कुठल्या प्रकारचं जेवण कसं घ्यावं? कटलरी कुठली, कशी वापरावी? चांगला होस्ट किंवा गेस्ट बनण्यासाठीचे डायनिंग एटीकेट
भारतीय जेवण पद्धत भांडय़ांच्या बाबतीत एकदमच आटोपशीर आहे. ताट, दोन- तीन वाटय़ा आणि पाण्याचं भांडं असलं की करा वाढायला सुरुवात! याउलट पाश्चात्त्य पद्धतीचा ताम-झाम खूपच मोठा असतो. टेबलावर जेवण वाढण्यास काय ठेवायचं हे मेन्यूवर अवलंबून असतं. मागच्या सदरात आपण ज्या ‘आ ला कार्ट’ आणि ‘ताब्ल दोत’/ ‘सेट’ किंवा ‘फिक्स्ड प्राइस्ड’ मेन्यूबद्दल जाणून घेतलं, तेच हे. आपण जो मेन्यू निवडू त्यावरून आपलं टेबल सेट होतं.
पाश्चात्त्य जेवण पद्धतीत कटलरीचा.. म्हणजेच काटे, चमचे, सुऱ्या इत्यादींचा वापर करतात. सुरी आणि चमचा नेहमीच उजव्या बाजूला असतात. काटा सहसा डाव्या बाजूला असतो, पण स्पगेत्तीसारखी डिश असेल तर काटा उजव्या बाजूला असतो. ह्य़ाव्यतिरिक्त टेबल सेटिंगमध्ये अजून काय असतं आणि ते कशासाठी वापरलं जातं ते आपण पाहूया.
* नॅपकिन
उच्च दर्जाच्या ‘रेस्तराँ’मधले नॅपकिन नेहमी कापडाचे असतात, कागदाचे नाही. नॅपकिन काटा आणि सुरी/चमच्याच्या मधल्या जागेत, नाहीतर ग्लासमध्ये ठेवला असतो. बसल्यानंतर नॅपकिन त्याच्या जागेतून काढून आपल्या मांडीवर ठेवावा. काही उच्चभ्रू ‘रेस्तराँ’मध्ये वेटर्स आपल्यासाठी हे करून देतात. नॅपकिनचा उपयोग ओठ पुसायला अथवा खरकटं लागल्यास बोटाची टोकं पुसायला वापरतात. नाक पुसायला किंवा िशकायला नॅपकिनचा वापर करू नये.
जेवत असताना काही कारणामुळे टेबलवरून उठायला लागलं, तर नॅपकिन खुर्चीत ठेवावा. ही तुम्ही परत येणार आहात याची सांकेतिक खूण आहे. जेवण संपवून टेबल सोडताना नॅपकिन टेबलवर ठेवावा.
* ब्रेड अँड बटर प्लेट
ही म्हणजे काटय़ाच्या डाव्या बाजूला ठेवलेली एक छोटी प्लेट. ह्य़ात ब्रेड आणि बटर ठेवलं जातं. एक छोटी सुरी (बटर नाइफ) पण उभी ठेवली असते.
टेबलवरच्या सर्व मंडळींसाठी ब्रेड एका टोपलीत आणि बटर एका डिश (बटर डिश) मध्ये आणलं जातं. बटर डिशमध्ये एक अगदी छोटी सुरी असते, ज्याने बटर डिशमधून थोडंसं बटर घेऊन ते आपल्या ब्रेड-बटर प्लेट वर ठेवायचं. बास्केटमधला एक ब्रेड रोल घेऊन तोपण ह्य़ा ब्रेड-बटर प्लेटमध्ये ठेवायचा. ब्रेडरोलचा थोडा तुकडा काढून त्याला थोडं बटर लावून तो सूप अथवा जेवणासोबत खावा.
* पाण्याचा ग्लास
हा सुरीच्या टोकाला उजव्या बाजूला ठेवला असतो. आपल्या जेवण पद्धतीत पाण्याचं भांडं डाव्या बाजूला असतं. हा फरक लक्षात घेतला पाहिजे.
* क्रुएट सेट
हा टेबलच्या मध्यभागी ठेवला असतो. ह्य़ात मीठ-मिरपुडीची, वरच्या भागाला छिद्र असलेली छोटी, लांबुडकी कंटेनर्स आणि ऑलिव ऑइल, विनेगरच्या छोटय़ा बाटल्या असतात. काही जागी फक्त मीठ- मिरीचीच कंटेनर्स असतात.
* सेंटर पीस
म्हणजे टेबलच्या मध्यभागी ठेवलेली वस्तू – सहसा एक छोटय़ाशा फुलदाणीत एक फूल नाही तर फुलाची कळी.
काही रेस्तराँमध्ये रात्रीच्या जेवणाला आकर्षक मेणबत्त्याही ठेवतात.