अज्ञान प्रभावानं मोह आणि भ्रमग्रस्त होऊन जीव पापकर्म करतो. त्या पापाच्या परिणामांनंतर मन कष्टी झाल्यावर किंवा त्या परिणामांच्या भयानं मन ग्रासल्यावर तोच जीव प्रायश्चित्त घेण्याचं कर्मही करतो. अज्ञानी जिवाकडून होणारी पापे आणि प्रायश्चित्ताची ही कर्मे ेपाहता ‘श्रीमद्भागवत’ असा प्रश्न उपस्थित करतं की, ‘(प्रायश्चित्त) कर्मानं (पाप) कर्माचा निर्बीज नाश होणं शक्य आहे का?’ शुकदेव त्यावर फार महत्त्वाची गोष्ट सांगतात.. ते म्हणतात, ‘ पाप करणारा आणि त्याचं प्रायष्टिद्धr(१५५)त्त घेणारा अज्ञानी आहेच. आणि अज्ञान जोवर आहे तोवर पापवासना नष्ट होणं अशक्य आहे. म्हणून पापाचं जर काही खरं प्रायश्चित्त असेल, तर ते तत्त्वज्ञान अर्थात तत्त्व जाणणं, हेच आहे!’ (कर्मणा कर्मनिर्हारो न ह्यत्यन्तिक इष्यते। अविद्वदधिकारित्वा प्रायश्चित्तं विमर्शनम्।।) आता इथं आपण पुरते गोंधळून जातो. पापाचं प्रायश्चित्त तत्व जाणणं, एवढंच कसं असेल, असा प्रश्न आपल्याला पडतो. कारण काही तरी केल्याशिवाय प्रायश्चित्त कसं घेतलं जाऊ   शकतं, असं आपल्याला स्वाभाविकपणे वाटतं. शुकदेव मात्र इथं सांगतात की, तत्त्व जाणणं, हेच खरं प्रायश्चित्त आहे.. आणि यामागे फार मोठा विचार आहे! हे तत्त्व काय आहे? तर तो भगवंत अर्थात तो सद्गुरू हेच ते खरं तत्त्व आहे. त्या सद्गुरूंचा बोध जाणणं आणि त्यानुसार जगणं, हेच साधकासाठीचं तत्त्व—ज्ञान आहे! त्या जाणिवेनुसार जगलं नाही, तर काय अर्थ आहे? आगीला हात लावला तर चटका बसतो, हे मी जाणतो. तरीही मी आगीला हात लावत असेन, तर मग मी काय जाणलं? तेव्हा जाणिवेनुसार आकलन आणि वर्तन जोवर घडत नाही तोवर खरं जाणलं गेलं नाही. ‘श्रीमद्भागवता’त म्हटलं आहे की, ‘प्रायश्चित्त घेतल्यानंतरही मन जर कुमार्गाकडेच पुन्हा धावत असेल, तर खरं आणि संपूर्ण प्रायश्चित्त घेतलंच गेलेलं नाही. तेव्हा पापाचा पायाच उखडला जावा, असं वाटत असेल तर भगवंताचाच आधार अनिवार्य आहे!’ शुकदेव सांगतात की, मोठमोठी प्रायश्चित्तं घेऊनही माणूस जर भगवंतविन्मुख राहत असेल तर तो मनानं पवित्र होऊ शकत नाही. तेव्हा पापभावानं ग्रासलेल्या आणि त्यामुळे आंतरिक संघर्षांला तोंड देत असलेल्या साधकानं भगवंताचा आधार घ्यायला हवा. भगवंताचा आधार म्हणजेच त्या परम तत्त्वात जो सदोदित एकरूप आहे त्या सद्गुरूच्या बोधाचाच आधार. तो आधार सहज, सतत असल्याचं स्मरण टिकावं आणि त्या स्मरणाला सुसंगत असाच जीवन व्यवहार व्हावा यासाठीचा सहज सोपा उपाय नाम—स्मरण आहे! आता या मुद्दय़ाशी अजामिळाच्या कथेकडे आपण परत वळणार आहोत. अजामिळाने मृत्यूच्या क्षणी पुत्रप्रेमानं का होईना, पण नारायणाचं नाव घेतलं आणि म्हणून तो पापमुक्त झाला आहे, असा दावा करीत विष्णूच्या दूतांनी यमदूतांना अडवलं. विष्णुचे दूत म्हणाले,‘‘.. भगवंताच्या नुसत्या नामोच्चारानं चित्त शुद्ध होतं आणि अजामिळानं ते साधलं आहे, आता त्याला नेऊ नका.. अथैन मापनयत कृताशेषाघनिष्कृतम्। यदसौ भगवन्नाम म्रियमाण: समग्रहीत् ।।’’ यातला ‘म्रियमाण’ हा शब्दच या ‘मुक्तिदात्या’ क्षणाचं रहस्य उलगडतो. ‘म्रियमाण’ म्हणजे मरताना! याचाच अर्थ असा की नामाच्या उच्चारानं अजामिळ पापमुक्त तर झालाच, पण मृत्यूचा क्षणही आल्यानं या जन्मात नंतर त्याच्याकडून पाप होण्याची शक्यताही उरली नाही! मग हे विष्णुदूत सांगतात, ‘‘जाणता असो की अजाणता, लाकडाचा अग्नीशी संपर्क आला की ते भस्मसात होतंच. त्याचप्रमाणे या अजामिळानं पुत्रप्रेमानं का होईना, नारायणाचं नाम घेतलं आहे. त्याचा लाभ त्याला मिळेलच.’’ थोडक्यात, मृत्यूच्या क्षणी अजामिळानं नाम घेतलं आणि जन्मच संपत असल्यानं त्याला पाप करण्याची संधीही नसल्यानं त्या नामानं तो पापमुक्त झाला. यानंतर त्यानं एका मोठय़ा परीक्षेला तोंड दिलं आहे, या वास्तवाकडे सहसा कुणाचं लक्ष जात नाही.

 

Story img Loader