जगातील प्रवाळ बेटे नष्ट होत आहेत. त्यामुळे जैववैविध्याबरोबरच मानवी जीवनही धोक्यात येत आहे, ही प्रवाळ बेटे वाचवता येतील असे अनेकांना वाटत नव्हते, पण  एक महिला मात्र आशावादी होती. प्रवाळांचे वेगळ्या मार्गाने संवर्धन करण्याचे तिचे  इरादे बुलंद होते, सागरी जीवशास्त्रज्ञ असलेल्या  या महिलेचे नाव रूथ गेट्स. त्यांच्या निधनाने प्रवाळ बेटांच्या संरक्षणासाठी झटणारी निसर्गाची मैत्रीण कायमची पडद्याआड गेली आहे. त्या हवाई विद्यापीठाच्या इन्स्टिटय़ूट ऑफ मरीन बायॉलॉजी या संस्थेच्या संचालक व इंटरनॅशनल सोसायटी फॉर रीफ स्टडीज या संस्थेच्या अध्यक्ष होत्या. एकूण १०० विज्ञान नियतकालिकांत त्यांचे संशोधन प्रसिद्ध झाले.

प्रवाळ बेटे वाचवण्यासाठी  त्यांनी सुपर कोरल २०१५ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मांडला होता. हवामान बदल, तापमान वाढ यातही टिकून राहतील अशा प्रवाळांच्या प्रजाती तयार करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांची दखल नेटफ्लिक्सच्या ‘चेसिंग कोरल’ या लघुपटात घेण्यात आली होती.  त्यांच्याबरोबर ऑस्ट्रेलियन इन्स्टिटय़ूट ऑफ मरीन सायन्स या संस्थेच्या प्राध्यापक मॅडलिन व्हॅन ऑपेन याही कार्यरत होत्या. महिलांनी विज्ञान क्षेत्रात काम करावे असा त्यांचा नुसता आग्रह नव्हता तर त्यासाठी त्यांनी मुलींना प्रशिक्षणही दिले.  इंग्लंडमध्ये जन्मलेल्या गेट्स यांनी १९८४ मध्ये सागरी जीवशास्त्रात न्यूकॅसल विद्यापीठातून पीएचडी केली.  नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात १९९० ते २००२ दरम्यान विविध पदांवर काम केले.  २००३ मध्ये त्या हवाई विद्यापीठात आल्या व स्वत:ची प्रयोगशाळा सुरू केली. सध्याच्या काळात जगातील निम्मी प्रवाळ बेटे नष्ट झाली आहेत. प्रवाळ व शैवाल यांचा संबंध, एकमेकांशी संवाद साधण्यासाठी ते वापरत असलेले रेणू, वाढत्या तापमानामुळे त्यांच्या या साहचर्यातील अडचणी अशा अनेक बाबींचे संशोधन त्यांनी रेणवीय जीवशास्त्राच्या साधनांनी  केले होते. त्या  जीवनात खूप आशावादी होत्या पण अखेर त्यांना मेंदूच्या कर्करोगाशी पाच महिने चिवट झुंज दिल्यानंतर हार मानावी लागली हे दुर्दैव.

Story img Loader