बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची लेक जान्हवी कपूरने ‘धडक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटानंतर जान्हवीकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या असून ती लवकरच ‘तख्त’ आणि फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. सध्या गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकचं चित्रीकरण सुरु असून जान्हवी या चित्रपटामध्ये गुंजन यांची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या निमित्ताने श्रीदेवी यांच्या रील आणि रिअल अशा दोन्ही मुली पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करणार आहेत.

कारगिल युद्धात गुंजन फ्लाईट लेफ्टनंट श्रीविद्या राजनसोबत लढाऊ विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांची ही शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी निर्माता दिग्दर्शक करण जोहर सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने करण श्रीदेवी यांच्या दोन्ही मुलींना एकत्र आणणार आहे. या चित्रपटात जान्हवीची मुख्य भूमिका असून बालकलाकार रिवा अरोडादेखील आता या चित्रपटाचा एक भाग होणार आहे.

श्रीदेवी यांच्या कारकिर्दीमध्ये  ‘मॉम’ हा अखेरचा चित्रपट ठरला होता.  या चित्रपटामध्ये रीवाने श्रीदेवी यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर रिवा गुंजन सक्सेना यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने रिवा आणि जान्हवी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. रिवाने याविषयी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

श्रीदेवी यांच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन मुली पहिल्यांदाच एकत्र काम करणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या दोघींव्यतिरिक्त अंगद बेदीदेखील या चित्रपटात झळकणार असून तो गुंजन यांच्या भावाची भूमिका वठविणार आहे.

 

Story img Loader