चीनच्या अर्थव्यवस्थेशी थेट संबंध असलेल्या मोजक्या कंपन्यांच्या समभागाला गुरुवारच्या व्यवहार लक्षणीय भाव घसरणीचा धक्का सोसावा लागला. यात प्रामुख्याने टाटा मोटर्सचा समभाग तब्बल ६.१५ टक्क्यांनी गडगडला. सोबतच मारुती सुझुकी तसेच धातू क्षेत्रातील टाटा स्टील, वेदान्त व हिंडाल्को यांना ताज्या घडामोडीमुळे घसरणीचा फटका बसला.
टाटा मोटर्सकडे मालकी असलेल्या जग्वार लँड रोव्हर वाहनांच्या एकूण जागतिक विक्रीत चीनचा जवळपास १५ टक्के हिस्सा (वर्षभरात ३० टक्क्यांहून अधिक घसरण होऊनही) आहे. शिवाय जग्वार लँड रोव्हरचा चीनमध्ये चेरी ऑटोमोबाइलसह संयुक्तभागीदारीत प्रकल्पही आहे. डळमळलेल्या चिनी अर्थव्यवस्थेचा थेट परिणाम या कंपनीच्या विक्री महसुलावर प्रतिकूल परिणाम दिसणार आहे. टाटा मोटर्सचा समभाग त्या उलट युआनच्या अवमूल्यनापायी तुलनेने फुगलेल्या अन्य आशियाई चलनात जपानच्या येनने गुरुवारी बहुवार्षिक उच्चांक स्थापित केला. सुझुकी या जपानी कंपनीचे पालकत्व असलेल्या मारुती सुझुकीच्या समभागाला मात्र त्यातून फटका बसला. मारुती सुझुकी इंडियाचा समभाग २१३ रुपये (४.७५ टक्क्यांनी) गडगडला. मारुतीच्या वाहनांसाठी जवळपास २० टक्के सुटे भाग जपानमधून आयात होतात, तर मारुतीला आपल्या उत्पन्नातील काही हिस्सा स्वामित्व हक्क म्हणून सुझुकीला येनच्या मूल्यात द्यावा लागतो. येनमधील प्रत्येक १ टक्क्यांच्या वाढीतून मारुतीच्या नफाक्षमतेला ०.१५ टक्क्यांनी कात्री लागते, असे विश्लेषक सांगतात.
जगातील दुसऱ्या मोठय़ा अर्थव्यवस्था क्षतिग्रस्त होण्याचा विपरीत परिणाम जागतिक वस्तू व धातू बाजारावर दिसून येत असल्याने धातू क्षेत्रातील टाटा स्टील (६.८५ टक्के), वेदान्त (८.७३ टक्के), हिंदाल्को (४.७३ टक्के), शिवाय टायर कंपन्या जेके टायर, एमआरफ आणि सिएट आदी समभागही ३ ते ५ टक्क्यांनी गडगडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा