राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी जगाला शांतता, अहिंसा आणि साधेपणाचा विचार दिला असून संपूर्ण  जगाने हा विचार स्वीकारला आहे.आजच्या काळातही हा विचार उपयुक्त आहे.भारताच्या प्रत्येक परंपरेमागे विज्ञान आहे. भारतीय परंपरेप्रमाणे माता, मातृभाषा आणि मातृभूमीचा सर्वांनी आदर केला पाहिजे. तर दहशतवाद हे जगसमोरचे सर्वात मोठे आव्हान आहे असे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे.  पुण्यातील लोणीकाळभोर येथील एमआयटी विश्व शांती विदयापीठाच्यावतीने विश्व शांती सभागृह (वर्ल्ड पीस डोम) आणि विश्व शांती ग्रंथालयाचे उदघाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित झाले. यावेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे बोलत होते.

यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस यु‍निवर्सिटीचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, संस्थेचे मार्गदर्शक मंडळाचे चेअरमन डॉ. रघुनाथ माशेलकर, नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर,राहुल कराड उपस्थित होते. यावेळी उपराष्ट्रपती  व्यंकय्या नायडू म्हणाले की, दहशतवाद,हिंसाचार, गरिबी यासारखी अनेक आव्हाने आपल्या समोर आहेत.यामध्ये दहशतवाद ही गंभीर समस्या असून या विरोधात सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे.असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

जगाला शांततेचा संदेश देण्याची भारताची पंरपरा असून विज्ञान आणि अध्यात्म यांची योग्य सांगड भारतीय संस्कृतीत घालण्यात आली आहे.तसेच भारताच्या भूमीत, पाण्यात, हवेत, प्रकाशात ज्ञानाचे तेज आहे. भारतीयांचे हे ज्ञान जगाने मान्य केले आहे. मात्र या ज्ञानात आणि पारंपारिक कौशल्यात वृध्दी होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे नायडू यांनी सांगितले.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की,स्वामी विवेकानंदांनी आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून विज्ञान आणि अध्यात्माची सांगड घातली. जागतिक परिषदेत त्यांनी विश्व कल्याणाचा मंत्र दिला.शांततेशिवाय मानवाचे कल्याण शक्य नाही.त्यामुळे शांततेसाठी संपूर्ण जगाने एकत्र येण्याचा संदेश त्यांनी दिला.भारताचे सुपूत्र असणाऱ्या महात्मा गांधींनी जगाला अहिंसेचे तत्वज्ञान दिले. त्यांच्या १५० व्या जयंती निमित्त या डोमचे लोकार्पण होत आहे.हा दुर्मीळ योग असून विश्वशांती, संस्कृती,ज्ञानाचा संदेश देण्यासाठी आणि भारताचे रूप जगासमोर आणण्यासाठी हे वर्ल्ड पीस डोम प्रेरणादायी ठरेल.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.