साचचि बोलाचें नव्हे हें शास्त्र ।

पैं संसारु जिणतें हें शस्त्र ।

आत्मा अवतरविते मंत्र ।

अक्षरें इयें ॥ १५.५७७ ॥

अर्थ- खरोखर हे नुसते बोलण्याजोगे शास्त्र नव्हे. ते संसार जिंकणारे शस्त्र आहे. आत्म्याला प्रकट करणारी (म्हणजे सर्व सगुण साकार ब्रह्मस्वरूपच आहे, असा प्रत्यय देणारी) ही मंत्राक्षरेच होत.

गीतेच्या लौकिक आणि अलौकिक शक्तीचे हे माउलींनी केलेले वर्णन साम्ययोगालाही लागू पडते. संसार जिंकावा आणि स्वत:सह सारे विश्व ब्रह्मरूप आहे हा अनुभव घ्यावा हे तर साम्ययोगाचे ध्येय आहे. विनोबांनीही एकाच वेळी लौकिक आणि अलौकिक पातळीवर पराक्रम साधला आणि तो साम्ययोगाच्या रूपाने जगासमोर ठेवला. प्रथम त्यांनी आईकडून परमार्थाचा लाभ करून घेतला. त्यानंतर ज्ञान व अनुभव या गुणांनी सिद्ध अशा ज्ञानेश्वरीपासून गीता समजून घेतली. तुकोबांसह अनेक संतांचा वाङ्मयाद्वारे सहवास मिळवला.

त्यानंतर निष्काम कर्माचा मूर्तिमंत पुतळा अशा महात्मा गांधींचा प्रत्यक्ष आणि गाढ सहवास त्यांना लाभला. शंकराचार्य-टिळकांसारख्या अनेक भाष्यकारांची गीताभाष्ये अभ्यासली. शेवटी अत्यंत कसोशीनें सतत गीतेबरहुकूम आचरण राखण्याचा प्रयत्न केला. या साधनेची फलश्रुती म्हणजे गीताई. ही वाङ्मयी मूर्ती जगासमोर आली आठ लक्षणांनी सजून. तिला ‘गीताईची अष्टसूत्री’, असेही म्हणता येईल. गीताईचे हे आठ विशेष असे –

(१) मातृभक्तीची परमसीमा (२) ज्ञानदेवांच्या अपूर्व ज्ञानानुभवाचे दर्शन (३) शंकराचार्य, टिळकादींचा बुद्धिबोध (४) तुकाराम, तुलसीदास आणि समर्थादी अनेक संतवचनांचा सत्संग (५) गीतेपूर्वीच्या धर्मवाङ्मयाचें मंथन (६) प्रत्यक्ष अनासक्त कर्मयोगाचें-दर्शन. महात्मा गांधींच्या सत्संगाचा लाभ (७) गीतेचे आचरण करण्याचा आटोकाट प्रयत्न (८) स्त्रिया-बाळे-ग्रामीण जन यांच्याविषयी अनुकंपा – नारायण भावनेने त्यांच्या सेवेविषयींचीं तीव्र तळमळ.

हा सर्व तपशील शिवाजीराव भावे लिखित विनोबा चरित्रात आला आहे. गीताईची अष्टसूत्री जशी आहे तसेच तिच्या रचनेची सहा धोरणेही आहेत. खुद्द विनोबांनी त्यांची नोंद केली आहे.

१. गीतेचा सर्वयोगसमन्वयकारी साम्ययोगपर अर्थ नीट प्रगट व्हावा.

२. पूर्वसुरींच्या, विशेषत: शंकर-ज्ञानदेव यांच्या, विशेष अर्थाना बाधा येऊ नये.

३. भाषांतरासारखे वाटू नये.

४. अर्थगांभीर्य कायम राखून होईल तितके सौलभ्य आणावे.

५. भाषेला निश्चित व्याकरण असावे.

६. ‘मी’ कोठेच नसावा.

‘गीतेचा अर्थ निश्चित करतेवेळी गीतेच्या पाचव्या अध्यायाने माझी कित्येक वर्षे खाल्ली. हा पाचवा अध्याय मोठा जटिल आहे. त्याचा अर्थ लावताना एका भाष्यकाराचे दुसऱ्या भाष्यकाराशी कुठे जमलेलेच नाही! जोवर या अध्यायाचा मला नीट उलगडा झाला नाही तोवर मी लिहायला सुरुवातच केली नाही. जेव्हा मनाची खात्री झाली की योग आणि संन्यास दोन्ही एकच आहेत आणि गीता भांडणाचा आखाडा नसून समन्वय करणारा ग्रंथ आहे, तेव्हा कुठे मी लेखनाला सुरुवात केली.’

भक्त आणि तत्त्वज्ञ अशा दोन्ही पातळय़ांवर विनोबांनी एक उंची गाठली होती. तरीही गीताईची रचना करताना त्यांना चिकाटीने प्रयत्न करावे लागले. ते कसे? पुढे जाणून घेऊ.

– अतुल सुलाखे

jayjagat24@gmail.com

Story img Loader