सलग दुसऱ्या व्यवहारात तेजी नोंदविताना सेन्सेक्समध्ये मंगळवारी शतकी भर पडली. महिन्याभरातील या पहिल्या वाढीने मुंबई निर्देशांक २५,८५० च्या पुढे गेला. निफ्टीतील वाढही निर्देशांकाला ७,८०० पुढे घेऊन गेली. १०४.३७ अंश वाढीसह सेन्सेक्स २५,८६४.४७ वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३०.९५ अंश वाढीमुळे ७,८३७.५५ पर्यंत गेला. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे एकूणच जागतिक बाजार सावरतानाचे चित्र मंगळवारी दिसले.

महिन्यातील पंधरवडा संपला असला तरी या दरम्यान नऊ दिवसच बाजारात व्यवहार झाले. मात्र या दरम्यानची पहिली निर्देशांक वाढ अखेर मंगळवारी नोंदली गेली. नव्या सप्ताहाची सुरुवात करतानाही सेन्सेक्सने जवळपास दीडशे अंशांची आपटी नोंदविली होती. या दिवशी विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी १,०५१.२६ कोटी रुपयांची विक्री केली. मंगळवारचे व्यवहार मात्र तेजीसहच सुरू झाले.
यामुळे मुंबई शेअर बाजार व्यवहारात थेट २५,९४८ पर्यंत गेला. तर निफ्टीने सत्रात ७,८६०.४५ पर्यंत झेपावला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही सावरलेल्या बाजाराची छाया येथे उमटली. हाँगकाँग, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, तैवान हे निर्देशांक दीड टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवीत होते. सेन्सेक्समधील गेल हा समभाग सर्वाधिक ४.०४ टक्क्यांसह वाढला. तर आयटीसी, आयसीआयसीआय बँक, वेदांता, टाटा स्टील, हिंदाल्को, एचडीएफसी, सन फार्मा यांच्या मूल्यात वाढ झाली.

सेन्सेक्समधील ३० पैकी २० समभाग वाढले. तर मूल्य घसरलेल्या १० समभागांमध्ये इन्फोसिस, डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज यांचा समावेश राहिला. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये पोलाद, आरोग्यनिगा हे निर्देशांक एक टक्क्यापर्यंतची घसरण नोंदविते झाले. मुंबई शेअर बाजारातील स्मॉल व मिड कॅप निर्देशांकही अध्र्या टक्क्यापर्यंत वाढले.
रुपयातील तीन सत्रांतील घसरणीलाही खंड
मुंबई : विदेशी चलन मंचावर डॉलरच्या तुलनेत रुपयाने गेल्या तीन व्यवहारांतील घसरणीला मंगळवारी पायबंद घातला गेला. ३ पैशांनी वधारून रुपया ६६.०३ वर स्थिरावला. गेल्या सलग तीनही व्यवहारांत रुपया घसरला होता. ही एकत्रित घसरण ४४ पैशांची राहिली आहे. यामुळे स्थानिक चलनाचा प्रति डॉलर ६६ पल्याड पोहोचला होता. मंगळवारचा त्याचा प्रवास ६६.१० ते ६५.९० असा तेजीचा राहिला.

Story img Loader