भारत अ संघाच्या इंग्लंड दौऱ्यात आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केलेल्या ऋषभ पंतची इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. भारत अ संघाच्या प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणारा राहुल द्रविडही ऋषभच्या कसोटी संघातल्या निवडीवर सध्या भलताच खूश आहे. बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीत राहुल द्रविडने ऋषभ पंतकडे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता असल्याचं म्हटलं आहे.

“ऋषभ हा नेहमी एक आक्रमक फलंदाज म्हणून मैदानात खेळताना दिसेल. कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळताना त्याला थोडा संयम बाळगावा लागेल. कसोटी संघात ऋषभची झालेली निवड ही खरचं आनंदाची गोष्ट आहे. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करत तो सर्वोत्तम कामगिरी करेल यात शंकाच नाही.” राहुलने ऋषभच्या फलंदाजीचं कौतुक केलं.

अवश्य वाचा – कसोटी मालिकेत भारताची मदार फलंदाजांवर – सौरव गांगुली

इंग्लंड दौऱ्यामध्ये ऋषभने ४ दिवसीय कसोटी सामन्यात मोक्याच्या वेळी अर्धशतकी खेळी केली. याचसोबत वेस्ट इंडिज संघाविरुद्धही ऋषभ पंत शतकी भागीदारीमध्ये सहभागी होता. भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाच्या खांद्यावर शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे पुढचे काही महिने तो क्रिकेट खेळू शकणार नाहीये. त्याच्या गैरहजेरीत इंग्लंड दौऱ्यात दिनेश कार्तिक यष्टीरक्षकाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे ऋषभ पंतला सामन्यात खेळण्याची संधी मिळते का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – भुवनेश्वरची दुखापत भारताला इंग्लंड दौऱ्यात महाग पडू शकते – सचिन तेंडुलकर

Story img Loader