बॉलिवूडमध्ये कितीही चमेली अथवा मल्लिका आल्या तरी रूपगर्विता म्हणून तिची ओळख आजही कायम आहे अशी श्रीदेवी आता रुपेरी पडद्यावर आपली दुसरी इिनग तेवढय़ाच जोरदारपणे खेळण्यास सज्ज झाली आहे, ते सुद्धा तब्बल १५ वर्षांनी. ‘इंग्लिश व्हिंग्लिश’ या चित्रपटाद्वारे श्रीदेवी पुन्हा प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे तिच्या या कमबॅकची धुरा सांभाळली आहे ती मराठमोळी दिग्दर्शिका गौरी शिंदे यांनी. ‘इंग्लिश व्हिंग्लिश’ या चित्रपटाची कथा हीच एका महिलेवर आधारित असून ती आयुष्यात सर्व संकटांना कशा प्रकारे तोंड देते हे यामध्ये अत्यंत प्रखरतने दाखविण्यात आले आहे. श्रीदेवी ही या महिलेची भूमिका साकारत आहे. गौरी शिंदे यांनीच या चित्रपटाची कथा लिहिली असल्याने त्यामध्ये या महिलेच्या सशक्त व्यक्तिरेखेला दाखविण्यात आले आहे. याबाबत बोलताना गौरी शिंदे यांनी सांगितले की, गेली अनेक वर्षे ही कथा माझ्या डोक्यात घोळत होती. कोणत्याही सर्वसामान्य महिलेला किंवा व्यक्तीला भीती वाटते ती इंग्रजीमधून संभाषण करण्याची अथवा ती भाषा आत्मसात करण्याची. या चित्रपटातील ही महिलाही इंग्रजी येत नसल्याने कशी अडचणीत सापडते तसेच ती त्यावर कशी मात करते हेही दाखविण्यात आले आहे. अर्थात ही महिला भारतात राहात नसून ती न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असल्याचे दाखविण्यात आले आहे. विवाहानंतर ती पहिल्यांदाच सातासमुद्रापल्याड येते व केवळ इंग्रजी चांगले येत नसल्याने तिला अनेक संकटांचा सामना करावा लागतो; पण ही महिला त्यावर अत्यंत संयमाने व चतुरतेने मात करते. श्रीदेवी ही खरोखरच गुणी अभिनेत्री असून तिने या महिलेच्या व्यक्तिरेखेला चांगलाच व परिपूर्ण न्याय दिल्याचेही गौरी शिंदे यांनी स्पष्ट केले. निर्माता व दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका सांभाळताना अनेकदा चांगलीच कसोटी लागल्याचेही त्यांनी सांगितले. आर. बाल्कीची पत्नी अशीही माझी ओळख असली तरी गौरी शिंदे हीही ओळख राहावी, ही आपली इच्छा असल्याचेही तिने सांगितले. ६ ते १६ सप्टेंबरदरम्यान टोरॅंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या चित्रपटाचा प्रीमिअर होणार असून १४ सप्टेंबर रोजी तो सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. स्वानंद किरकिरे यांनी लिहिलेल्या गीतांना अमित त्रिवेदी यांनी स्वरसाज चढविला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा