सर्वप्रथम मी आपल्या नवनिर्वाचित पंतप्रधानांचे हार्दिक अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारताची प्रतिमा सार्या विश्वात लखलखीत होवो व भारत सार्या विश्वापुढे एक उदाहरण बनो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. पंतप्रधान होऊ घातलेल्या मोदींचे व्यक्तिमत्त्वच असे आहे की लोक एक तर त्यांचे खंदे प्रशंसक असतात किंवा त्यांचा तिरस्कार करणारे कट्टर विरोधक तरी असतात. त्यांच्या कामगिरीकडे कुणीही ‘आपल्याला काय त्याचे?’ अशा त्रयस्थपणे पाहूच शकत नाही.
मी गोव्यात काम करत होतो त्याला आता १२ वर्षे झाली. तेव्हापासून मी नरेंद्र मोदींच्या गुजरातमधील कार्यपद्धतीबद्दल व त्यातून निष्पन्न झालेल्या गुजरातच्या प्रगतीबद्दल वाचत-पाहत आलेलो आहे व या अभ्यासातून मी मोदींचा एक खंदा प्रशंसक व समर्थक बनलो आहे. ‘वाचकांचा पत्रव्यवहार’सारख्या सदरातून मी त्यांच्याबद्दल सातत्याने लिहीतही आलेलो आहे. ‘कुणालाही फारसे माहीत नसलेल्या’ मोदींचे आजच्या ‘जगप्रसिद्ध व्यक्ती’मध्ये झालेले परिवर्तन व ते करत असतानाची त्यांची वाटचाल मी अभिमानाने पहात आलो आहे. या पुढेही त्यांच्या आंतरराष्ट्रीय कामगिरीबद्दल असेच लिहायला-वाचायला मिळेल, अशी मला खात्री आहे व ते करण्याइतके आयुरारोग्य मला देव देवो, अशी त्याच्याकडे माझी प्रार्थनाही आहे.
ते तर्कसंगतीने विचार करतात व त्यानुसार सद्यपरिस्थितीला योग्य असा निर्णय घेतला की ते सार्या शक्तीनिशी व पूर्ण उत्साहाने त्याची कार्यवाही करतात हेच माझ्या मते मोदींच्या यशाचे प्रमुख कारण आहे. त्यांच्या स्वभावात धरसोडवृत्तीचा संपूर्णपणे अभाव आहे हा एक ’बोनस’ मुद्दा!
दूरदृष्टी, योजनाबद्धपणे काम करण्याची पद्धत व बारीक-सारीक बाबींकडेसुद्धा लक्ष पुरवून कार्यवाही करणे या गुणविशेषात त्यांचा हात कुणी धरू शकेल, असे मला वाटत नाही. ‘यूपीए-२’च्या (संयुक्त पुरोगामी आघाडी) कारकीर्दीत घडलेला अभूतपूर्व पातळीवरील भ्रष्टाचार व त्या सरकारची अगदी सुमार कामगिरी पाहिल्यानंतर काँग्रेसचे दिवस भरत आल्याचे, ‘भाजप’ला सत्तेवर येण्याची सुवर्णसंधी असल्याचे आणि राष्ट्रीय पातळीवर असलेली ‘भाजप’च्या राजकीय नेतृत्वातील पोकळी त्यांना जाणवली व ती पोकळी भरून काढत त्या नेतृत्त्वावर दावा करण्याचा निर्णय त्यांनी दोन-एक वर्षांपूर्वीच घेतला. म्हणूनच २०१२ साली त्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपने जेव्हा ओळीने तिसर्या वेळी विधानसभेची निवडणूक प्रचंड मताधिक्याने जिंकली व गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला तेव्हा त्यांनी केलेले भाषण गुजराती भाषेत न करता सार्या राष्ट्राला कळावे म्हणून त्यांनी हिंदीतून केले होते. यातच त्यांची महत्वाकांक्षा व दूरद्ष्टी सार्या देशाच्या लक्षात आली. त्या आधी त्यांनी तीन दिवसांच्या उपोषणसत्रांद्वारा ‘सदभावना अभियोग’ चालविला होता. त्यांच्या या सार्या पावलांत त्यांच्यावर उल्लेखलेल्या सार्या गुणांची भारतीयांना खूप प्रकर्षाने जाणीव होत होती.
त्यांची भाजपच्या २०१४ सालच्या प्रचारमोहिमेचे प्रमुख म्हणून व पाठोपाठ पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवड झाल्यावर त्यांच्यातील वरील गुणांबरोबरच लोकांची नाडी जोखण्यातील त्यांची हातोटी व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी अत्याधुनिक तांत्रिक बाबींचा परिणामकारकपणे वापर करण्याचे त्यांचे कौशल्यही लक्षात येऊ लागले. जातीधर्माचा आधार न घेता केवळ ‘सर्वांचा सर्वांगीण विकास व सुशासन’ या बाबींवरच त्यांनी पूर्ण मोहिम चालविली. इतर पक्षांनी (बेगडी) धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा चढवला, ‘शाही’ (!) इमामांसारख्या धर्मगुरूंचे ‘आशीर्वाद’ही घेतले, पण तरीही मोदींनी आपले मुख्य धोरण बदलले नाही. अगदी राममंदिरासारख्या विषयाचा दुरुपयोगसुद्धा त्यांनी कटाक्षाने टाळला!
आजवर भारतात झालेली प्रत्येक निवडणूक पाहायचे भाग्य मला लाभलेले आहे. स्वतंत्र भारताच्या १९५२ सालच्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीत मी केवळ १० वर्षांचा होतो त्यामुळे त्या निवडणुकीवद्दल मला फारसे आठवत नाही, पण १९५७ पासूनच्या निवडणुकांच्या आठवणी खूप स्पष्ट आहेत व निवडणुकीचा ‘हंगाम’ आला की धर्मनिरपेक्षतेचा भाव एकदम कसा वधारतो हे मी तेव्हापासून पहात आलेलो आहे. यंदाच्या लोकसभेच्या निवडणूक प्रचाराच्या मोहीमेत तर हा विषय रंगमंचाच्या अगदी मध्यभागी होता. भाजपव्यतिरिक्त इतर सारे पक्ष या मुद्द्यावर एक होऊन ‘जातीयवादी पक्षाला आपली मते न देता धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असण्यार्या पक्षांनाच ती द्या’ या घोषणेचे पडघम कानठळ्या बसेपर्यंत बडवत होते. अर्थातच या प्रचारात काँग्रेस पक्ष आघाडीवर होता व गांधी परिवार हिरीरीने असली भाषणे ठोकत देशभर सभा घेत होता! त्यात त्यांनी शाही (!) इमामासारख्या धर्मगुरूचे समर्थन मिळविण्यासारखी निधर्मवादाला पूर्णपणे न शोभणारी पावलेही उचलली. भविष्यकाळात तरी धर्मगुरू मंडळी त्यांच्या पदाला न शोभणारी अशा प्रकारची कृती करणार नाहीत व सर्व धर्माचे भारतीय असल्या अयोग्य सल्ल्यांकडे दुर्लक्ष करतील, अशी आशाही आपण करू या!
वैयक्तिक पातळीवर माझा कधीच असल्या हास्यास्पद बेगडी धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नव्हता. त्यामुळेच मोदींची ‘India First’ ही धर्मनिरपेक्षतेची नवी सुलभ व्याख्या मला मनापासून पटली. कारण या व्याख्येत फक्त भारताच्या हितांना प्राधान्य दिलेले असून भारताच्या हितांव्यतिरिक्त इतर सर्व बाबींना फाटा दिलेला आहे. ‘भारत हे माझे दैवत असून भारताची राज्यघटना हाच माझा धर्मग्रंथ आहे’ हे ठासून सांगणारे मोदी मला अधिकच भावले. आपल्या राज्यघटनेनेही सर्व नागरिकांना-मग ते कुठल्याही धर्माचे असोत-समान लेखलेले आहे. त्यामुळे माझ्या मते धर्मनिरपेक्षतेला राज्यघटनेशिवाय इतर कुठलीही व्याख्या लागू होऊ नये व म्हणून इतर कुठली व्याख्याही कुणी वापरू नये असे मला वाटते.
पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वर्षानुवर्षे सत्ताप्राप्तीसाठी बहुतेक सर्व राजकीय पक्ष धर्मनिरपेक्षतेचा सर्रासपणे गैरवापर करताना आपण पाहतो. काही नेते केवळ मतांसाठी बेकायदेशीररीत्या भारतात घुसलेल्या बांगलादेशींना आपले राजकीय वजन खर्च करून भारताचे नागरिक बनविण्याची तर अलीकडे ममता बॅनर्जींच्या सारखे नेते केवळ ‘गठ्ठा मतदाना’चे तंत्र वापरण्यासाठी आपल्या राज्यातील बांगलादेशींना, ते बेकायदेशीर असले तरी, घालवू देण्यास नव्याने व प्राणपणाने विरोध करणारी कृत्ये करतात. खरे तर २००५ साली त्या विरोधी पक्षात असताना याच ममता बॅनर्जींनी अशा बेकायदेशीररीत्या पश्चिम बंगालात घुसलेल्या बांगलादेशींना लोकसभेत कसून विरोध करण्याचे देशभक्तीपूर्ण कृत्यही केले होते! संतापलेल्या ममता बॅनर्जी लोकसभेत तावातावात म्हणाल्या होत्या, ‘बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांची नावे पश्चिम बंगालच्या मतदारांच्या यादीत आलेली आहेत. याविरुद्ध राज्यसरकारने काहीही कारवाई केलेली नाही. म्हणून हा विषय चर्चेला घेतला गेला पाहिजे.’ जेव्हा उपसभापती चरण सिंग अटवाल यांनी ‘या सत्राच्या सुरुवातीलाच या महत्वाच्या विषयावर ४ तासांची विस्तृत चर्चा झालेली आहे’ असे सांगून परवानगी नाकारल्यावर ममता बॅनर्जीं भडकल्या व ‘मला जेव्हा एखादा विषय लोकसभेत उपस्थित करायचा असतो तेव्हा मला बोलूच दिले जात नाही. लोकसभेची सदस्य या नात्याने मलाही माझ्या लोकांना भेडसावणारा विषय उपस्थित करण्याचा हक्क आहे’ असे म्हणत व आपल्या हातातले कागद त्यांच्या दिशेने फेकत त्या आपल्या जागेवर येऊन बसल्या व हुंदके देऊ लागल्या! आता याच ‘दीदीं’ना एकाएकी याच बेकायदेशीर बांगलादेशी घुसखोरांचा पुळका का आला आहे? अवघ्या नऊ वर्षांत केवढा हा बदल? कधी-कधी ममता बॅनर्जीच्या वाणीतला आजचा विखार पाहिल्यावर प्रश्न पडतो की या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत की बांगलादेशच्या राष्ट्रपती आहेत?
२००१च्या जनगणनेनुसार भारतात ८० टक्क्यापेक्षा जास्त हिंदू, १३.४ टक्के मुसलमान, २.३ टक्के ख्रिश्चन व १.९ टक्के शीख व ०.८ टक्के बौद्ध आहेत. भारताची असामान्यता हिंदूंच्या लोकस्वभावामध्ये व हिंदुत्वामागील अध्यात्मिकतेमध्ये आहे. शेकडो खेड्यांमध्ये भेटणार्या सर्वसामान्य हिंदू लोकांत एक साधीसुधी, उपजत अध्यात्मिकता दिसते व या अध्यात्मिकतेमुळे तो दुसर्यांमधील विभिन्नतेचा स्वीकार करतो, मग तो ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, जैन असो वा अरब असो, फ्रेंच असो वा चिनी असो. या हिंदुत्वामुळे भारतीय ख्रिश्चन फ्रेंच ख्रिश्चनांपेक्षा वेगळा भासतो तर भारतीय मुसलमानही सौदी मुसलमानांपेक्षा वेगळा भासतो.
देवत्व वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या धर्मग्रंथांतून प्रकट होऊ शकते या कल्पनेचा हिंदू धर्म, हिंदू माणूस स्वीकार करतो. कदाचित् म्हणूनच असेल की सार्या जगात ठिकठिकाणी छळल्या गेलेल्या अल्पसंख्यांकांना फक्त हिंदूंनीच आश्रय दिलेला आहे. मग ते कित्येक वर्षांपूर्वी इथे आश्रयाला आलेले सीरियन ख्रिश्चन असोत, वा इराणहून आश्रयाला आलेले पारशी असोत, वा ज्यू असोत, आर्मेनियन्स असोत किंवा अगदी अलीकडे चीनच्या जुलमाला घाबरून आश्रयाला आलेले तिबेटी लोक असोत! ३५०० वर्षांच्या आपल्या इतिहासात हिंदूंनी कधीही दुसर्या कुठल्या देशावर लष्करी आक्रमण केलेले नाहीं किंवा तलवारीच्या बळावर किंवा प्रलोभने दाखवून इतर धर्मियांना धर्मांतर करण्यास प्रवृत्तही केलेले नाही.
मोदींची ‘India First’ ही व्याख्या भारतीय मतदाराला आता मनापासून पटलेली आहे, हे या निवडणुकीच्या निकालांनी स्पष्ट केलेले आहे. “अबकी बार, मोदी सरकार” या घोषणेने सारा देश मोदीमय झाला त्यात नवल ते काय?
या उत्स्फूर्त प्रेमाचे कारण काय असावे? मोदी भारताचा सर्वांगीण विकास करतील, नोकर्या निर्माण करतील व दंगे-धोपे होऊ देणार नाहीत (गुजरातमध्ये गेल्या १२ वर्षात एकही जातीय दंगल झालेली नाही), भारतीय असल्याचा अभिमान नव्याने जागृत करतील, अशा अनेक अपेक्षा ठेवून भारतीयांनी आज मोदींच्या नेतृत्वाला इतके अभूतपूर्व समर्थन देऊन त्यांना अशा प्रचंड मताधिक्याने निवडून दिले आहे. मोदी हे जरी एक राजकीय नेते असले तरी त्यांना आज भारतीय जनता एका जादूगाराच्या भूमिकेतच पाहू लागली आहे.
अनेक निवडणुका पाहिलेल्या वार्ताहरांनासुद्धा वाराणशी मतदारसंघात दिसणारा असा उन्माद, अशी कळकळ, अशी पोटतिडीक, असा उत्साह पूर्वी कधीही पाहायला मिळालेला नव्हता. गंगेच्या घाटावर जमलेल्या व बाकड्यावर गप्पा मारत बसलेल्या बुद्धिजीवी नागरिकांना-अन् यात नेते, विचारवंत, तत्वज्ञ, विद्वत्ते वा विद्यार्थी वगैरे सारे येतात-विचारल्यास मोकळेपणे दिलेली उत्तरे मिळतात. वाराणशीच्या जनतेला खराखुरा बदल, नगरपालिकेची संरचना व गंगा नदी स्वच्छ करून हवी आहे. म्हणूनच वाराणशीतही मोदी लाखोंच्या मताधिक्याने निवडून आले!
देशाच्या पातळीवर त्यांना चीनच्या व पाकिस्तानच्या अपमानांसमोर निधड्या छातीने उभा रहाणारा नेता हवा आहे. त्यांना विकास, सुबत्ता व नोकर्या निर्माण करणारे नवे आर्थिक धोरण हवे आहे. जनतेला शिक्षण क्षेत्रातील व आरोग्य खात्यातील सरकारी सेवांचा उबग आलेला आहे व मोदी सुशासनाद्वारे हे बदल घडवून आणतील, असा त्यांना विश्वास आहे.
भारतीय जनता मोदींकडून विकासाचीच अपेक्षा करत आहे, असे नाही तर ‘काँग्रेसला तुम्ही ६० वर्षें दिलीत, मला फक्त ६० महिने द्या’ या शब्दांत मतांचा जोगवा मागणारे मोदी पाच वर्षांत जणू एखादी जादूची कांडी फिरवून भारताचा संपूर्ण कायापालट करून टाकतील, अशी अभूतपूर्व अपेक्षा भारतीय जनता करत आहे. आधीच्या निवडणुकांत धर्मनिरपेक्षता आणि पक्षनेत्याच्या/उमेदवारांच्या व्यक्तिमत्वाच्या निकषावर निवडणुका लढविल्या व जिंकल्या जायच्या पण जेव्हा मोदींनी वाराणशीत एका विराट मिरवणुकीने येऊन आपले नामांकनपत्र निवडणूक अधिकार्याकडे सुपूर्द केले त्या दिवशी मनमोहन सिंग म्हणाले होते की मोदी-लाट वगैरे काहीही नसून ही प्रसिद्धीमाध्यमांनी बनविलेली लाट आहे.
भाजपने मोदींची पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून आपापसातील तंट्यांना तिलांजली दिलीच होती. केवळ मोदींना आपला एक नंबरचा शत्रू ठरवून त्यांना आपले एकमेव लक्ष्य समजण्याचे जे धोरण काँग्रेसने आचरले होते ते खोटे, अन्याय्य व धोकादायक असल्यामुळे त्या धोरणाला, त्या नेतृत्वाला भारतीय मतदारांनी कचर्याची टोपली दाखविलेली आहे. मोदींनी आता असत्याशी सत्याच्या आधारावर लढले पाहिजे. आज जगात १०० कोटी हिंदू आहेत, जगातील प्रत्येक सहा लोकांमधला एक हिंदू आहे. या जगातील सर्वात यशस्वी, कायदेपालन करणारा आणि संकलित असा हा समाज आहे. अशा समाजाला आतंकवादी कसे म्हणता येईल?
म्हणूनच मोदींनी सत्ताग्रहण केल्यानंतर आकस म्हणून नव्हे तर एक संशोधनपर अभ्यास म्हणून १९४७ पासून कुठल्या समाजाकडून अन्य समाजाचे किती लोक मारले गेले याची आकडेवारी तयार करून ती प्रसृत केल्यास ती सर्वच भारतीय जनतेला खूप काही सांगून जाईल!
आज सारे जग मोदींना त्यांच्या निवडणुकीतील अभूतपूर्व यशाबद्दल शुभेच्छा पाठवत आहे. अमेरिकेसारखा त्यांचा व्हिसा रद्द करण्याची उद्धट, उदाम कृती करणारा देश आज त्याच मोदींना ‘व्हाईट हाऊस’च्या भेटीचे निमंत्रण देत आहे. हे मोदींचे कर्तृत्व नजरेत भरण्यासारखे आहे यात शंका नाही. अख्ख्या भारताला मोदींचा अभिमान वाटत आहे, कौतुक वाटत आहे व ते भारताला यशाकडे नेऊ पाहणार्या नेतृत्वाकडे अपेक्षेने पाहत आहेत. प्रत्येक भारतीय त्यांच्या नेतृत्वाखाली भरपूर कष्ट करायला, मेहनत घ्यायला सज्ज झाला आहे. एक समर्थ नेता कसे देशाला आपली मरगळ झटकून पुन्हा कठोर कष्ट उपसण्यास, कार्यान्वित होण्यास प्रेरित करतो याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे.
मोदींच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या दीर्घ कारकीर्दीसाठी, त्यांच्या अभूतपूर्व यशासाठी व भारताच्या तेजस्वी भविष्यासाठी मी त्यांचा खंदा पुरस्कर्ता या नात्याने परमेश्वराकडे मनापासून प्रार्थना करू इच्छितो!
– सुधीर काळे, जकार्ता
sbkay@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)
BLOG : बेगडी धर्मनिरपेक्षता आणि सत्तापालट
पंतप्रधान होऊ घातलेल्या मोदींचे व्यक्तिमत्त्वच असे आहे की लोक एक तर त्यांचे खंदे प्रशंसक असतात किंवा त्यांचा तिरस्कार करणारे कट्टर विरोधक तरी असतात.
आणखी वाचा
First published on: 23-05-2014 at 01:15 IST
Web Title: Sattarth blog on narendra modi secularism