डॉ. गंधाली देवरुखकर, स्त्रीरोगतज्ज्ञ

डॉ. पवन कुमार, हृदय शल्यचिकित्सक

हवेत गारवा आणि धुक्याची दुलई पसरली की कसे आल्हाददायक वाटते. मात्र सध्या मुंबईसह राज्यातील काही शहरांमध्ये पसरलेले धुके आरोग्यासाठी धोकादायक आहे. धूर आणि धुके यांच्या मिश्रणापासून तयार झालेल्या धुरक्यामुळे दमा, श्वसनविकार असलेल्या रुग्णांचा आजार बळावण्याची शक्यता आहे. गर्भवती महिला आणि लहान मुलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असते. त्यांनाही या वातावरणाचा फटका बसू शकतो.

दुपारी ३० ते ३५ अंश सेल्सिअसवर जाणारा तापमानाचा पारा गेल्या काही दिवसात २७-२८ अंशे सेल्सिअसवर आला आहे. रात्री तर तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जात आहे. ईशान्य आणि उत्तरेकडून येत असलेली थंड हवा आणि पश्चिमेकडून येणारी बाष्पयुक्त हवा यांमुळे मुंबईसारख्या किनारपट्टीच्या शहरात दिवसभर धुके पसरल्याचा अनुभव सध्या येत आहे. थंडीत पडणारे धुके हे नैसर्गिक आहे. रस्त्यांवरील लाखो वाहनांमधून निघणारा धूर या धुक्यात मिसळल्यामुळे धुरके तयार होतात. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर, सतत सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेत भरून राहणारे सिमेंट, रेतीचे अगणित कण तसेच कचरा जाळल्याने हवेत मिसळणारे वायू यांमुळे वर्षभर प्रदूषण होत राहते. मात्र समुद्राने वेढलेल्या मुंबईत सकाळी

दहा-अकरा वाजण्याच्या सुमारास समुद्रावरून येणारे जोरदार वारे हे सर्व प्रदूषण त्यांच्यासोबत घेऊन जातात आणि शहराची रोज सफाई होते. वर्षभर चालणारी ही क्रिया थंडीच्या ऋतूत मात्र मंदावते. समुद्रावरून येणारे वारे क्षीण होऊन त्यांची जागा उत्तर किंवा ईशान्येकडून जमिनीवरून वाहत येणारे तुलनेने कमी वेगाचे वारे घेतात. त्यामुळे हवेच्या नैसर्गिक सफाईवर बंधने येतात. त्यातच हवेचा जमिनीलगतचा थर थंड झाल्याने वायू अभिसरणाची क्रियाही मंदावते आणि कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड असे हानीकारक घटक जमिनीलगतच्या थरातच अडकून बसतात. समुद्रकिनारी असल्याने बाष्पाचे प्रमाणही जास्त असल्याने हवेत धुके पसरल्याचे दिसते. मात्र प्रत्यक्षात प्रदूषणकारी धूर आणि धुके यांच्या मिश्रणाने गडद धुरके पसरते. सकाळी ‘मॉर्निग वॉक’साठी बाहेर पडलेल्यांना शहरात थंड हवेच्या ठिकाणाचा परिणाम दिसत असला, तरी प्रत्यक्षात मात्र ते आजारांसाठी निमंत्रण असते. त्यामुळे ‘क्रोनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मनरी डिसीज’ (सीओपीडी) अर्थात काळ्या दम्यासारख्या श्वसनविकाराच्या गंभीर आजाराची समस्या वाढण्याची भीती असते.

लहान मुले आणि गर्भवतींना धोका

हवेतील धुकेआणि धूरयुक्त हवेमुळे लहान मुले आणि गर्भवतींवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. लहान मुले, गर्भवती, वृद्ध यांची रोगप्रतिकारक्षमता कमी असल्यामुळे त्यांना थंडीमध्ये वारंवार सर्दी, पडसे, खोकला, ताप या आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. सध्या मोठय़ा प्रमाणात तयार होत असलेल्या धुरक्यांमुळे धाप लागणे, छातीत जळजळ होणे तसेच न्युमोनियाची लागण होऊ  शकते. वातावरणातील धुरक्यांमुळे श्वसनमार्गाचे आजार, अर्धशिशी यांसारखा त्रास सुरू होतो. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये हे जीवाणू श्वसनमार्गातून  पसरतात. अशा स्थितीमध्ये गर्भवती महिलांना जास्त क्षमतेची औषधे देणे योग्य नसते. गर्भवती महिलांची नैसर्गिक प्रसूती होण्यासाठी त्यांना मोकळ्या हवेत चालण्याचा सल्ला दिला जातो. परंतु सध्याची दूषित वातावरणाची परिस्थिती पाहता त्यांनी घरातल्या घरातच चालणे फायद्याचे आहे.

आहार, व्यायाम आणि विश्राम

चौरस आहार, विश्राम आणि व्यायामामुळे रोगप्रतिकार क्षमता चांगली होते. आजार होऊ  नयेत यासाठी जेवणाच्या वेळा सांभाळा. आहारात पालेभाज्या, कडधान्ये, फळे, दूध यांचा आवर्जून समावेश करा. उघडय़ावरील अन्नपदार्थ खाऊ  नयेत आणि जास्त प्रमाणात फास्ट फूड खाणेही धोक्याचे आहे. अवेळी खाणे टाळा. पुरेशी झोप निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असते. त्यामुळे किमान ६ ते ७ तास झोप घ्या.

सकाळी चालणे टाळा

निरोगी आयुष्यासाठी व्यायाम हा महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा चालणे किंवा धावणे यांसारख्या व्यायामासाठी सकाळी लवकर घराबाहेर पडण्याची सवय असते. चालणे हे आरोग्यासाठी हितकारक असले तरी सकाळी सकाळी धुक्यातून किंवा धुरकेयुक्त वातावरणात चालणे अनेक आजारांना आमंत्रण देऊ  शकतो. त्यामुळे सकाळी लवकर न जाता थोडे उशिरा चालणे केव्हाही चांगले. चालणे किंवा धावण्यासाठी सायंकाळची वेळ योग्य ठरू शकते.

श्वसनाचे विकार

सध्या होत असलेल्या धुरकेयुक्त वातावरणाचा पहिला परिणाम व्यक्तीच्या श्वसन संस्थेवर होतो. फुप्फुसाचा कर्करोग, विविध प्रकारच्या हृदयरोगामागे श्वसनातून शरीरात जाणारी दूषित हवा कारणीभूत असते. या धुरक्यामुळे शुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांना सूज येते. वाहतूक प्रदूषणातून बाहेर पडणारी अल्ट्राफिनसारखी प्रदूषके वाहिन्यांतील रक्तप्रवाहात अडथळा आणतात. हृदयरोग झालेले रुग्ण आणि

दमाविकार असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक त्रास होतो, तसेच विविध प्रकारची अ‍ॅलर्जी असलेल्या व्यक्तींनाही धुरक्याचा त्रास जाणवतो. सर्दी, खोकला झालेले रुग्ण सकाळी फिरायला गेले की त्यांचा त्रास वाढतो.

Story img Loader