महिला नेतृत्वाच्या रुपात रिझव्र्ह बँकेला पहिल्यांदाच मुख्य वित्तीय अधिकारीपदावरील व्यक्ती मिळाली आहे. ‘एनएसडीएल’च्या उपाध्यक्षा सुधा बालकृष्णन यांची रिझव्र्ह बँकेच्या मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तत्कालिन डेप्युटी गव्हर्नर ऊर्जित पटेल हे रिझव्र्ह बँकेत सप्टेंबर २०१६ मध्ये मध्यवर्ती गव्हर्नर झाल्यानंतर मुख्य वित्तीय अधिकारी पदनिर्मिती हा मोठा फेरबदल आहे. आक्टोबर २०१७ मध्ये बँकेत हे पद भरण्याबाबतचे सुतोवाच प्रथम करण्यात आले होते. रिझव्र्ह बँकेच्या वित्तीय कामगिरीचे नेतृत्व या पदाकडे असेल. त्याचबरोबर बँकेचा ताळेबंदाची जबाबदारीही सुधा यांच्याकडे असेल. सुधा बालकृष्ण या ‘एनएसडीएल’ या देशातील पहिल्या मोठय़ा डिपॉझिटरी सेवा कंपनीच्या पहिल्या ज्येष्ठ महिला अधिकारी राहिल्या आहेत. रिझव्र्ह बँकेच्या संचालक मंडळातील सुधा या आता १२ व्या संचालक असतील. पुढील तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती असेल.
रिझव्र्ह बँकेचे माजी डॉ. गव्हर्नर रघुराम राजन यांनी मध्यवर्ती बँकेत मुख्य परिचलन अधिकारी भरण्याविषयीची सुचना तत्कालिन केंद्र सरकारला केली होती. मात्र अंमलबजावणी होऊ शकली नाही.