प्रमुख वक्ते श्री बाळ फोंडके यांच्या मार्मिक, अभ्यासपूर्ण आणि ओघवत्या भाषणाने दिवसाची सुरुवात झाली. ऋणानुबंध हे या अधिवेशनाचे ब्रीदवाक्य मनात ठेऊन त्यांनी रक्ताचे नाते, मानवी जीन्स आणि माणसाचा स्वभाव , सरोगेट प्रेग्नंसी असे विविध विषयांचे सखोल विवेचन केले. माणसाचे एकमेकांशी असलेले नाते आणि ऋणानुबंध यावर या निमित्याने एका वेगळ्या दृष्टीकोनातून माहिती मिळाली. त्यानंतर राहूल देशपांडे आणि सहकारी यांचे संगीत मानापमान, महेश काळे यांचा मेलान्ज म्हणजे संगीतप्रेमींना एक पर्वणी होती.
मानापमानमधील अनेक नाट्यगीतांनी “वन्स मोअर” मिळवला. संगीत मानापमान सुरु होते त्याच दरम्यान इतर सभागृहात स्थानिक कलाकारांनी संगीत, नृत्य आणि गायनाचे कार्यक्रम सादर केले त्यात नरेंद्र दातार यांचा स्वरगंध, ह्युस्टनच्या वर्षा हळबे यांचा कोमल वृषभाचे देणे यांचा समावेश होता. 
एकाच वेळी सुरू असलेल्या दोन चांगल्या कार्यक्रमापैकी अनेकांनी एकच कार्यक्रम पाहिला अशी नाराजी रसिकांकडून कानावर आलीउभ्या उभ्या विनोद हा उत्तर अमेरिकेतला कार्यक्रम प्रेक्षकांना खूप आवडला . पण हा कार्यक्रमालाही समांतर आयोजनाचा फटका बसला. वॉशिंग्टन डीसी मंड्ळाने सादर केलेली “उदाहरणार्थ एक” ही एकांकिका प्रेक्षकांना भावली.  अभिनेता प्रशांत दामले आणि  प्रसिद्ध दिग्दर्शन विजय केंकरे यांच्या गप्पांचा कार्यक्रम खूप रंगला. एक अभिनेता, गायक, निर्माता आणि माणुसकी जपणारा अशी ओळख असलेला प्रशांत दामले त्या गप्पांमधून प्रेक्षकांना जवळून बघता आला. गर्दी वाढल्यामुळे लोक आग्रहास्तव हा कार्यक्रम एकाच दिवशी दोन वेळा घ्यावा लागला. विविध किस्से, गाणी यांनी रंगलेल्या या कार्यक्रमानंतर संगीतकार अजय अतुल यांच्या गाण्याचा व त्यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम मुख्य सभागृहात होता. मेधा महेश मांजरेकर यांनी या गप्पांची सुरुवात केली. कमलेश भडकमकर आणि साथीदारांची साथ, ऋषिकेश रानडे, सावनी रविंद्र यांचे गायन आणि स्वत: अजय अतुल यांनी गायलेल्या गीतांची झलक, त्यामागे असलेले किस्से यामुळे हा कार्यक्रम उत्तम झाला. प्रसिद्ध निर्माते आणि अमेरिकेतल्या मराठी प्रेक्षकांचे लाडके महेश मांजरेकर यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम विशेष रंगतदार झाला. दिवसभरात कायक्रमाच्या मधल्या वेळात महाराष्ट्रातील विविध शाळा, महाविद्यालये यांचे माजी विदयार्थी एकमेकांना भेटले, एक्सपोमधील विविध बूथ्सना उपस्थितांनी भेटी दिल्या.   “फॅमिली ड्रामा” या नाटकातील मनाचा ठाव घेणा-या आणि सहज अभिनयामुळे सुकन्या मोने यांच्या चाहत्यांची संख्या वाढली आहे. छायचित्र काढून घेण्यासाठी आज त्यांच्याभोवती चाह्त्यांची गर्दी होती. साउंड सिस्टीम, माईक आणि इतर काही तांत्रिक बाबी यामुळे मुख्य सभागृहातल्या कार्यक्रमात आज व्यत्यय आला. ही एक बाब सोडली तरी इतर सर्व अतिशय चोख आयोजनामुळे  बीएमएमच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस हा संगीतप्रेमींकरता सुवर्णदिवस ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा