गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तिखट शब्दांत टीका केली आहे. मोदी सरकारने राष्ट्रहिताचे कोणतेच काम केले नसल्याचा आरोप करत नरेंद्र मोदी हे पूर्वी यूपीए सरकारच्या चुका काढत असत. आता पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर मौन का बाळगले आहे. राफेल विमान व्यवहारप्रकरणी श्वेत पत्रिका आणण्याची मागणीही केली. श्वेत पत्रिकेमुळे जनतेसमोर सर्व तथ्ये येतील असा दावा त्यांनी केला.

सत्तेत येण्यापूर्वी मोदींनी पारदर्शक व्यवहारासह अनेक आश्वासने दिली होती. पण यातील कोणतेच आश्वासन पूर्ण झाले नाही. राफेल व्यवहारावरुन स्पष्ट होते की, यांच्यात कसलीच पारदर्शकता नाही. अनिल अंबानींना बक्षिस स्वरुपात हा व्यवहार देण्यात आला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

वाघेलांनी गुरुवारी एकापाठोपाठ एक ट्विट करत मोदींवर निशाणा साधला. २०१९ ची लोकसभा निवडणूक ही सामान्य जनता आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील थेट लढत असेल. सर्व राजकीय पक्षांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देऊन मोठ्या हेतूने एकत्र येण्याचे अपील त्यांनी केले.

पेट्रोल-डिझेलच्या दरावर भाष्य करताना वाघेला म्हणाले, जेव्हा मोदी मुख्यमंत्री होते. तेव्हा ते केंद्रातील यूपीए सरकारच्या चुका काढत असत. आता पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत. पण आता मात्र त्यांनी मौन साधले आहे. विरोधात असताना घसरणाऱ्या रुपयामुळे देशाची प्रतिष्ठा ढासळल्याचा दावा करणारे आता गप्प का आहेत.