टीम इंडिया २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर टी-20 विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानशी भिडणार आहे. भारतीय संघ टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकाचा संघ म्हणून विश्वचषकात प्रवेश करेल. त्याचबरोबर १५ वर्षांचा दुष्काळ संपवण्याचाही प्रयत्न करणार आहे. २००७ मध्ये भारताने शेवटचा टी-२० विश्वचषक जिंकला होता.

यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुसऱ्या विजेतेपदासाठी मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी, व्हिक्टोरियाच्या गव्हर्नर लिंडा डेसो एसी आणि इतर मान्यवरांची मेलबर्नमधील गव्हर्नमेंट हाऊसमध्ये भेट घेतली. बीसीसीआय आणि व्हिक्टोरियाच्या गव्हर्नरने टीम इंडियाचे गव्हर्नमेंट हाऊसमधील भेटीचे फोटो शेअर केले आहेत.

व्हिक्टोरियाच्या गव्हर्नरने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ”आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचे यजमान शहर म्हणून, आज दुपारी शासकीय निवासस्थानी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी रिसेप्शनचे आयोजन केले. त्याचबरोबर बीसीसीआयने देखील फोटो शेअर केला आणि लिहिले, माननीय लिंडा डेसाऊ एसी आणि इतर मान्यवरांनी आज टी-२० विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेट संघाची भेट घेतली.”

२००७ मध्ये पहिल्यांदा जेतेपद पटकावल्यानंतर टी-२० विश्वचषकात भारताची कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. १५ वर्षांपूर्वी इरफान पठाण भारतीय संघाच्या विजयाचा नायक ठरला होता. पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने १६ धावांत तीन विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच धावांनी पराभव केला.

हेही वाचा – AUS vs NZ : डेव्हॉन कॉन्वेने मोडला विराट कोहलीचा रेकॉर्ड, तर बाबर आझमच्या ‘या’ विक्रमाशी केली बरोबरी

भारताच्या सध्याच्या संघातील फलंदाजांमध्ये केएल राहुल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. त्याचबरोबर गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराहची दुखापत हा टीम इंडियाला मोठा धक्का होता, मात्र भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांची उपस्थिती भारतीय संघाला मजबूत करेल. मेलबर्नच्या खेळपट्टीवर स्विंग मिळाल्यास भुवनेश्वर आणि अर्शदीप हाहाकार माजवू शकतात.