महाराष्ट्रातल्या निवडणुकांसाठी भाजपाचे नेते काश्मीरमधून ३७० कलम हटवलं याचं उदाहरण देतात. अमित शाह सांगतात, आता काश्मीरमध्ये शेती शक्य आहे. मला सांगा आता इथलं घरदार सोडून काश्मीरमध्ये कोण शेती करायला जाईल? आहे कोणी मायेचा पूत? अशी विचारणा शरद पवार यांनी जाहीर सभेत केली. कुणी मुद्द्याचं बोलतच नाही. महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी आत्महत्या, ढासळती अर्थव्यवस्था यावर बोला की असाही सल्ला शरद पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना दिला.

पुलवामाचा बदला हवाईदलाच्या सैनिकांनी घुसुन मारुन घेतला मात्र श्रेय कुणी घेतले? असा उपरोधिक टोला लगावतानाच ‘करुन गेलं गाव आणि भलत्याचंच नाव अशी सध्याची भाजपाची परिस्थिती आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी उरळी कांचन येथील जाहीर सभेत केली.

पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाला त्याचा बदला घेण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता.मात्र श्रेय मोदी घेण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही शरद पवार यांनी केला. आज पुणे जिल्हयातील शिरुर मतदारसंघातील उरळी कांचन येथे शरद पवार यांची जाहीर सभा झाली .यावेळी शरद पवारांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधला.

आपल्याला परिवर्तन घडवायचे आहे.  बदल घडवायचा आहे म्हणून अशोक पवार यांना निवडून द्यायचे आहे. तुम्ही संधी दिली तेव्हा अशोक पवार यांनी चांगले काम केले. कारखाना योग्यप्रकारे चालवला मात्र तुम्ही मागच्या वेळी वेगळा निर्णय दिला. त्यामुळे मागे घेतला तसा निर्णय घेऊ नका असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले.