मुंबई : जागतिक अर्थव्यवस्थेवरील मंदीच्या सावटाची चिंता असतानाच, खनिज तेलाच्या तापलेल्या किमतीमुळे चलनवाढीची डोकेदुखी आणखीच बळावत जाणार या भीतीने सोमवारी जगभरातील प्रवाहाला अनुसरून भारताच्या भांडवली बाजारातही निर्देशांक गडगडले. धातू, बँका आणि वाहन कंपन्यांच्या समभागांना विक्रीच्या लाटांचा सर्वाधिक तडाखा बसला.

सप्ताहाअखेरच्या सत्रात रिझव्‍‌र्ह बँकेच्या अपेक्षेप्रमाणे आलेल्या निर्णयामुळे सेन्सेक्स – निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी दीड टक्क्यांहून मोठी वाढ साधली होती. त्याच्या अगदी उलट सोमवारच्या सत्रात दोन्ही निर्देशांक एक टक्क्याच्या फरकाने आपटले. सेन्सेक्स ६३८.११ अंश (१.११ टक्के) कोसळून ५६,७८८.८१ वर बंद झाला. दिवसभरात तो ७४४ अंशांपर्यंत गडगडून ५६,६८३.४० या नीचांकपदाला पोहोचला होता. बरोबरीने निफ्टी निर्देशांक २०७ अंश (१,२१ टक्के) घसरून १६,८८७.३५ वर दिवसअखेरीस स्थिरावला. निफ्टी निर्देशांकांत सामील ५० पैकी ४२ समभागांचे मूल्य नकारात्मक पातळीवर बंद झाले.

बाजारावर आदळत असलेल्या नकारात्मक गोष्टीत, तापलेल्या खनिज तेलाच्या किमतींनी  भर घातली. परिणामी बाजारात अस्थिरता दिसून आली, असे निरीक्षण आयडीबीआय कॅपिटलचे संशोधन प्रमुख ए. के. प्रभाकर यांनी नोंदविले. सोमवारी खनिज तेलाच्या जागतिक किमती पिंपामागे ४ डॉलरने वाढल्या.

रुपयाचा नवीन नीचांक

आयातदारांनी डॉलरच्या मागणीत वाढ केल्याने आणि नजीकच्या भविष्यात खनिज तेलाच्या किमतीत वाढ होण्याची शक्यतेने भारतीय चलन अर्थात रुपया सोमवारी विक्रमी नीचांकीकडे घसरला. मध्यवर्ती बँकेने  रुपयातील पडझड रोखण्याचा प्रयत्न केला, तरी ते डॉलरच्या मुकाबल्यात अन्य आशियाई चलनांच्या बरोबरीने गडगडले. गेल्या आठवडय़ात नोंदविलेल्या ८१.९५ या सार्वकालिक नीचांकी पातळीच्या जवळच ते सोमवारच्या सत्रादरम्यान ते ८१.९१ पर्यंत घसरले होते. तथापि दिवसअखेरीस प्रति डॉलर ४९ पैशांच्या घसरणीसह ते ८१.८९ या पातळीवर स्थिरावले. रिझव्‍‌र्ह बँकेने ८१.८५  ते ८१.९० पातळीवर डॉलरची विक्री केल्याने चलनाचे अवमूल्यन रोखण्यास मदत झाल्याचे चलन बाजारातील व्यापाऱ्यांनी सांगितले. परदेशी गुंतवणूकदारांनी अलीकडेच भारतीय भांडवली बाजारात केलेली समभाग विक्री आणि निरंतर गुंतवणूक काढून घेण्याच्या धोरणाने रुपयांच्या मूल्यावर ताण वाढविला आहे.

Story img Loader