मोबाईल- स्मार्टफोनच्या क्षेत्रातील सॅमसंग या कंपनीने त्या क्षेत्रात एक भली मोठी आघाडी घेतली आहे. सध्या जगभरात चर्चा सुरू आहे ती, सॅमसंग विरुद्ध अ‍ॅपल या रंगलेल्या सामन्याची. गॅलेक्सी एस थ्री बाजारात आणून सॅमसंगने अ‍ॅपलच्या आयफोनला थेट आव्हानच दिले. सुरुवातीस केवळ आशिया खंडापुरती मर्यादित राहिलेली सॅमसंगची जादू नंतर त्यांच्या मार्केटिंग तंत्राच्या माध्यमातून जगभर पोहोचली. त्यानंतर सुरू झाले एक वेगळे मार्केटिंग युद्ध. पहिल्या दिवशी आयफोनची पानभराची जाहिरात प्रसिद्ध झाली की, त्याच जागी दुसऱ्या दिवशी सॅमसंगची जाहिरात असे सत्र जगभरातील प्रमुख वर्तमानपत्रांतून सुरू झाले. भारतही त्याला अपवाद नाही. शिवाय याच काळात सॅमसंगने विविध वयोगट आणि आवडीनिवडी असलेला ग्राहक वर्ग लक्षात घेऊन अनेकविध प्रकारचे मोबाईल बाजारात आणले. गरजेनुसार प्रत्येकाला आपापल्या खिशाला परवडेल, असा स्मार्टफोन मिळेल, हे सॅमसंगने पाहिले. परिणामी सॅमसंग हे नाव सर्वतोमुखी झाले. गेल्या काही महिन्यांत सॅमसंगने मारलेल्या या जोरदार मुसंडीचा फटका अ‍ॅपलला बसला असून त्याची चर्चाही जगभर सुरू आहे.
आता या मोबाईल युद्धात आणखी दोन पावले पुढे टाकण्याचा निर्णय सॅमसंगने घेतल्याचे समजते. खबर अशी आहे की, गॅलेक्सी नोटमध्ये चांगला मोठा स्क्रीन सॅमसंगने दिला त्याला मिळालेला चांगला प्रतिसाद आणि मोठय़ा स्क्रीनची बाजारपेठेला पडलेली भुरळ हे लक्षात घेऊन सॅमसंगने आता गॅलेक्सी मेगा या नावाने आणखी एक मालिका बाजारपेठेत आणण्याचा निर्णय घतेल्याची चर्चा सध्या बाजारपेठेत सुरू आहे. या चर्चेनुसार,  या मालिकेमध्ये बाजारात येणाऱ्या स्मार्टफोन्सचा स्क्रीन ५.८ इंच आणि ६.३ इंच अशा आकारमानाचा असणार आहे. सध्या पडलेली मोठा स्क्रीन असलेल्या स्मार्टफोनची भुरळ अधिक पुढे नेण्याचे काम सॅमसंग गॅलेक्सी मेगा करेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. चालू वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये ही मेगा मालिका बाजारपेठेत येईल, अशी अपेक्षा आहे.

Story img Loader