लाट आली की ती कुणाला तरी बाहेर फेकते, आणि कुणाला तरी आत खेचते. लाटेवरचे राजकारणही तसेच असते. १९७७-७८ ला देशात अशीच एक जनता लाट आली होती. त्यात अनेक राजकारण्यांचा जन्म झाला. श्रीगोंद्याचे बबनराव पाचपुते हे त्यांपैकी एक. उसाइतकेच राजकारण्यांचे अमाप पीक देणाऱ्या नगर जिल्ह्य़ातील पाचपुते नावाचा आणखी एक राजकारणी राज्याच्या राजकारणात बघता-बघता पुढे सरकला. तत्व एकच. सत्ता! म्हणजे पक्ष अनेक, निष्ठा अनेक, पण सता हे लक्ष्य एकच.
जनता लाटेने महाराष्ट्रातील राजकारणही बरेच अस्ताव्यस्त केले. त्या लाटेलाही दोन-तीन वर्षांतच ओहोटी लागली, परंतु त्याच लाटेत जनता पक्षाचे आमदार म्हणून बबनराव पाचपुते यांचा १९८० मध्ये पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश झाला. पुढे बबनराव पक्ष बदलत राहिले, निवडून येत राहिले. जनता पक्षाचा जनता दल झाल्यावर त्यांनी १९९० नंतर आपल्यासोबत आणखी आठ-दहा आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हांपासून शरद पवार हे त्यांचे नेते झाले. मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला. १९९५ च्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून विधानसभेत निवडून आले. पुढे पवार यांच्यासोबत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले. १९९९ च्या निवडणुकीत सरळ लढतीत मात्र त्यांना काँग्रेसकडून पराभव पत्करावा लागला. २००४ च्या निवडणुकीत त्यांना अपक्ष म्हणून लढावे लागले, त्यावेळी ते निवडून आले. राष्ट्रवादीचा दरवाजा खुला होताच. पुन्हा मंत्री झाले. २००९ मध्येही विजयी झाले, परंतु पक्षनेतृत्वाने त्यांच्याकडे जेव्हा आदिवासी विकास खाते दिले, त्याचवेळी पाचपुते यांच्या भोवती काही तरी गडबड-घोटाळा पिंगा घालतोय, याची चर्चा सुरु झाली. काँग्रेसचे आदिवासी विकास राज्यमंत्री पद्माकर वळवी हे त्यांच्याच कॅबिनेट मंत्र्यावर जाहीरपणे भ्रष्टाचाराचे आरोप करु लागले. मधुकर पिचडांसारखा त्यांच्याच जिल्ह्य़ातील नेता त्यांच्याविरोधात गेला. पाचपुते पक्ष बदलतत राहिले, लढत राहिले आणि सत्ताही सावलीसारखी त्यांच्यासोबत राहिली.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच पिचड-पाचपुते वाद विकोपाला गेला. या वादाला स्थानिक राजकारणाची किनारही असल्याचे बोलले जाते. नगर हा साखर सम्राटांचा आणि सहकार सम्राटांचा जिल्हा. प्रस्थापितांना आव्हान देणे सोपे नसते. मात्र पाचपुतेंनी खासगी साखर कारखानदारीच्या माध्यमातून समांतर संस्थात्मक साम्राज्य उभे करण्याचा प्रयत्न केला. हा संघर्ष अटीतटीचा होता. पक्षनेतृत्वही विरोधात गेल्याचे दिसताच, नरेंद्र मोदीप्रणित भाजपच्या लाटेकडे ते ओढले गेले. सत्तेत राहण्याची एकदा चटक लागली की मग, तत्व बित्व हा सारा फिजूल मामला असतो. जनता पक्षाच्या लाटेत एक राजकारणी म्हणून जन्माला आलेले बबनराव पाचपुते आता भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या आपल्या पूर्वीच्याच दोन पालक पक्षांबरोबरच दोन हात करायला मैदानात उतरले आहेत.
बबनराव पाचपुते: जनता पक्ष ते भारतीय जनता पक्ष
लाट आली की ती कुणाला तरी बाहेर फेकते, आणि कुणाला तरी आत खेचते. लाटेवरचे राजकारणही तसेच असते. १९७७-७८ ला देशात अशीच एक जनता लाट आली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-10-2014 at 03:30 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Seesaw condition of babanrao pachpute