सुमारे ३२६ कोटी रुपयांचा खर्च
नागपूर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्पात वन्यप्राण्यांच्या सुरक्षित संचारासाठी सुमारे २९५ वन्यजीव केंद्रीत क्षेत्रात ओलांडमार्ग (भ्रमणमार्ग) तयार करण्यात येत आहेत. याशिवाय वन्यप्राण्यांसाठी पर्यावरणस्नोही व हरित पायाभूत सुविधाही उभारण्यात येत आहेत.
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग ४४ हा वन्यप्राण्यांसाठी भुयारी मार्ग उभारून तयार करण्यात आलेला पहिला महामार्ग आहे. २०१९ साली सुमारे पाच हजार ६७५ तर २०२० मध्ये सुमारे १६ हजार ६०८ वन्यप्राण्यांनी या भुयारी मार्गाचा वापर केल्याचे स्पष्ट झाले. त्याच धर्तीवर समृद्धी महामार्गावर वन्यप्राण्यांसाठी उपशमन योजना तयार करण्यात आली आहे. १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणारा हा ७०१ किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. काटेपूर्णा, कारंजा सोहोळ आणि तानसा अभयारण्याच्या ‘इको सेन्सेटिव्ह झोन’मधून तो जात असल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी पर्यावरणस्नोही व हरित पायाभूत सुविधा उभारण्याकरिता सुमारे ३२६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. भारतीय वन्यजीव संस्थेने केलेल्या अभ्यासानंतर या वन्यजीवस्नोही उपाययोजना उभारण्यात येत आहेत. हा महामार्ग तीन अभयारण्यातून जात असला तरीही अनेक ठिकाणी वन्यजीवांचे भ्रमणमार्ग आहेत. ते शोधण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने वन्यप्राणी अधिवास आणि त्याच्या भ्रमणमार्गाची माहिती दिल्यानंतर डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेने त्यासाठी आवश्यक उपशमन योजना तयार केली. त्यानुसार महामार्गावर काही ठिकाणी भुयारी मार्ग, काही ठिकाणी महामार्गाच्या वरून मार्ग, लहानमोठे पूल, बॉक्स कलव्हर्ट यासह वन्यप्राण्यांसाठी ध्वनी नियंत्रण तरतूद करण्यात येणार आहे. एवढेच नाही तर आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक भिंतीची उंची देखील वाढवण्यात येणार आहे. वन्यजीवांच्या नैसर्गिक हालचालींवर गदा येणार नाही या दृष्टिकोनातूनच या महामार्गाची निर्मिती करण्यात येत आहे. वन्यप्राण्यांसाठी उपशमन योजनेअंतर्गत विविध प्रकारचे २९५ ओलांडमार्ग असणारा हा भारतातील पहिलाच महामार्ग आहे