मराठवाड्यातील दुष्काळाच भयावह वास्तव आजही नाकारता येत नाही. मात्र या सर्वांवर मात करून बीड जिल्ह्यातील कोळपिंपरी गावाने ‘वॉटर कप’ स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमाक मिळवला. धारुर तालुक्यात अव्वल स्थान पटकवल्यानंतर गावाला १८ लाखांच पारितोषिक मिळालं. या यशामुळे पंचक्रोशीत गावाचा नावलौकिक झाला. पण या यशानं नागरिक समाधानी नाहीत. कारण दुष्काळमुक्त गावाचा त्यांनी ठाम संकल्प केलायं. यासाठी ते कष्ट घेत आहेत. स्पर्धेनंतर देखील गावातील नागरिकांनी परिसरात तब्बल अकराशे रोप लावली आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून या गावात उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. एवढंच नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना दीड ते दोन किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो. मात्र बदल घडवण्याची धमक दाखवत तरुणाई एकत्र आली. ‘वॉटर कप’ स्पर्धेत तालुक्यात गावाने प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे गावात नवचैतन्याच वातावरण निर्माण झाल्याच आज पाहायला मिळते. कोळपिंपरी गावाला तब्बल १८ लाखांच पारितोषिक मिळून सुद्धा येथील नागरिकांचे पाय जमिनीवर आहेत. गावातील जाणकार मंडळींनी आणि ग्रामसेवकांनी गावाच्या परिसरात झाडे लावायचं ठरवलं. ही संकल्पना सत्यात उतरवताना महाराष्ट्र शासनेच्या योजनेतून तब्बल ५०० झाड गाव परिसरात लावली.
सामाजिक बांधिलकी म्हणून काही नागरिकांनी सीताफळ, करंजी, चिंच, गुलमोहर, अशी एक ना अनेक प्रकारची ३०० रोपं गावाला भेट दिली. त्यामुळं गावातील तरुणांना ऊर्जा मिळाली. तरुणाईने देखील स्व:खर्चाने आपापल्या शेतात तब्बल ३०० ते ४०० आंब्याची रोप लावली. तसेच गावातील प्रत्येक गल्लीत फुलांची झाड लावण्याक आली आहेत. आदर्श गल्लीसाठी गावात चढाओढ पहायला मिळत आहे. गावातील परिसर चकाचक केला असून गाव आता सुंदर दिसत आहे. ‘वॉटर कप’च्या माध्यमातून २० हजार घनमीटर जल संधारणाची काम झाली आहेत. समाधानकारक पाऊस झाल्याने गावाशेजारील खडड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून आदर्श गावाकडे कोळपिंपरी गावाची वाटचाल सुरू आहे. काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत मूठभर राजकारणी लोकांमुळे गावाचा नावलौकिक जाऊ नये, यासाठी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी नागरिक प्रयत्नशील आहेत.