. सिनेमा व काव्य यांच्या मीलनांतून दोन्ही कलांना समृद्ध करणाऱ्या कलाकृती क्वचितच आढळतात. सिनेदिग्दर्शकांनी कोलटकरांच्या काव्यातून सिनेमा शिकावा इतकी त्याची महत्ता आहे.
प्राक्-सिनेमाच्या मुळाक्षरांत मृत्यूच्या विहिरीसारखे तीव्र अनुभवाचे क्षण महत्त्वाचे असतात. ते कोणत्याही कथानकाशी निगडित नसतात. संस्कृतींशीही जोडलेले नसतात. त्यांना वयाच्या व लिंगभेदाच्या अटी नसतात. हे केवळ उन्मादाच्या ऊर्जेचे, तीव्र अनुभवांचे व ‘आकर्षणा’चे क्षण असतात. आईझेन्श्टाईन अशा क्षणांना किंवा अनुभवांना ‘अट्रॅक्शन’ असे म्हणतात. अशांच्या मालिकांना ते ‘मोंताज ऑफ अट्रॅक्शन्स’ म्हणतात. ‘कथकली’तले रक्तपाताचे प्रसंग हे असेच ‘मोंताज ऑफ अट्रॅक्शन्स’ असतात.
मेरी गो राउंड किंवा फेरिस व्हील इत्यादींवरच्या यांत्रिक चलनावर माणसाचा ताबा असतो. तो ताबा जर सुटू लागला तर या यंत्रांतल्या खेळाचे व संयत भीतीचे रूपांतर कोणताही ताबा नसलेल्या यंत्रणेसारखे होते. जशा वादळात वस्तू आपल्या ताब्यात राहत नाहीत, तशीच ही यंत्रेही अनियंत्रित राक्षसी स्वरूप धारण करू शकतात. मूल जेव्हा गर्भावस्थेत असते, त्या वेळी मातेला गुरुत्वाकर्षणाच्या किंवा वेगाच्या अचानक बदलाच्या शक्यतेपासून परावृत्त केले जाते, नाहीतर पिंडाला वाटलेल्या भीतीमुळे गर्भपात होण्याची शक्यता असते.
हिचकॉक यांच्या ‘स्ट्रेंजर्स ऑन अ ट्रेन’ (१९५१) या चित्रपटाच्या शेवटच्या रिळात अनियंत्रित यंत्रराक्षसाच्या भीतीचा उपयोग आहे. या रिळात नायक व खलनायक एका चक्रदोल्यावर म्हणजे मेरी-गो-राउंडवर एकमेकांशी लढत असतात. पोलिसांनी खलनायकावर झाडलेली गोळी चुकीने बाजूला असलेल्या यंत्रचालकाला लागते व त्याचे मेरी-गो-राउंडवरचे नियंत्रण सुटते. ते वाढत्या वेगाने फिरू लागते.
प्रथम त्यावर खेळणाऱ्या मुलांना अचानक वाढणाऱ्या वेगामुळे मजा वाटते आणि ती मोठमोठय़ाने खिदळायला लागतात. मग गमतीचे परिवर्तन सतत वाढत्या वेगाबरोबर वाढणाऱ्या भीतीत होते. मुले किंचाळ्या मारत आहेत व त्यांचे चक्राबाहेर उभे असलेले आई-वडील भयाने हतबल झालेले आहेत असा अंगावर काटा उभारणारा प्रसंग सादर केला आहे. शेवटी जत्रेतला एक कामगार मेरी-गो-राउंडच्या खाली जाऊन ते थांबवतो, पण त्याची यंत्रणा निकामी झाल्याने ते कोसळते. सुदैवाने मुले व इतर जत्रेकरी वाचतात.
हेही वाचा >>> शाहूमहाराज राज्यारोहण सोहळाकाव्य
हा प्रसंग हिचकॉक यांच्या प्रतिभेची प्रचीती देणारा अभिजात सिनेमातला एक महत्त्वाचा प्रसंग आहे. हिचकॉक यांच्या सुप्रसिद्ध ‘सस्पेन्स’ शैलीतला एक खास अलंकार म्हणजे एखाद्या प्रसंगाचे चित्रण करीत असताना ताणाच्या एका विशिष्ट क्षणाला ते कॅमेऱ्याचा वस्तुनिष्ठ दृष्टिकोन बदलून अचानक तोच प्रसंग त्यातल्या एखाद्या पात्राच्या दृष्टिकोनातून दाखवू लागतात. उदा. फिरणाऱ्या मेरी-गो-राउंडचे बाहेरून चित्रण करून त्याच्या धोक्याची प्रेक्षकाला जाणीव दिल्यावर कॅमेरा लाकडी घोडय़ांवर बसलेल्या मुलांच्या डोळ्यांतून हा अनुभव दाखवतो.
कॅमेऱ्याचे वर-खाली होणे, प्रथम मुलांचे आनंदाचे हसणे, मग वेग वाढल्यावर त्याचे भीतीत रूपांतर व वाढत्या वेगाबरोबर होणारा थरकाप व किंकाळ्या.. हे सारे कधी मुलांच्या डोळ्यांतून, कधी भयभीत पालकांच्या डोळ्यांतून, कधी तटस्थ दृष्टिकोनातून दाखवता दाखवता हे घटनाप्रवाह लयीवरच्या हुकमतीने असे बांधले आहेत, की यांतली प्रत्येक भावना प्रेक्षकापर्यंत पोचते. कधी तो किंचाळणारे मूल होतो, कधी तो हतबल आई होतो, कधी तो कर्तव्यपालनात दक्ष असलेला पोलीस होतो. या सर्व दृष्टिकोनांतून पाहता पाहता त्या ताणलेल्या भावनांच्या विविध आमुखांच्या दर्शनांतून वेदना, भय, हतबलता अशा विविध बाजूंचे एक महान क्युबिस्ट कालचित्र तयार होते. चक्राकार गतीचे जितके पैलू प्रेक्षकांसमोर येतात, तितके अनुभवाची घनता वाढवतात. हा खरा अभिजात सिनेमा!